झेडपीच्या ठराव समितीत विविध विषयांना मंजूरी
झेडपीच्या ठराव समितीत विविध विषयांना मंजूरी
सातारा / प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या ठराव समिती सभेत आरोग्य विभागातील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी कंत्राटी पदभरतीसह अन्य विषयांवर चर्चा करण्यात आली. यामधील काही विषयांना मंजुरी देण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभागृहात ठराव समितीची सभा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सीद, सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, महिला व बाल कल्याणच्या रोहिणी ढवळे, पाणी व स्वच्छता विभागाच्या प्रज्ञा माने, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मोहसीन मोदी, अमर नलवडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, जिल्हा जलसंधारण अधिकारी अरुणकुमार दिलपाक, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय लाड, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर आदी उपस्थित होते.
सभेत २८ जानेवारी रोजी झालेल्या सभेचा कार्यवृत्तांत वाचून कायम करण्यात आला. तसेच मागील ठरावावरील कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यात नवीन १२ प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू झाली आहेत. या केंद्रात कंत्राटी पद्धतीने तीन वर्षांसाठी पदभरतीबाबत चर्चा करण्यात आली. ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत देखभाल आणि दुरुस्तीसाठीच्या निधीमधून ग्रामीण भागातील हातपंप देखभाल आणि दुरुस्तीसाठी ८ वाहनचालक, ६ मदतनीस बाह्ययंत्रणेद्वारे नियुक्तीसाठी चर्चा करण्यात आली. तसेच या सभेतच ऐनवेळी आलेल्या विषयांवरही चर्चा करण्यात आली. त्यामधील काही विषयांना मान्यता देण्यात आली.