क्राईम न्यूज (31.01.2025)
साताऱ्यात जुगार अड्डयावर कारवाई
सातारा / प्रतिनिधी
सातारा शहरातील राजवाड्याजवळील जुगार अड्यावर छापा टाकून पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
याबाबत पोलिसांच्या माहितीनुसार, दि. ३० जानेवारी रोजी दुपारी बाराच्या सुमारास अळूचा खड्डा येथील जुगार अड्यावर छापा टाकण्यात आला. यामध्ये जुगार साहित्य आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. तर दिलीपकुमार त्रिंबक नाफड (रा. मंगळवार पेठ, सातारा) याला नोटीस देण्यात आलेली आहे.
………………
विकासनगरमध्ये लिफ्ट वापरण्यावरुन मारहाण
दोघांवर गुन्हा
सातारा / प्रतिनिधी
सातारा शहराजवळील विकासनगरमध्ये लिफ्ट वापराच्या कारणावरुन एकाला लाकडी दांडके, रॉडने मारहाण करण्याची घटना घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांच्या विरोधात दुखापतीचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, याप्रकरणी गजानन आनंदराव कदम (रा. विकासनगर सातारा) यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार अनिल कोकाटे आणि प्रमोद निकम उर्फ चिक्या (दोघांचेही पूर्ण नाव नाही, रा. विकासनगर) या दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. दि. २९ जानेवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास विकासनगरमधील एका अपार्टमेंटमध्ये प्रकार घडला. तक्रारदार हे पार्किंगमधून घरी जात होते. त्यावेळी सोसायटीतील लिफ्ट वापराच्या कारणावरुन त्यांना दांडके आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये त्यांना जखम झाली आहे.
………………….
सातारा एमआयडीसीत २७ हजाराची घरफोडी
सातारा / प्रतिनिधी
सातारा शहराजवळील औद्योगिक वसाहतीत घरफोडी झाली. यामध्ये सुमारे २७ हजारांचा ऐवज लंपास झाला आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, याप्रकरणी नारायण बबनराव खटावकर (रा. आपुलकीनगर मैत्री पार्क हौसिंग सोसायटी, नवीन औद्योगिक वसाहत) यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार चांदीचे ताट, चांदीचे फुलपात्र, चांदीची पळी, लक्ष्मीची मूर्ती, रोख रक्कम तसेच अन्य एका व्यक्तीची रोखड, मनगटी घड्याळ असे चोरुन नेण्यात आले आहे.
……………….
कटगुण येथून दोन म्हैशींची चोरी
सातारा / प्रतिनिधी
खटाव तालुक्यातील कटगुण येथून दोन म्हशींची चोरी झाली. याप्रकरणी पुसेगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, याप्रकरणी विठ्ठल आनंदराव कदम (रा. कटगुण) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार दि. १६ जानेवारीच्या रात्रीच्या सुमारास कटगुणमधील मळा नावाच्या शिवारातील पर्त्याच्या शेडसमोर बांधलेल्या दोन म्हशींची चोरी झाली आहे. त्यानुसार पुसेगाव पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
……………….
उसन्या पैशांवरुन एकाला मारहाण
दोघांवर गुन्हा
सातारा / प्रतिनिधी
वडूथ, ता. सातारा येथे उसन्या पैशाच्या कारणावरुन एकाला पट्याने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात दोघांच्या विरोधात दुखापतीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, याप्रकरणी राहुल कृष्णराव जाधव (रा.चिखली, चिंचवड पुणे. मूळ रा. जळगाव, ता. कोरेगाव) यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार बळवंत विठ्ठल साबळे आणि अमित बळवंत साबळे (दोघेही रा. वडूथ) यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. दि. २८ जानेवारी रोत्री रात्री साडे नऊच्या सुमारास वडूथ येथे मारहाणीचा प्रकार घडला. उसणे घेतलेले पैसे परत देण्यासाठी गेल्यावर तक्रारदार यांना घरातील पट्टयाने पाठ, कपाळावर हातावर मारहाण करण्यात आली. यामध्ये तक्रारदार जखमी झाले आहेत. तसेच तक्रारदाराच्या कुटुंबीयांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
…………….
झेडपीत नोकरी लावण्यासाठी पाच लाख घेवून फसवणूक
सातारा / प्रतिनिधी
झेडपीत ओळख असल्याचे सांगून अनुकंपा तत्वावर नोकरी लावतो म्हणून पाच लाखांहून अधिक रक्कम घेऊन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी एका वकिलासह दोघांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, याप्रकरणी सुनील नारायण मोरे (रा. करंजे नाका, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार ॲड. तय्यब आलमगीर मुल्ला (रा. संगमनगर सातारा) आणि आशिष रमेश माने (रा. कटापूर, ता. कोरेगाव) यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, एक वर्षांपूर्वी हा प्रकार सातारा तहसीलदार कार्यालयासमोरील ॲड. मुल्ला यांच्या नोटरीच्या ऑफिसमध्ये घडला. सातारा जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकारी ओळखीचे आहेत. जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्वावर क्लार्क आणि शिपायाची नोकरी लावून देतो, असे सांगून तक्रारदाराचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर तक्रारदाराचा मुलगा आणि इतर विद्याऱ्श्यांकडून ५ लाख ३० हजार रुपये ऑनलाईन घेतले. त्यानंतर बनावट नियुक्तीपत्र देण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पैसे परत मागितल्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे पोलिसांत तक्रार देण्यात आली. सातारा शहर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे.
