भाजपचे मोहोळ यांचा अर्ज दाखल
भाजपचे मोहोळ, एमआयएमचे सुंडके
यांचे अर्ज दाखल
राजेंद्र पंढरपुरे
पुणे शहर लोकसभा मतदारसंघात लोकसभेची निवडणूक चौरंगी होणार हे आता स्पष्ट झाले.
भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. कोथरूड पासून डेक्कन जिमखान्यापर्यंत चार किलोमीटर ची रॅली त्यांनी काढली. रॅलीच्या सांगतेला उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्य मंत्री अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार मेधा कुलकर्णी, राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर तसेच महायुतीचे शिरूर मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील उपस्थित होते.
एमआयएम चे उमेदवार अनिस सुंडके यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे पुण्यातील लोकसभा निवडणूक आता चौरंगी झाली आहे. यापूर्वी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आमदार रविंद्र धंगेकर, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत आणि त्यांनी प्रचारही धडाकेबाजपणे सुरू केला आहे.
मतदानाची टक्केवारी वाढली, तर महायुतीला फायदा आहे, याकरिता मतदान वाढवण्यावर भर द्या, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले.
एमआयएम ही भाजपची बी टीम असल्याचा काँग्रेस पक्षाचा आरोप उमेदवार अनिस सुंडके यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना खोडून काढला. पुण्याच्या प्रश्नांबाबत आपण लढत राहू, असे सांगितले.