देणे समाजाचे..!


समाजसेवी संस्थांच्या सबलीकरणाचा उपक्रम
देणे समाजाचे..!
समाजाच्या कल्याणासाठी झटणार्‍या महान समाजसेवकांची परंपरा पुरोगामी महाराष्ट्रात आजही जिवंत आहे. त्यातीलच एक शृंखला ‘देणे समाजाचे’ हा ‘आर्टिस्ट्री’ या संस्थेचा समाजभान जपणारा आगळावेगळा उपक्रम २७ सप्टेंबरला वीस वर्षे पूर्ण करीत आहे.
महाराष्ट्रात कितीतरी युवक-युवती समर्पणाच्या भावनेने वाखाणण्याजोगे समाजकार्य करतात. शहरी प्रसिद्धीच्या वलयापासून दूर असणार्‍या अशा होतकरू पंचवीस संस्थांना दरवर्षी ‘देणे समाजाचे’ या उपक्रमासाठी पितृ-पंधरवड्यात तीन दिवस पुण्यात आमंत्रित केले जाते. त्यांना स्वतंत्र स्टॉल, फर्निचर, पंखा, वीज, पाणी, निवास इत्यादी सोयी मोफत दिल्या जातात. संस्थांचे कार्यकर्ते दिवसभर त्यांचे सेवाकार्य, अडचणी, गरजा, अपेक्षा पुणेकरांपुढे मांडतात.
परिणामत: संस्थांना भरघोस आर्थिक मदत मिळते. फर्निचर, वॉशिंग मशिन्स, कूलर्स, फ्रीज, क्रीडासाहित्य, कपडे, धान्य, किराणा, बांधकामसाहित्य अशीही मदत मिळते. थेट अमेरिकेतूनही मदतनिधी मिळालाय कधी कधी! असे हे ‘प्रदर्शन न करणारांचे प्रदर्शन!’
या संस्थांचे काम ‘देणे समाजाचे’च्या सर्वेसर्वा वीणा गोखले दोन-तीन वेळा संस्थेत जाऊन काटेकोरपणे पाहतात. चोख आर्थिक व्यवहार, समाजसेवेची आंतरिक तळमळ पाहून गरजू संस्थांची निवड केली जाते. आजपर्यंत २७५ संस्थांना या उपक्रमातून पंधरा कोटी रुपयांचा मदतनिधी मिळाला आहे. दिव्यांग, एचआयव्ही बाधित, परित्यक्त्या, आदिवासी, भिक्षेकरी रुग्ण, कॅन्सरग्रस्त वृद्ध, निराधार, सैनिकांचे कुंटुबीय, आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांचे वारस, ऊसतोडणी मजूर, पर्यावरण, शेततळी, चाईल्ड हेल्प लाईन, जखमी प्राण्यांची निगा अशा अनेकविध क्षेत्रांमध्ये मनापासून चाकोरीबाह्य सेवाकार्य करणार्‍या या संस्था!
या उपक्रमात कसलीही खरेदी-विक्री नसते. उलट पीडितांच्या करुणकथाच इथे समजून घ्याव्या लागतात. तरीही वारकर्‍यांच्या निष्ठेने समाजसेवेच्या पंढरीची वारी करणार्‍या समाजव्रतींची मांदियाळी प्रत्येक स्टॉलवर दिसते; नकळत डोळे पाणावतात, माणुसकी, त्याग, संवेदनशीलता यांची प्रेरणा मिळते, विचारांचे क्षितीज विस्तारते. अनील अवचट, रघुनाथ माशेलकर, संजय उपाध्ये, प्रवीण दवणे, सुधीर गाडगीळ, विक्रम गोखले, अविनाश धर्माधिकारी अशा मान्यवरांनी या उपक्रमाला भेट आणि आशीर्वाद दिले आहेत. समाजसेवी संस्थांचे सबलीकरण करणार्‍या महाराष्ट्रातील अशा प्रकारच्या या एकमेव उपक्रमाला २७ ते २९ सप्टेंबरला सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत नक्की भेट द्या.

Advertisement


स्थळ :
‘निवारा’ वृद्धाश्रम,
एस. एम. जोशी सभागृहासमोर,
नवी पेठ, पुणे.
प्रकाश बोकील
९८९०९०११५९


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!