पुणे तापले
पुण्याचे तापमान बिघडले
पुणे – शाळांना सुट्टी लागली की पुण्यात अनेक कार्यक्रम, उपक्रम यांची रेलचेल सुरू होते. अबालवृद्धांसाठी हा पर्वणीचा काळ असतो. मे महिन्याच्या सुट्टीसाठी राज्यातल्या अनेक भागांमधून पुण्याकडे लोकं धाव घेतात. पण, यंदा मात्र तापमानात खूप वाढ झाल्याने सुट्टी चा आनंद मिळेनासा झाला आहे तसेच लोकसभा निवडणूक प्रचारातही रंगत येईनाशी झाली आहे.
साधारणतः महाशिवरात्रीपासून पुण्याच्या तापमानात वाढ व्हायला सुरुवात होते. होळी नंतर उन्हाचा चटका जाणवायला लागतो. २०, २५ वर्षांपूर्वीपर्यंत ३९ अंश सेल्सिअस इतके तापमान असायचे. त्यानंतर यात बदल होत गेले. गेली काही वर्षे एप्रिल, मे महिन्यात ४१ अंश सेल्सिअस पर्यंत तापमान वाढले. गेली दोन, तीन वर्षे यात वाढ होऊन ते ४२, ४३ अंश सेल्सिअस पर्यंत वाढले आहे. सकाळी ८ वाजल्यापासूनच उन्हाचा तडाखा जाणवू लागतो, तो संध्याकाळी ६ वाजेपर्यंत असतोच. त्यामुळे लहान मुलं, वयस्कर व्यक्ती यांचा वावर जाणवत नाही. सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी पदयात्रा निघतात, त्यात ६० वय पार केलेले नेते, कार्यकर्ते सहभागी होऊ शकत नाहीत. यंदाची उन्हाची तल्लखी पाहाता, घरातच बसून राहा, असे डॉक्टरांनी सांगितल्यामुळे मी घरातच असतो, प्रचार फेरीत जात नाही, असे भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले. अजून आठवडाभर उष्णतेची लाट जाणवेल, असा भारतीय वेधशाळेचा अंदाज आहे.
शहरात अलीकडे झालेले कॉंक्रीटचे रस्ते, ११ मजली उंच इमारती, एसी चा वारेमाप वापर, आकसलेलं नदी पात्र, वृक्षतोड यामुळे उन्हाळा अधिक जाणवू लागला आहे, असे मत जुन्या पुणेकरांचे आहे. विदर्भातून आलेल्या एका महिलेने तर सांगितले की, पुणे आणि विदर्भ येथील तापमान आता सारखेच वाटते. पुण्याच्या बदलेल्या तापमानावर ठोस उपाययोजना करण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून काही हालचाल दिसत नाही, तसेच त्याविषयी नागरिकांमध्येही उदासीनताच दिसते, असे निरिक्षण काही स्वयंसेवी संघटनांनी नोंदविले आहे.