पुणे वार्ता (31.01.2025…)


नगर विकास विभाग हा महाराष्ट्राच्या विकासाचा कणा- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नगर विकास विभागाने सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय समतोल राखून विकास करावा-उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. 31: शहरी आणि ग्रामीण भागाचा सुनियोजित विकास करण्याचे काम नगर विकास विभागाच्यावतीने करण्यात येते; विभागाचे अधिकारी- कर्मचारी शहरी आणि ग्रामीण भागातील नगररचनेचे खऱ्या अर्थाने शिल्पकार आहेत, त्यामुळे नगर विकास विभाग हा महाराष्ट्राच्या विकासाचा कणा आहे, असे प्रतिपादन असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

यावेळी नगरविकास, नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागाच्यावतीने आयोजित गुणवंत अधिकारी व कर्मचारी पुरस्कार वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव इंजि. असीम गुप्ता, नगर रचना संचालक अविनाश पाटील, डॉ. प्रतिभा भदाणे, सुलेखा वैजारपूरकर, सुनील मरळे आदी उपस्थित होते.

श्री. शिंदे म्हणाले, महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक नागरीकरण असलेले राज्य आहे, शहरी भागातील वाढती लोकसंख्या, पर्यावरणाची हानी, वाढते प्रदूषण, पिण्याचे पाणी, आदी आव्हाने स्वीकारुन नगर रचना विभागाने पायाभूत सुविधा निर्मितीबाबतचे नियोजन करावे. शहराचा गतिमान विकास करताना तो सर्वसमोवशक, सुनियोजित आणि शाश्वत असला पाहिजे. तापमान वाढ, हवामान बदलांचा विचार करुन शहरी व ग्रामीण भागाचा पर्यावरणपूरक विकास करावा लागेल. मलनि:सारण प्रकल्पांतर्गत प्रक्रिया केलेले पाणी बागबगीचा, औद्यागिक क्षेत्र तसेच बांधकामाकरिता वापर करणे बंधनकारक करण्यातबाबतचा निर्णय घ्यावा लागेल.

प्रलंबित प्रकल्प गतीने पूर्ण मार्गी लावणे ही राज्य शासनाची प्राथमिकता
विकासाची विषयपत्रिका घेऊन प्रलंबित प्रकल्प गतीने पूर्ण करण्यावर राज्यशासनाचा भर आहे, त्यामुळे शहराचा विकास कालबद्ध पद्धतीने विकास करणे आपली जबाबदारी आहे. अधिकारी- कर्मचाऱ्यांनी प्रलंबित नगर रचना आराखड्याची कामे वेळेत मार्गी लावावेत. नागरिकांची गैरसोय टाळण्याकरीता कठोर पावले उचलावीत. विकास आराखडा तयार करताना सार्वजनिक हीत विचारात घेऊन नागरिकांना अधिकाधिक सोई-सुविधा मिळाल्या पाहिजे, येत्या काळात शहरांची अनियंत्रित वाढ होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी.

महानगरपालिका व नगरपालिकांनी ‘शहर आराखडा शाखा’ निर्माण करा
शहरातील वाढते नागरिकीकरण, त्यातून निर्माण होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याकरीता महानगरपालिका व नगरपालिकेने ‘शहर आराखडा शाखा’ निर्माण करावी. यामध्ये तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करावी. मुंबई व ठाण्याच्या धर्तीवर पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास ‘समूह विकास’ (क्लस्टर डेव्हलपमेंट) पद्धतीने केला पाहिजे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करुन दिल्यास त्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण होईल.

*कामकाजात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करण्यावर भर द्यावा*
विभागाने कामकाजात भौगोलिक माहिती यंत्रणा अर्थात ‘जीआयएस’ आधारित नगर नियोजन, कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे. विभागाने नगररचनाकार, लोकसहभाग, विविध सामाजिक संस्थाना सोबत घेऊन नागरिकांना सुविधा देण्याची कामे करावीत. शहरात सुशोभीकरणाच्या स्पर्धा आयोजित कराव्यात. शहरातील संकल्पनेत नाविन्य असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण (ऑयकॉनिक) इमारती बांधण्यावर करण्याकरिता विकसकांना प्रोत्साहित केले पाहिजे. नागरिकांच्या हिताचे निर्णय घेऊन प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे शासन भक्कमपणे उभे आहे, असेही श्री. शिंदे म्हणाले.

