लोकशाही दिनात तीन प्रकरणांवर सुनावणी


विभागीय लोकशाही दिनात तीन प्रकरणांवर सुनावणी

लोकशाही दिनामधील सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे विभागीय आयुक्तांचे निर्देश

पुणे,दि.०९ :- सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून न्याय व तत्परतेने सोडवणूक व्हावी या हेतूने विविध पातळीवर लोकशाही दिन आयोजित करण्यात येऊन नागरिकांच्या तक्रारीवर निर्णय घेण्यात येतात. विभागीय लोकशाही दिनामधे दाखल प्रकरणांवर सुनावणी घेऊन दिलेल्या आदेशाचे प्रशासनाने काटेकोरपणे व त्वरित पालन करुन तक्रारी तातडीने सोडवाव्या अन्यथा त्याची गंभीर दखल घेण्यात येईल असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहे.

विभागीय आयुक्त कार्यालय सभागृहात विभागीय स्तरावरील लोकशाही दिनातील प्रकरणांच्या सुनावणीदरम्यान ते बोलत होते. पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, महसूल उपायुक्त अण्णासाहेब चव्हाण, नगर पालिका प्रशासन उपायुक्त पूनम मेहता, करमणूक कर उपायुक्त निलीमा धायगुडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक मुख्य अभियंता आर.वाय.पाटील यावेळी उपस्थित होते.

Advertisement

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार निवारण न झालेल्या तीन प्रकरणांवर यावेळी डॉ.पुलकुंडवार यांनी अर्जदारांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली आणि सुनावणी घेतली. अर्जदारांच्या तक्रारींचे निवारण तातडीने करण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना केल्या. जिल्हास्तरावर सुटणाऱ्या समस्यांसाठी नागरिकांना विभागीय लोकशाही दिनात यावे लागते हे योग्य नसून जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे आणि संबधित अधिकाऱ्यांनी अर्जदाराच्या तक्रारी सोडवाव्यात, असे डॉ.पुलकुंडवार यांनी सांगितले. जनतेच्या तक्रारी सोडवण्यामध्ये टाळाटाळ अथवा हलगर्जीपणा झाल्याचे निदर्शनास आल्यास अधिकाऱ्यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरुन प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असेही यावेळी त्यांनी सूचित केले. यावेळी विविध विभागांचे विभागस्तरीय अधिकारी उपस्थित होते.
०००


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!