मोदींची पुणे सभा: दावे प्रतिदावे
मोदींच्या सभेसंदर्भात
पुण्यात दावे-प्रतिदावे
पुणे – लोकसभा निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सोमवारी सायंकाळी रेसकोर्स मैदानावर झाली. त्या सभेच्या यशस्वीततेबाबत अनेख दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत.
पुण्याच्या पूर्व भागातील रेसकोर्सच्या विस्तीर्ण मैदानावर ही सभा झाली. १९७१ साली माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जाहीर सभा या मैदानावर झाली होती. बांगला देश विजयानंतर झालेल्या या सभेला अलोट गर्दी झाली होती. त्यानंतर काल मोदींची सभा झाली. भारतीय जनता पक्षाने या सभेसाठी प्रचंड तयारी केली होती. उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी मोदींसाठी विशेष पगडी तयार करून घेतली होती. ती पगडी घालूनच मोदींनी भाषण केले. मैदानावर ‘केसरिया सागर’ उसळलेला मला दिसत आहे, असे या सभेचे वर्णन खुद्द मोदींनीच केले. प्रत्येक पुणेकराला माझा ‘जय श्रीराम सांगा’ असा संदेश मोदी यांनी भाषणाच्या शेवटी उपस्थितांना दिला.
सध्या पुण्यात ४२अंश सेल्सिअस तापमान असताना सुद्धा दुपारी चार वाजता सभेसाठी लोकांची गर्दी होऊ लागली होती. उन्हाळी टोप्या आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मैदानावर करण्यात आली होती. टाळ्या, शिट्या आणि जयजयकारात मोदी यांचे स्वागत करण्यात आले.
सभा चालू असताना मैदानावरच्या अगदी शेवटच्या रांगेतील रिकाम्या खूर्च्यांचे फोटो काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर टाकले. सभेला फारसा प्रतिसाद नसून भाषण चालू असताना लोकं निघून चाललेली आहेत, असे दृश्य दाखविण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. त्याचा प्रतिवाथ करणारे गर्दी आणि जल्लोषाचे फोटोज्, व्हिडिओ भाजप कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केले.
काँग्रेस पक्षाने रेसकोर्सवर सभा घेऊनच दाखवावी, असे आव्हान भाजपच्या नेत्यांनी काँग्रेसला दिले. काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांची सभा दिनांक ३मे रोजी पुण्यातील एसएसपीएमएस मैदानावर होणार आहे. त्याही दिवशी सोशल मीडियावर भाजप आणि काँग्रेस मधील ‘वॉर’ पाहायला मिळेल.