जनजागृतीसाठी कार्यशाळा


सातारा जिल्हा परिषदेत विधी सेवा प्राधिकरणामार्फत माहिती अधिकार कायदा-2005चे जनजागृतीसाठी कार्यशाळा संपन्न

Advertisement

दैनंदिन कार्यालयीन कामकाजामध्ये सातारा जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या विविध विभागात माहिती अधिकार अधिनियम -2005 अंतर्गत विविध अर्ज प्राप्त होत असतात. सदर माहिती अधिकार अर्जांच्या अनुषंगाने अर्जदारास वेळीवेळी विविध प्रकारची माहिती द्यावी लागते. सदर माहिती देताना अधिकारी व कर्मचारी यांना सुलभता व्हावी व माहिती अधिकार अधिनियम -2005 अंतर्गत कोणतीही अडचण येऊ नये हा उद्देश ठेवून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा परिषद, सातारा यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेतील विविध विभागातील अधिकारी/ कर्मचारी यांचेसाठी कार्यशाळा छत्रपती शिवाजी महाराज सभागृह , सातारा जिल्हा परिषद, सातारा येथे आज दि.11 फेब्रुवारी 2025 रोजी 11.30 वाजता संपन्न झाली.
सदर कार्यशाळेमध्ये श्रीमती निना बेदरकर , सचिव, जिल्हा सेवा प्राधिकरण , सातारा व श्री.शिवाजी राऊत, महात्मा गांधी स्मारक समिती अध्यक्ष, सातारा यांनी कर्मचाऱ्यांना माहिती अधिकार अधिनियम-2005 अंतर्गत येणाऱ्या सर्व कलमांचा परिचय करुन दिला. तसेच माहिती अधिकार कायद्याची व्याप्ती, महत्व व उपयोगिता याबाबत अनमोल मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे माहिती अधिकार कायद्याच्या अनुषंगाने विविध अर्जावर करावयाची कार्यवाही , अर्जाबाबतची कालमर्यादा, दंडात्मक कारवाई तसेच माहिती अधिकार कायद्यांतर्गत देण्यात येणाऱ्या माहितीचे स्वरुप याबाबतचे सविस्तर विश्लेषण केले.
सदर कार्यशाळेमुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना माहिती अधिकार कायद्याच्या अनुषंगाने प्राप्त होणा-या अर्जावर कार्यवाही करताना निश्चितच फायदा होईल असे मत श्री. निलेश घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( सामान्य प्रशासन ), सातारा जिल्हा परिषद सातारा यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमासाठी सातारा जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागातील जनमाहिती अधिकारी , सहाय्यक माहिती अधिकारी व सर्व कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यशाळेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शनाचे काम श्री. राजेंद्र पाटील, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, सातारा जिल्हा परिषद, सातारा यांनी केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!