पर्यटनाची शाश्वत वाढ आणि विकास” या विषयावर चर्चासत्र संपन्न
“पर्यटनाची शाश्वत वाढ आणि विकास” या विषयावर चर्चासत्र संपन्न
पुणे, दि. ५: पर्यटन संचालनालय व जेटीडीएम फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने व राष्ट्रीय पर्यटन दिवसाच्या औचित्याने शिवसृष्टी, आंबेगाव, येथील बहुउद्देशीय सभागृहात “पर्यटनाची शाश्वत वाढ आणि विकास” या विषयावर पर्यटनाशी निगडीत व्यावसायिकांसाठी मार्गदर्शक चर्चासत्र नुकतेच संपन्न झाले.
यावेळी पुणे शहरातील तसेच सोलापूर, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतील कृषी पर्यटन चालक व पर्यटन व्यवसायातील अनेक सुप्रसिद्ध तंत्रज्ञ व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय पर्यटन स्थळांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना जागतिक स्तरावर आणणे या उद्देशाने राष्ट्रीय पर्यटन दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने आयोजित चर्चासत्रात केसरी टुर्सच्या झेलम चौबळ यांनी शाश्वत पर्यटन, गिरीप्रेमी अॅडव्हेंचर फाऊंडेशनचे उमेश झिरपे यांनी गिर्यारोहणाचा पर्यटनातील सहभाग, भारती विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. गिरीश चारवड यांनी कलेचा पर्यटन समृद्धीसाठीचा सहभाग, कोमसेंट टेक्नॉलजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा व्यवसाय सल्लागार सागर बाबर यांनी पर्यटनातील डिजिटल मार्केटिंग, मॅनेजमेंट ट्रेनर, आउटडोर आणि अॅडवेंचर कन्सलटंट जितेंद्र देशमुख यांनी अनुभवात्मक पर्यटन, मिहिर टुरिझमचे सुधीर करंदीकर यांनी महाराष्ट्र टुरिझम सर्किट, प्राध्यापक आणि शिवव्याख्याते विनायक खोत यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि पर्यटन- संधी आणि आव्हाने या विषयांवर मार्गदर्शन केले.
यावेळी पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांमधील सर्व कृषी पर्यटन केंद्रांची माहिती देणारे नकाशे प्रकाशित करण्यात आले. तसेच सर्व उपस्थितांना महा बुकिंग इंजिन आणि “आई” योजनेची माहिती देण्यात आली, असे विभागीय पर्यटन कार्यालयाच्या उपसंचालक शमा पवार यांनी कळविले आहे.
0000