नगर विकास विभागाने सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय समतोल राखून विकास करावा- अजित पवार

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, पुणे शहरापेक्षा पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या 2054 साली अधिक होण्याचा आणि दोन्ही शहराची मिळून ती सुमारे 2 कोटी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नगर रचना आणि मुल्य निधारण विभागाने हा महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रातील नगरविकास आराखडे आणि नगरविकास इतक्यापुरताच मर्यादित विचार न करता या क्षेत्रांचा सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय समतोल राखून विकास साधावा.

ते पुढे म्हणाले, शहरातील वाढती लोकसंख्या, नदी प्रदूषण, पाणी, कचरा, अरुंद रस्ते, जमीन, वाहतूक समस्या, हवामानातील बदल, वाढते तापमान आदी आव्हानांचा सामना करुन पुढे जाण्याची गरज आहे. शहराच्यातील सार्वजनिक वाहतूक सुरळीत ठेवण्याकरिता योग्य पद्धतीने नियोजन करुन वाहतुकीचे प्रश्न मार्गी लावण्यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यामुळे नगर रचना विकास आराखडे वेळेत मंजूर करुन कामे मार्गी लावावीत. हा विभाग शहरीकरणाच्या प्रवासातील महत्त्वाचा घटक झाला आहे. या अनुषंगाने विभागाने विविध बाबींचा विचार करुन आधुनिक काळाच्या गरजा लक्षात घ्याव्यात.

पारदर्शक व सुनियोजित पद्धतीने शहर व ग्रामीण नियोजनाची कामे करुन विकासाची दिशा ठरविण्यादृष्टीने कामे करावीत. महानगरपालिकेने ठराविक क्षेत्र आरक्षित करुन केवळ वृक्ष लागवडच केली पाहिजे. हरित व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन नियोजन करणे गरजेचे आहे. शहरालगत असलेल्या गावांतील नागरिकांना सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हावा तसेच सर्वसमावेशक विकास कामे होतील, याबाबत दक्षता घ्यावी.

चांगल्या काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कष्टाचे, निष्ठेचे आणि उत्कृष्ट कार्याचा गौरव होतो. प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये सुप्त गुण असतात, त्यांच्या अंगी असलेल्या विविध कल्पना, सूचनांचा विभागाला लाभ झाला पाहिजे. हा त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा सोहळा आहे, असेही श्री. पवार म्हणाले.

श्री. गुप्ता म्हणाले, नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागात नागरिकांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्याकरीता काम करण्यासोबत याकरीता आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर राहणार आहे. विभागांर्तगत देण्यात येणाऱ्या परवानग्या आनलाईन पद्धतीने देण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

श्री. पाटील यांनी विभागाच्यावतीने करण्यात येणाऱ्या कामाबाबत माहिती दिली.

यावेळी उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते ‘स्वराज्य अभियंता हिरोजी इंदूलकर’ पुरस्काराचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना वितरण करण्यात आले. यावेळी नगर विकास विभाग आणि सीईपीटी अहमदाबाद, गोखले इन्स्टिट्यूट, पुणे, आयआयटी रुरकी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेयर्स या संस्थांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला.

कार्यक्रमापूर्वी उपमुख्यमंत्र्यांनी विभागाच्यावतीने लावण्यात आलेल्या प्रदर्शनास भेट देऊन विभागाशी संबंधित विविध बाबींची माहिती घेतली.

