पुणे : पाणी कपात
पुण्यात पाणी कपातीची शक्यता
पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत जेमतेम ४० दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा असल्याने पाणीकपातीची शक्यता आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे.
गेले १५ दिवसांपासून शहरात ४० अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान असल्याने पाण्याची मागणी वाढलेली आहे. शिवाय धरण साठ्यातील पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे पाणीकपात करावी लागेल. सध्या निवडणूक प्रचार चालू असल्याने पाणीकपातीचा कटू निर्णय घेण्यास सरकार तयार नाही. मात्र, १३ मे रोजी मतदान पार पडल्यानंतर लगेचच पाणीकपात सुरू होईल. सुरुवातीला आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवणे, त्यानंतर पाणीसाठ्यात वाढ न झाल्यास आठवड्यातून दोनवेळा पाणी बंद ठेवणे आणि जून अखेर पाऊस लांबल्यास एक दिवसाआड पाणी असे पर्याय महापालिकेने तयार ठेवले आहेत.
भारतीय वेधशाळेच्या अंदाजानुसार यावर्षी मुबलक पाऊस होईल, अशी शक्यता आहे. त्यानुसार जून अखेरपर्यंत व्यवस्थित पाऊस झाल्यास पुणेकरांना दिलासा मिळेल. दक्षता म्हणून राज्य सरकारने औद्योगिक आणि शेती वापराचे पाणि थांबवून पिण्याच्या पाण्याचा साठा सुरक्षित ठेवावा, अशी मागणी सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे.