ना. रामदास आठवले यांचा सत्कार


आंबेडकरी जनतेची
राजकीय ताकद उभी करण्याचे ध्येय

-ना.रामदास आठवले

पुणे – सत्तेत आंबेडकरी जनतेला चांगले प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न नेहमीच रिपब्लिकन पक्षाने केला आहे. त्यामुळे एक मजबूत राजकीय ताकद उभी करणे हे आपले ध्येय आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पुणे शहर यांच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची केंद्रीय सामाजिक न्याय तथा सक्षमीकरण राज्यमंत्री पदी तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल सपत्नीक सर्व धर्मिय सत्कार सोहळ्याचे व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी महाथेरो भन्ते नागघोष (धम्मदायाद बुध्द बिहार), फादर भाऊसाहेब संसारे (रेक्टर, पिपल्स सेमिनरी), ग्याणी अमरजित सिंग (अध्यक्ष, गुरुनानक दरवार रेसकोर्स), संजय भोसले (उपाध्यक्ष, इस्कॉन इंटरनॅशनल), मौलाना सय्यद मुसा (दारूल उलूम, पुणे), रावसाहेब झेंडे (जेष्ठ रिपब्लिकन कार्यकर्ता) यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. यावेळी रिपब्लिकन पार्टि ऑफ इंडिया (आठवले) पक्षाला मिळालेल्या ‘ऊस धारक शेतकरी’ (गन्ना किसान) या निवडणूक चिन्हाचे अनावरण देखील करण्यात आले.

Advertisement

यावेळी अध्यक्षस्थानी आरपीआयचे पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, महाराष्ट्र प्रदेश सचिव संघटक परशुराम वाडेकर, माजी अध्यक्ष अशोक कांबळे, युवा आघाडीचे पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष निलेश आल्हाट, प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरोदे, प्रदेश सरचिटणीस गौतम सोनावणे, राज्य कार्यकारिणीचे सदस्य मंदार जोशी, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे आदींसह आरपीआय कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

रामदास आठवले पुढे म्हणाले की, रिपब्लिकन ऐक्याची चर्चा नेहमीच होते. परंतु नेत्यांमध्ये काही केल्या ऐक्य होताना दिसून येत नाही. परंतु नेत्यांचे ऐक्य होत नसेल तर कमीत कमी जनतेचे ऐक्य करणे गरजेचे आहे. आगामी विधानसभा निवडणुकीबाबतही आठवले यांनी कार्यक्रमात भाष्य केले. ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळेल, अशी अपेक्षा आहे. आम्ही महायुतीत सातत्याने मागणी करीत असतो. परंतु केवळ मागण्या किती दिवस करायच्या, हेही आपल्याला ठरवावे लागेल.

आगामी काळात महायुतीत योग्य तो सन्मान मिळाला नाही, तर आम्ही बंड केल्याशिवाय राहणार नाही, हे आमच्या मित्रपक्षांनी लक्षात ठेवावे, असा इशारा परशुराम वाडेकर यांनी दिला.

संजय सोनवणे या वेळी म्हणाले रामदास आठवले हे जनसामान्यांचे शोषित-वंचितांचे एक जाणकार नेते आहेत. वंचितांच्या हक्कांसाठी सातत्याने झटणारा नेता म्हणून त्यांची कीर्ती फार मोठी आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक म्हस्के यांनी केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!