यावेळी सुधारित ‘एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली’चे आणि ‘नियोजन विचार’ या मासिकाचे प्रकाशन करण्यात आले.
0000

******

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते थिएटर अकॅडमी येथील नवीन इमारतीचे भूमिपूजन

पुणे, दि. ३१: मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीतून महाराष्ट्रीय मंडळाच्या आवारात ‘थिएटर अकॅडमी’त कलाकारांसाठी बांधण्यात येणाऱ्या इमारतीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे, सिद्धार्थ शिरोळे, थिएटर अकॅडमीचे अध्यक्ष प्रसाद पुरंदरे तसेच थिएटर अकॅडमी व महाराष्ट्रीय मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. राज ठाकरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, या इमारतीच्या कामासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतीमध्ये कलाकारांसाठी राहण्याची व्यवस्था, सरावासाठी सभागृह, बहुउद्देशीय हॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्रीय मंडळ ही संस्था १०० वर्षांपासून तर थिएटर अकॅडमी ५० वर्षापासून कार्यरत आहे.

मुकुंद नगर येथील थिएटर अकॅडमी ही संस्था बाबासाहेब पुरंदरे यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन लाभलेली संस्था आहे. महाराष्ट्रीय मंडळ ही संस्था पोलीस भरती आणि सैन्य भरतीसाठी जाणाऱ्या मुलांकरीता मोलाचे कार्य करत आहे. या संस्थांच्या कार्यासाठी शासन पाठीशी आहे, असे श्री. शिंदे म्हणाले.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी थिएटर अकॅडमीची पाहणी केली.
0000

***

शिवजयंती दिनी शिवप्रेमींना आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात- जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

पुणे, दि. 31: आगामी शिवजयंती उत्सवासाठी येणाऱ्या शिवप्रेमींना पुरेसे पिण्याचे पाणी, वैद्यकीय उपचार, औषधे आदी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करण्याचे नियोजन करावे. सर्व यंत्रणांनी समन्वयाने शिवजयंती उत्सव यशस्वी करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले.

शिवजयंतीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार शरद सोनावणे, पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जुन्नरचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, तहसीलदार सुनिल शेळके, गटविकास अधिकारी विठ्ठल भोईर आदी उपस्थित होते.

शिवजयंती उत्सव नेहमीप्रमाणे उत्साहात साजरा करण्याच्यादृष्टीने सर्व विभागांनी सतत समन्वयात रहावे. किल्ल्याची साफसफाई चांगल्या प्रकारे होईल यासाठी आवश्यक ती साधने पुरवावीत. नागरीकांना पुरविण्यासाठीच्या पिण्याच्या पाण्याची दोनदा तपासणी करावी. शिवजयंतीसाठी गतवर्षी आलेल्या नागरिकांची संख्या लक्षात घेत यावर्षीचा अंदाज घेऊन शौचालयांची संख्या वाढवावी, आरोग्य विभागाच्या बूथवर मुबलक औषधे व ओआरएसची पाकिटे ठेवावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डुडी यांनी दिल्या.

Advertisement

ते पुढे म्हणाले, किल्ल्याची सर्व स्वच्छता पुरातत्व विभागाने करावी, नगर परिषदेने स्वच्छ पाणी पुरवठा करावा, राज्य परिवहन महामंडळाने चांगल्या बसेस पुरवाव्यात, शिवजयंतीच्या कालावधीत विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही यांची काळजी घ्यावी. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने नेहमीसारखे स्थानिक नागरिकांचे सहकार्य घ्यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

यावेळी आमदार श्री. सोनवणे यांनीही विविध सूचना केल्या.
0000

100 दिवसाच्या कार्यक्रमात वाहतूक कोंडी सोडविण्याच्या उपाययोजनांचा समावेश करा- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

पुणे, : पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याकरीता स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था, नागरिकांना विश्वासात घेत सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. यासंबंधात आलेल्या सूचनाही विचारात घ्यावात, 100 दिवसाच्या कार्यक्रमात वाहतूक कोंडी सोडविण्याच्या उपाययोजनांचा समावेश करण्यात यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

