बाजार…लेखन..सुचित्रा पवार.
बाजार
———–
आठवडी भाजी बाजारात प्रवेश करताच तुम्हाला ब..टा..टा..ब….टा… टा..असे वेगळ्याच लकबीत ओरडून आपलं लक्ष वेधून घेताना कुणी दिसेल.कुणी हिरव्या पांढऱ्याशुभ्र कोबी-फ्लॉवरचा ढीग लावला असेल तर कुणी लाल चुटुक गाजरांचा भला मोठा ढीग ओतून ठेवला असेल.इतक्यात रसरशीत टोमॅटो तुम्हाला तिकडे बोलवत असतील.तुमची नजर भिरभिरत असेल,आणि अगोदर फक्त एक फेरफटका मारायचा असे ठरवले असले तरी लुसलुशीत कोवळी कोवळी हिरवीगार भेंडी वेताच्या मोठ्या पाटीत अशा पद्धतीने मांडून ठेवली असेल की ती घेण्याचा मोह तुम्हाला आवरणार नाही आणि तुमचा फेरफटका मारण्याचा बेत रद्द करून तुम्ही भेंडीकडे धावाल;पण अहं!शेंडा बिलकुल मोडायचा नाही,अस्ताव्यस्त करायची नाही,एका बाजूने हळूच शिग मोडून हव्या तितक्या भेंड्या घ्यायच्या.शेतकऱ्याने खूप कष्टाने इतक्या कौशल्याने तो शिग लावलेला असतो.तुमच्या धसमुसळेपणाने त्या कष्टावर पाणी नाही फिरवायचे!भेंडी घेऊन पैसे चुकते करून पुढं निघालेलोच असतो,तोवर हिरवीगार कोवळी कुडची वांगी,निळी हिरवी देशी काटेरी वांगी तुमचं लक्ष वेधून घेतात.एकसारख्या आकाराची टवटवीत ताजी वांगी बघूनच भरलेलं वांगं खाल्ल्याचं समाधान वाटतं मग लागलीच वांगी पिशवीत जाऊन बसतात.तिथंच बाजूला मोठी मोठी भरिताची वांगी पण दिसतात.लागलीच तीही पिशवीत जागा पटकावतात.जरा पुढं जाईतो पालक,चाकवत गरगट्यासाठी नकळत घेतला जातोच.लुसलुशीत मेथी भाजी करा की पराठे!सोबतच तांदळ आणि कोथिंबीरीशिवाय जेवणाला मजा काय?ताज्या देशी कोथिंबीरीचा घमघमाट तिकडं खेचून घेतोच.सोबत कांदे बटाटे.पिशवी गच्च भरलेली असते ओझंही भरपूर झालेलं असतं आता किरकोळ काहीतरी घ्यायचं असतं इतक्यात कुणी आजी आजोबा “ताई ,शेवग्याच्या शेंगा लै चवीला हायत घ्या की!अवं धा ला दोन हैत म्हणत आर्जव करू लागतात.या वयातील त्यांच्या कष्टाला दाद देऊन त्यांच्या अर्जवाचा मान राखत शेंगा घेऊन आपण फुल बाजाराकडे वळतो.लांबूनच फुलांच्या घमघमाट आणि आकर्षक सजावटीने मन प्रसन्न होते.टपोरे लाल,केशरी गुलाब,पांढरी पिवळी शेवंती,नाजूक देठावर लवणारा निशिगंध आणि तिकडे मोगरा,अबोली,कुंदा अशा वेगवेगळ्या फुलांचे गजरे न माळा!डोळ्यांना सुखवणारा आणि मन भरून सुगन्ध देणारा फुल बाजार पाहूनच मन हरकून प्रसन्न होते.
“बाजार फुलांचा भरला
मज बहीण मिळेना..”
अशी आर्त आठवण कवीला का झाली असावी?हे फुलबाजारात गेल्याशिवाय कळत नाही.
बाजार म्हणलं की कलकलाट,गजबजाट.जे नियमित बाजारात जातात त्यांना बाजारात वेगवेगळे अनुभव नक्की येतात.गिऱ्हाईकांच्या वागण्याच्या तऱ्हा आणि स्वभावांचे अनुभव,भाजी विक्रेत्यांचे आणि शेतकऱ्यांचे अनुभव पाठ होतात.बरेचदा मजेशीर किस्से घडतात तर बरेचदा हृदयद्रावक प्रसंग सुद्धा अनुभवास येतात. एखाद्या भाजीचा दर पडल्यावर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दाटलेली दुःख न करुणेचे सावट पाहवत नाही मन उद्विग्न होते.ज्या वयात नातवंड अंगाखांद्यावर खेळवत निवांत आयुष्य जगत राहायचे त्या वयात एखादे आजी/आजोबा थरथरत्या हाताने,मानेने भाजी विकत बसलेले बघून पोटात कालवून येते.त्यातल्या त्यात भाजी खपवण्यासाठी चाललेली त्यांची केविलवाणी धडपड बघून तर अजूनच कासावीस व्हायला होते.
बाजार तरी प्रकारचे,किती तऱ्हेचे!भाजी बाजार,फळ बाजार,कापड,खेळणी,औषध,जनावरे,संसारोपयोगी वस्तू,शेती उपयोगी वस्तू असे नाना प्रकार;पण मनाचा वेध घेतो तो भाजीचा बाजारच.सहज जाता जाता ताज्या भाज्या दिसल्या की त्या घेण्याचा मोह होतोच,घरी भाज्या शिल्लक असल्या तरीही!
ऋतूमानानुसार आणि भौगोलिक स्थितीनुसार भाज्यांचे प्रकार आणि चवीत सुद्धा फरक असतो.वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पालेभाज्या आणि फळभाज्या पिकतात.इतकेच नाही तर एकाच जिल्ह्यात सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या ,वेगवेगळ्या चवीच्या भाज्या आढळून येतात.अनुभवाशिवाय ताज्या भाज्या,देशी भाज्या,चवदार भाज्या कळून येत नाहीत.कधीतरी पिशवी घेऊन आपण बाजारात गेलो की गोंधळायला होते.सकाळी लवकर थोडा माल असणारे शेतकरी येऊन तास दोन तास बसून भाजी विकून जातात.संध्याकाळी चार ते सहा पर्यंत बाजार तेजीत असतो,गिऱ्हाईक याच काळात जास्त संख्येने असते.( पूर्वी गिऱ्हाईक भावात घासाघीस करत आणि बिचारे शेतकरी मिळेल तो दाम घेऊन भाजी विकत पण हल्ली शेतकरी घासाघीस करू देत नाहीत हे बरेच)
खरिपाच्या हंगामात तुलनेने पालेभाज्यांचे प्रकार कमी असतात तरीही ऋतूनुसार येणाऱ्या देशी भाज्या चवदार असतात.उदा.श्रावण भाद्रपदात येणारी शेपू,चवळी,श्रावण महिन्यात येणाऱ्या काळा श्रावण घेवडा-कोवळ्या शेंगां मोडून लोखंडी तव्यातली चुरचुरीत भाजी आणि जून झाल्यावर बियांची उसळ वा आमटी दोन्हीही चविष्टच.दसऱ्याच्या आसपास येणारी काटेरी भेंडी; पण दिवाळीनंतर रब्बी मध्ये मात्र भाज्यांचे खूप प्रकार मिळतात.ताज्या ताज्या मोहरीची पाने-नुसत्या सुगंधानेच मन तृप्त होते.देशी चाकवत,चंदन बटवा,मांसल पानांची स्वादिष्ट घोळ,हरभऱ्याची हिरव्या पानांची भाजी,देशी करडई हातात घेईतो घमघमाट सुटतो.
कोरोनाच्या काळात बाजार बंद होता. हा बाजार कधी सुरू होईल का नाही असे वाटत होते तसेच नेहमीचे भाजी विक्रेते आपल्याला परत दिसतील ना?अशी चुटपुट लागली होती पण कोरोनानंतर सर्व व्यवहार पूर्ववत झाले आणि पूर्वीचे सर्व भाजीविक्रेते पुन्हा दिसल्यानंतर खूप हायसे वाटले.कोरोनानंतर सर्वच छोट्या छोट्या खेडेगावात बाजार भरू लागले.लोकांना तालुक्यात बाजाराला जायची गरज उरली नाही.विशेषतः ग्रामीण महिलांना हव्या त्या भाज्या बाजारातून आणता येऊ लागल्या.एका अर्थाने खेडी स्वयंपूर्ण झाले असेच म्हणावे लागेल.भजी,वडापाव आणि असेच चटपटीत पदार्थांची चटक आता ग्रामीण भागातील खवैय्यानाही लागली आहे.
मनाला मरगळ आली असेल तर बाजारातून एक फेरफटका मारलात तर मरगळ नाहीशी झालीच म्हणून समजा!
साभर
©सुचित्रा पवार,तासगाव