…………..
सिगारेट न ओढण्याच्या कारणावरुन दोघांस मारहाण
सातारा / प्रतिनिधी
यवतेश्वर, ता. सातारा येथे एका रेस्टारंटमध्ये सिगारेट ओढू नका असे म्हटल्याच्या कारणातून दोघांना लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात चौघांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, याप्रकरणी आझाद शब्बीर घुनके (रा. मूळ रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर. सध्या रा. यवतेश्वर) याने तक्रार दिली आहे. त्यानुसार आयुष भोसले (पूर्ण नाव, पत्ता नाही) आणि त्याच्यासोबत असणाऱ्या इतर तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. दि. २९ जानेवारी रोजी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास यवतेश्वर येथील एका रेस्टॉरंटमध्ये प्रकार घडला. तक्रारदार घुनके याने येथे सिगारेट ओढू नका असे म्हटले. याचा रागत मनात धरुन तक्रारदार आणि त्याचा मित्र प्रतीक मोरे याला शिवीगाळ, दमदाटी करुन लाकडी दांडके आणि दगडाने मारहाण करण्यात आली. तसेच एक महिला भांडणे सोडविण्यासाठी आल्यावर त्यांनाही मारहाण झाली. त्यानंतर किचनमध्येही तोडफोड करुन नुकसान करण्यात आले. याप्रकारानंतर पोलिसांत तक्रार देण्यात आली. सातारा तालुका पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
…………………..
करंजे नाका येथे जुगार अड्डयावर कारवाई
सातारा / प्रतिनिधी
सातारा शहराजवळील करंजे नाका येथील जुगार अड्यावर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ३० जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास करंजे नाका येथील एका सलुनच्या शेजारी जुगार सुरू होता. माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली. घटनास्थळावरुन रोख रक्कम, सीपीयू, मॉनिटर, की बोर्ड असा मिळून सुमारे १० हजारांहून अधिक किंमतीचा ऐवज हस्तगत केला. तर याप्रकरणी मयुर काशीनाथ राठोड (रा. आकाशवाणी झोपडपट्टी सातारा) याला नोटीस देण्यात आली आहे.
…………………..बॉम्बे रेस्टॉरंट येथे जुगारावर कारवाई
सातारा / प्रतिनिधी
सातारा शहराजवळील बॉंबे रेस्टॉरंट चौकाजवळील एका जुगार अड्यावर पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
याबाबत पोलिसांच्या माहितीनुसार, दि. ३0 जानेवारी रोजी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास फळाच्या दुकानाजवळील जुगार अड्यावर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरुन रोख रक्कम, जुगार साहित्य, एलसीडी, सीपीयू, की बोर्ड, स्पीकर आदी मिळून सुमारे १५ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. तसेच याप्रकरणात शुभम सत्यवान कांबळे (रा. विकासनगर सातारा) आणि तन्वीर शेख (रा. पिरवाडी) यांना नोटीस देण्यात आलेली आहे.
……………………………
जुना मोटार स्टॅण्ड येथे जुगारावर कारवाई
सातारा / प्रतिनिधी
सातारा शहरातील जुना मोटार स्टॅंड येथील जुगार अड्यावर पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी एकाला नोटीस देण्यात आली आहे. तर शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
याबाबत पोलिसांच्या माहितीनुसार, दि. ३० जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास जुना मोटार स्टॅंडजवळ एका दुकाना शेजारील पर्त्याच्या शेडमधील जुगार अड्यावर छापा टाकण्यात आला. यामध्ये रोख रक्कम, जुगार साहित्य, सीपीयू, की बोर्ड, माऊस आदी १० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. तर याप्रकरणी नीलेश सुरेश पवार (रा. करंजे पेठ, सातारा) याला नोटीस बजावण्यात आली आहे.
…………………..
करंजे येथे अवैध दारुविक्रीवर कारवाई
सातारा / प्रतिनिधी
सातारा शहरातील करंजे येथील एका घरात अवैध दारु विक्रीप्रकरणी पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दि. ३० जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यामध्ये देशी विदेशी दारुच्या बाटल्या तसेच एक कार जप्त करण्यात आली. पोलिसांनी गणेश चंद्रकांत ठोकळे (रा. रविवार पेठ. सध्या रा. करंजे सातारा) याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
…………………..
म्हसवे येथून दुचाकीची चोरी
सातारा / प्रतिनिधी
सातारा तालुक्यातील म्हसवे गावच्या हद्दीतून दुचाकीची चोरी करण्यात आली. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, याप्रकरणी संग्राम बळीराम बाबर (रा. म्हसवे, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार दि. २४ जानेवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास म्हसवे गावच्या हद्दीतून दुचाकी (एमएच, ११. सीएम, ५७३४) ची अज्ञाताने चोरी केली आहे. दुचाकीची चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.