निवडणुकीतील सुयश आणि ग्रहयोग..स्वप्ना पवार
- निवडणूकीतील सुयश आणि आवश्यक ग्रहयोग….
भाग – १
गेल्या एप्रिल पासून महिन्यापासूनच संपूर्ण देशात निवडणूकीचे धुमशान सुरू झाले आहे, त्यामध्ये पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया दि. १९ एप्रिल २०२४ रोजी पूर्ण झाली आहे, आणि आज महाराष्ट्रासह इतरही अनेक ठिकाणी दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाले आहे. आपल्या पश्चिम महाराष्ट्रतही निवडणुकीचे तापमान हे बाहेरच्या वातावरणाच्या तापमानापेक्षा जास्त तापू लागलंय, सर्वत्र प्रचारसभा अगदी जोरो शोरोसे सुरू आहेत… या निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांविरोधात उभे असणारे उमेदवार व त्यांचे पक्ष श्रेष्ठी सर्वचजण एकमेकांवर आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत .(news channel वर त्याच्या होणाऱ्या प्रक्षेपणामूळे माझ्यासारख्या सामान्य जनतेचे तर एखाद्या daily soap च्या serial पेक्षाही जास्त रंजक मनोरंजन होतंय…. असो) आजचा आपला मूळ मुद्दा हा आहे की निवडणूक.. त्यामध्ये मिळणारे यश आणि उत्तम नेता होण्यासाठी आवश्यक असणारे गुण व त्यासाठी जन्मपत्रिकेत आवश्यक असणारी ग्रहस्थिती… याच विषयावर आज आपण ज्योतिषशास्त्रातील ग्रहयोग पाहणार आहोत, तुम्हाला जर निवडणूकीला उभं रहायच आहे आणि त्यात निवडून यायचं असेल, उत्तम नेता व्हायचं असेल तर तुमच्या जन्मपत्रिकेमध्ये कोणते ग्रह बलवान हवेत, कोणते ग्रहयोग हवेत किंवा निवडणुकीत मिळणाऱ्या यशासाठी कोणकोणते ग्रह तुम्हाला सहाय्यकारी ठरतात , निवडणूक जिंकण्यासाठी तुमच्या पत्रिकेतील कोणती स्थाने बलवान हवीत, याची चर्चा आपण या लेखमालेत करणार आहोत….त्यापैकी आजच्या आपल्या या लेखाच्या पहिल्या भागात आपण निवडणुकीत यशस्वी होण्यासाठी व उत्तम नेता होण्यासाठी कोणते ग्रह बलवान असावयास हवेत याची थोडक्यात चर्चा करणार आहोत…..
सर्वात आधी आपण निवडणुकीसाठी कोणते ग्रह महत्त्वाचे आहेत ते पाहू..
रवि –
तुम्हाला जर नेता व्हायचे असेल किंवा निवडणुकीमध्ये यश हवे तर सर्वात आधी तुमच्या पत्रिकेतील रवी बलवान हवा. कारण रवी हा ग्रह सरकार,शासन,अधिकार, नेतृत्व या सर्वाचा कारक आहे. रवि हा राजा आहे, नेता आहे, पुढारी आहे. तो इतर ग्रहांवर राज्य करतो, तसेच तुम्हाला जर जनतेवर राज्य करायचे तर तुम्हाला रवीची साथ ही हवीच हवी. रवी म्हणजे आत्मविश्वास, हा आत्मविश्वास तुमच्याकडे हवाच, तरच तुम्ही धडाडीने सार्वजनिक क्षेत्रात काम करु शकाल. तुमच्यामध्ये नेतृत्वाचे गुण जन्मजातच हवेत, तर आणि तरच तुम्ही उत्तम नेता होऊ शकता. सर्व राजकारण, सामाजिक दृष्टी, न्याय, संसद, या गोष्टींसाठी रवीच कारक ग्रह आहे, तुमच्या पत्रिकेमध्ये असणारी रवीची राशी, त्याचे असणारे स्थान व त्याला मिळणारी इतर ग्रहांची साथ यावर निवडणुकीतील यशापयश बरेचसे अवलंबून आहे.
मंगळ –
निवडणुकीतील यशासाठी रविखालोखाल मंगळ हा ग्रहदेखील तितकाच महत्त्वाचा आहे. मंगळ ही एक ऊर्जा आहे, मंगळ म्हणजे धैर्य, धाडस, शौर्य, साहस, उत्साह व सामर्थ्य….. एखाद्या उत्तम नेत्याकडे एक जोश हवा, सामर्थ्य हवे आणि धाडस तर हवेच हवे… वेळप्रसंगी कोणाचाही मुलाहिजा न बाळगता परखडपणे व स्पष्टपणे आपली भूमिका आपल्याला मांडता यायला हवी, आपल्या वृत्तीमध्ये बेधडकपणा हवा आणि त्यासाठी तुम्हाला मंगळ हा ग्रह नक्कीच सहाय्यकारी ठरतो… त्यामुळे तुम्हाला निवडणुकीत यशस्वी व्हायचे तर तुमच्या पत्रिकेमध्ये मंगळ हा देखील बलवान हवा.
राहू –
रवी मंगळाबरोबरच राहू हा ग्रहदेखील निवडणुकीतील यशासाठी किंवा उत्तम नेता होण्यासाठी आवश्यक असणारा ग्रह आहे. राहू हा मुळातच सामाजिक कार्याचा भोक्ता असणारा ग्रह आहे. राहू हा मुत्सद्दी ग्रह आहे, राजकारणी आहे, क्रांती करणारा आहे, पत्रिकेमध्ये बलवान असणारा राहू तुम्हाला उच्च महत्त्वाकांक्षा प्रदान करतो. समाजकारण, राजकारण, सार्वजनिक कामे यामध्ये कार्यरत राहण्यासाठी तुम्हाला या पराक्रमी राहूचे विशेष सहाय्य लाभते. राहू हा गनिमीकाव्याचा देखील कारक ग्रह आहे, त्यामुळे वेळप्रसंगी एखाद्या उत्तम नेत्याला गनिमीकावा करुन आपल्या शत्रूला नामोहरम करता यायला हवे. राजकारणातील यशासाठी, निवडणुकीतील यशासाठी अत्यंत मुत्सद्दी, राजकारणी व व्यवहारकुशल असणारा राहू हा ग्रहदेखील आपल्या पत्रिकेत तितकाच बलवान हवा.
( क्रमशः…)
स्वप्ना पवार
गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा – ९८२२३०३०५४