विधानभवन येथे आयोजित वाहतूक समस्येबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, आमदार योगेश टिळेकर, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, शरद सोनवणे, ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके, बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे, शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, पीएमपीएलच्या व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ-मुंडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या विचारात घेता सर्वांनी वाहतूक कोंडी कमी करण्याकरीता पुढाकार घ्यावा. रस्त्यावरील अतिक्रमणाची ठिकाणे निश्चित करुन महानगरपालिकेने ते अतिक्रमण तात्काळ काढावेत, रस्ते आणि वाहतुकीच्या प्रकल्पांसाठी आवश्यक भूसंपादनाच्या कार्यवाहीला गती द्यावी. याकरिता आवश्यकतेप्रमाणे पोलीस विभागाची मदत घ्यावी. याकरिता अत्याधुनिक साधने, कृत्रिम बुद्धीमत्तेसारख्या (एआय) नवनवीन तंत्रज्ञानाची तसेच या विषयाशी निगडीत तज्ज्ञ व्यक्तींची मदत घ्यावी. भूसंपादनाची प्रलंबित असलेली न्यायालयीन प्रकरणे मार्गी लावण्याबाबत कार्यवाही करावी.

पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याकरीता पुणे महागरपालिकेकडे असलेली वाहतूक सिग्नल यंत्रणा पोलीस आयुक्तालयाकडे हस्तातरीत करावी. नवले पुलाचे प्रलंबित कामे गतीने पूर्ण करावीत. स्मार्ट सिटी कार्यालयातील वाहतूक व्यवस्थापन यंत्रणेंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेवा पोलीस आयुक्ताकडे वर्ग करावी, अशाही सूचना श्री. पवार यांनी दिल्या.

अहिल्यानगर व सोलापूर महामार्गावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी ट्रव्हॅल्स थांब्याकरीता जागा निश्चित कराव्यात. सुरक्षितेतच्यादृष्टीने त्याठिकाणी सीसीटिव्ही, वीज आणि शौचालय, पिण्याचे पाण्याची व्यवस्था करावी.

चाकण परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्याकरीता पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पोलीस आयुक्तालय आणि महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने मिळून कार्यवाही करावी. वाहतूक सुरळीत राहण्याच्यादृष्टीने पायाभूत सुविधा उभाराव्यात. यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असेही श्री. पवार म्हणाले.

राज्यमंत्री श्रीमती मिसाळ, खासदार श्रीमती कुलकर्णी यांनी शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासोबत अनधिकृत अतिक्रमण काढण्याची सूचना केली. आमदार श्री. तापकीर, श्री. शिवतारे, श्री. पठारे यांनी वाहतूक कोंडी दूर करण्याबाबत सूचना केल्या.

श्री. हर्डीकर म्हणाले, शहरातील वाहतूकीची समस्या सोडविण्याकरीता मेट्रो पोहचू शकत नाही, अशा ठिकाणी पीएमपीएलच्या बसेसच्या फेऱ्यामध्ये वाढ करावी लागेल. नागरिकांना परवडेल असे भाडेदरात आकारणी करावी लागेल, असे श्री. हर्डीकर म्हणाले.

पोलीस आयुक्त श्री. कुमार म्हणाले, आगामी काळात होणारी लोकसंख्येतील वाढ व रस्त्यांची रुंदी विचारात घेता शहरात वाघोली, सोलापूर मार्गासह विविध भागात थांबणाऱ्या ट्रॅव्हल्सकरीता धोरण राबविणे गरजेचे आहे. शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याकरीता कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करण्यावर भर असल्याचे श्री. कुमार यांनी सांगितले.

डॉ. भोसले म्हणाले, पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडण्याकरीता बैठकीत दिलेल्या सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. याकरीता सर्व संबंधित यंत्रणेला विचारात घेवून प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यात येतील.

श्री. म्हसे म्हणाले, वाहतूकीच्यादृष्टीने पीएमआरडीएच्यावतीने शहर परिसरात मल्टीमोडल हब विकास आराखड्याअंतर्गत कामे सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

श्री. शेखर सिंह आणि अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी वाहतूक कोंडी तसेच ती सोडविण्याबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत सादरीकरण करुन माहिती दिली.
0000

