महाराष्ट्र दिानिमित्त…
महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन 1 मे रोजी साजरा होत असतो. या दोन्ही दिवसांच्या मागचा इतिहास जरी वेगळा असला तरी या दिवसामध्ये एक साम्य आहे, अन्यायाच्या विरोधात प्रतिकार करण्याचं, हक्कासाठी संघर्ष उभारण्याचं आणि प्रसंगी बलीदानाचीही पर्वा न करता इतिहास रचण्याचं! मराठी भाषिकांवर होऊ घातलेला अन्यायकारक राज्य स्थापनेचा घाट राज्यातील कष्टकरी कामगारांनी उधळून लावला आणि महाराष्ट्राची स्थापना केली. यासाठी 106 हुतात्मांनी आपले प्राण अर्पण केले. यात आघाडीवर होता तो मुंबईचा गिरणी कामगार. आपल्या विरोधात होणाऱ्या हक्कांची जाणीव झालेल्या या संघटीत कामगारांनी महाराष्ट्र स्थापनेच्या लढ्यात निर्णायक भूमिका बजावली. या कामगारांनी केलेल्या लढ्याच्या नेतृत्वाची मूळची प्रेरणा जागतिक कामगार चळवळीतून मिळालेली होती. त्यामुळे या दोन्ही लढ्यांचा गौरवशाली इतिहास समजून घेणं महत्त्वाचं ठरतं.
आंतरराष्ट्रीय कामगार दिन
1 मे हा दिवस जगभर कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात जगभरातील कामगार चांगल्या कामाच्या परिस्थिती आणि अधिकारांसाठी एकत्र येऊ लागले. 1 मे 1886 रोजी कामगारांनी आठ तासांच्या कामाच्या दिवसाच्या मागणीसाठी शिकागोतील कामगार रस्त्यावर उतरले. हेमार्केट स्क्वेअरमध्ये श्रमिक रॅलीदरम्यान बॉम्बचा स्फोट झाल्यावर शांततापूर्ण निदर्शन सुरू असताना त्याला हिंसक वळण मिळालं. परिणामी पोलीस अधिकारी आणि आंदोलक दोघेही जखमी झाले. कामगारांच्या हक्कांसाठीच्या लढ्याचे प्रतीक असलेल्या या आंदोलनानं जगभरातील कामगार चळवळीला चालना दिली.