कविता : भालचंद्र कुलकर्णी
जरी मी लिहीली गझल अर्थवाही
(कसे जीवनी या समाधान नाही)
जरा थांब दु:खा गळा भेट घेवू
सुखाचे कुणालाच वरदान नाही
कसे ओळखू मी कळीचे इशारे
सुगंधास जर मोकळे रान नाही
नको आळवू राग मल्हार मित्रा
इथे वाहणारी हवा छान नाही
उन्हानेच बोलावले पावसाला
धरेला कशाचेच का भान नाही?
बळी प्राक्तनाचा पुन्हा तोच गेला
वरीष्ठास ज्याचे सुरापान नाही
दिला शब्द पाळून गेला बिचारा
तरीही समाजात गुणगान नाही
भालचंद्र कुलकर्णी