कर भला तो हो भला..


 

कर भला तो हो भला…..

प्रारब्ध, नियती, दैव, नशीब, भाग्य हे सगळे शब्द जरी वरवर समानार्थी वाटत असले तरी,त्यातून निघणारे अर्थ हे वेगवेगळे आहेत, प्रारब्ध, नियती या पुढे आपण हतबल असतो, काही काही घटना, काही काही प्रसंग, काही परिस्थिती या अश्याच असतात की जिथे आपले काहीच चालत नाही, केवळ सहन करण्यापलीकडे आपल्या हातात काहीच नसते, अशी जी अवस्था असते ते आपले प्रारब्ध असते, त्यालाच आपण प्रारब्धाचे भोग म्हणतो आणि हे भोग आपल्याला भोगूनच संपवावे लागतात.

नियती ही अगम्य आहे, कोणालाही न कळणारी गोष्ट आहे,एखाद्या मुलाचा ऐन तारुण्यात मृत्यू व्हावा, एखाद्या मुलीला लग्नाच्या आठव्या दिवशी वैधव्य यावे, संसाराचा डाव मांडायच्या आधीच तो मोडावा लागणे हा पण एक नियतीचाच खेळ म्हणावा लागेल. नियतीच्या मनात काय चालू असते, हे कोणालाही समजत नाही. आपण फक्त जे घडते, जे होते त्यावर, ‘जे होत ते चांगल्यासाठीच’ असा अंधविश्वास ठेवून पुढे मार्गक्रमण करत रहायचे असते.

एखाद्या बाक्या प्रसंगातून, एखाद्या मोठ्या अपघातातून आपण सही सलामत बचावलो, की आपल्या तोंडून आपोआप उद्गार निघतात, “केवळ दैव बलवत्तर म्हणून वाचलो”…म्हणजेच दैव ही गोष्ट आपल्याला मिळालेली देणगी आहे, अस म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दैव म्हणजे आपल्याला लाभलेला थोरा मोठ्यांचा आशीर्वाद असतो. आपल्यासाठी त्यांनी केलेली प्रार्थना असते.

Advertisement

भाग्य हे आपल्याला आपल्या पूर्वजन्माच्या सुकृताने मिळालेले असते. एखादी इच्छा व्यक्त केली की लगेच पूर्ण होणे, एखादी गोष्ट विनासायास सहजपणाने मिळणे हे तुमचे भाग्य असते, अश्या या भाग्याने मिळालेल्या गोष्टीवर गर्व करायचा नसतो, त्याचा वृथा अभिमान बाळगायचा नसतो, तर त्याची जाणीव ठेवून त्या गोष्टीची किंमत बाळगायची असते.आणि नशीबाच्या बाबतीत बोलायचे झाले तर तुझे नशीब घडवण्याचे सामर्थ्य तुझ्या हातात आहे, हे आपण नेहमीच ऐकतो, वाचतो म्हणजेच आपले नशीब घडवण्यासाठी फक्त आणि फक्त आपणच कारणीभूत असतो, आहे त्या परिस्थितीत, आहे त्या साधनसामग्री मध्ये, कोणत्याही नसलेल्या गोष्टीचे शल्य न बाळगता केवळ आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायचे असते. आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत रहायचे असते. तरच आपल्याला आपल्या नशीबात असलेल्या गोष्टी मिळवता येतात. एकंदरीतच, प्रारब्ध, नियती, दैव, भाग्य आणि शेवटी नशीब चांगले हवे असेल तर आपले कर्म चांगले हवे, आपली नियत चांगली हवी, आपले विचार आपले प्रयत्न प्रामाणिक हवेत. तर आणि तरच आपण आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी साध्य करु शकणार आहोत…. म्हणून तर म्हटलं …*कर भला तो हो भला*….😊

स्वप्ना

गार्गी ज्योतिषलय, संभाजीनगर, सातारा – ९८२२३०३०५४


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!