विनाविलंब पाणीपुरवठा सुरळीत करावा
विनाविलंब पाणीपुरवठा सुरळीत करावा
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची स्पष्ट सूचना
सातारा.
पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी नगरपरिषदेची आहे. तथापि पाणीपुरवठ्यासंदर्भातील कोणत्याही बाबीची मोडतोड करणे किंवा त्यामध्ये अडथळा निर्माण होईल असे कृत्य होणे या बाबी क्षमाशीलतेमध्ये मोडणा-या नाहीत. गेल्या चार दिवसांपासून कराडकरांचे झालेले हाल, हे निसर्गनिर्मित नाही, त्यामुळे सर्व संबंधितांनी कोणतीही टोलवाटोलवी न करता, विनाविलंब आपली जबाबदारी पार पाडून पाणीपुरवठा सुरळीत करावा अशा शब्दात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नगरपरिषदेसह सर्व संबंधितांना फैलावर घेत सूचना केल्या.
तांत्रिक अडचणीमुळे कराडच्या बंद असलेल्या पाणीपुरवठयाच्या पार्श्वभूमिवर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कराड प्रांताधिकारी म्हेत्रे, कराड नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, मुख्याधिकारी शंकर खंदारे, महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी तसेच महामार्ग सहापदरीकराचे ठेकेदार डी. पी. जैन कंपनीचे प्रतिनिधी, पाणीपुरवठा अभियंता, आदी मान्यवरांच्या समवेत प्रत्यक्ष पंपिंगस्टेशनस्थळाला भेट देवून, पहाणी केली.
यावेळी सूचना करताना, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगीतले की, कराडच्या पाणी पुरवठयातील आपत्तीमुळे गेल्या सहा दिवसापासून कराडकरांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. याबद्दल मनाला वेदना होतात. मानवनिर्मित अनवधान, किंवा मानवी चुकांमुळे पिण्याच्या पाणी पुरवठयाबाबत झालेली हयगय आम्हीच नाही परंतु अन्य कोणीही खपवून घेणार नाही. आम्हाला लंगडया सबबी सांगु नका, सहा दिवसांपासून कराडकरांचे हाल सुरू आहेत. डॉ. अतुल भोसले आणि अन्य समाजसेवकांच्या प्रयत्नातुन दिवस रात्र टॅंकर सुरू आहेत, म्हणून थोडातरी दिलासा कराडकरांना मिळाला आहे. आज ते व्यक्तीगत कारणामुळे इथे नाहीत तथापि प्रशासनाने नागरिकांच्या संयमाचा अंत पाहु नका. कोणतेही राजकारण न करता, युध्दपातळीवर जे आवश्यक आहे ते करा. तुम्हाला जमत नसेल तर तसे सांगा, अशा शब्दात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सर्व संबंधितांची कानउघाडणी करत, पाणीपुरवठा एका दिवसांत सुरु झाला पाहिजे अशा खरमरीत सूचना केल्या.
यावेळी जिल्हापरिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, अॅङ विनित पाटील, विजयसिंह यादव, हणमंतराव पवार, संग्राम बर्गे, विनायक पावस्कर, विजय वाटेगांवकर, स्मिता हुलवान, गजेंद्र कांबळे, बाळासाहेब यादव, किरण पाटील, ओमकार मुळे, निशांत ढेकळे, विनोद भोसले, विजया यादव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी, डी.पी जैन कंपनी चे अधिकारी, कराड नगरपालिकेचे अधिकारी व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.