महामेट्रोकडून जिल्ह्यातील सर्वंकष वाहतूक आराखडा सादर

लोकप्रतिनिधींनी आराखड्याचा अभ्यास करुन सूचना कळवाव्यात- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे,  : जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या आणि रोजगारांची संख्या लक्षात घेऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये वाढ करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने महामेट्रोकडून सादर पुढील ३० वर्षाच्या १ लाख २६ हजार ४८९ कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक वाहतूक आराखड्यामध्ये काही बदल, सूचना असल्यास सर्व लोकप्रतिनिधींनी येत्या ७ ते १० दिवसांमध्ये महामेट्रोला लेखी स्वरुपात कळवाव्यात, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे महानगर प्रभाव क्षेत्रातील सर्वंकष वाहतूक आराखडा अद्ययावत करणे व पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते. यावेळी क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार सुप्रिया सुळे, मेधा कुलकर्णी, सुनेत्रा पवार, आमदार अमित गोरखे, चेतन तुपे, योगेश टिळेकर, विजय शिवतारे, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, बापूसाहेब पठारे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पीएमपीएलच्या व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ- मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, लोकप्रतिनिधींना मेट्रोने सादर केलेल्या आराखड्याचा अभ्यास करुन त्यांना वाहतूक व्यवस्थेच्या अनुषंगाने वाहतूक कोंडी कशी कमी करता येईल त्यासाठी नवीन मार्ग, पर्यायी रस्ते आदींबाबत मेट्रोकडे सूचना कळवाव्यात. महामेट्रोकडून त्याबाबत तांत्रिक तसेच आर्थिक व्यवहार्यता तपासून आवश्यकतेप्रमाणे आराखड्यात बदल करण्यात येतील.

यावेळी श्री. हर्डीकर यांनी सादरीकरणाद्वारे बैठकीत हिंजवडी ते जिल्हा न्यायालय, पिंपरी चिंचवड ते निगडी व स्वारगेट ते कात्रज या मार्गावर नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या मेट्रो लाईन, बीआरटी व रेल्वे लाईन, मांगडेवाडी, कदम वस्ती, लोणीकंद व मोशी या ठिकाणी नवीन बस टर्मीनल, कोथरुड, कात्रज, हडपसर, मार्केटयार्ड व पिंपरी बस डेपोचा पुनर्विकास, पूलगेट, चिंचवड, भोसरी, निगडी, मुखई चौक, चिखली, वाघोली, रांजणगाव, तळेगाव व चाकण येथील जुन्या बस टर्मीनलचा पुनर्विकास, रिंग रोड, मिसींग लिंक, रेल्वे जंक्शनचा विकास, सायकल ट्रॅक, फूटपाथमध्ये सुधारणा, ट्रक टर्मीनल व लॉजिस्टिक हब, पार्कींग व्यवस्था, रस्ता रुंदीकरण, बसेसची उपलब्धता, रेल्वे ओव्हर ब्रीज, पीएमपीएमएलच्या नवीन मार्गावर बस सुरु करणे याविषयी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. तसेच केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दर पाच वर्षांनी वाहतूक आराखडा अद्ययावत करणे आवश्यक आहे. त्यानुसार आराखडा तयार करण्यात आला असल्याचे श्री. हर्डीकर यांनी सांगितले.

यावेळी श्रीमती सुळे यांनी वाहतूक विकास आराखडा तयार करताना पुरंदर येथील विमानतळाच्या जागेच्या अनुषंगाने सूचना केली.

श्री. शिवतारे यांनी पुणे ते लोणावळा लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात तसेच सासवड येथे बसडेपो सुरु करावा, पुणे ते नीरा लोकलची सेवा सुरु करावी, बंद केलेल्या मार्गावरील बसेस सुरु कराव्यात अशी मागणी केली.

श्री. तुपे म्हणाले, नवीन मुठा उजवा कालव्याच्या खडकवासला ते फुरसुंगीपर्यंत प्रस्तावित बोगद्यासाठी मंत्रिमंडळाने मान्यता देऊन पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे. संपूर्ण बोगद्याच्या अंतरापर्यंत जमिनीवर रस्ता आणि समांतर लोकल रेल्वे किंवा मेट्रो केल्यास वाहतुकीचा मोठा प्रश्न सुटू शकेल; त्याबाबत विचार व्हावा, असे ते म्हणाले.

आमदार श्री. तुपे यांनी मेट्रोच्या स्वारगेट कात्रज विस्तारित मार्गापासून कात्रज ते मंतरवाडी अशी सासवड मार्गाशी जोडणी प्रस्तावित करावी अशी मागणी केली.
0000


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!