आरोग्य यंत्रणेने अलर्ट रहावे:-पालकमंत्री शंभूराज देसाई 


जीबीएस आजाराच्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणेने अलर्ट रहावे:-पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा दि. 5 : जीबीएस आजाराचे रुग्ण आढळत असून या आजाराच्या अनुषंगाने सर्व आरोग्य यंत्रणा व प्रशासन यांनी अलर्ट राहून उपायोजना कराव्यात. हा आजार दुषीत अन्न व पाण्यामुळे होत असल्याने पाण्याचे नमुने सातत्याने तपसावेत. सार्वजनिक उद्भवातून दुषीत पाणीपुरवठा होणार नाही, याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी. सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये पुरसा औषधसाठा ठेवावा, निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी दिवस-रात्र उपलब्ध रहाणे अनिवार्य असून रुग्णांच्या उपचारात कोणत्याही पद्धतीची हलगर्जी सहन केली जाणार नाही, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

जीबीएस आजाराबाबत पालकमंत्री श्री. देसाई यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, छत्रपती संभाजी महाराज महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रविंद्र चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी आदी उपस्थित होते.

जीबीएस आजाराचे रुग्ण अनेक ठिकाणी आढळत आहेत, या पार्श्वभूमीवर पालकमंत्री श्री. देसाई यांनी सातारा जिल्ह्यातील रुग्णस्थिती, करण्यात येणाऱ्या उपाययोजना यांचा आढावा घेतला. आजाराच्या उपायोजनांबरोबरच प्रतिबंधासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात यावीत. या आजाराचा उद्भव प्रामुख्याने दुषीत पाणी व दुषीत अन्न यामाध्यमातून होत असल्याने दररोज, ग्रामीण व शहरी भागातील पाण्याचे नमुने तपासण्यात यावेत. प्रत्येक ग्रामपंचायत, नगर पालिकेत पाणी शुद्धीकरणासाठी आवश्यक क्लोरीन पुरवठा ठेवावा. सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये जीबीएसच्या रुग्णांना प्राधान्याने त्वरीत उपचार मिळावेत यासाठी बेड राखीव ठेवावेत. योग्य औषधोपचाराने हा आजार बरा होणारा असून याबाबत भितीचे कोणतेही कारण नाही. नागरिकांनी मात्र दुषीत अन्न व पाणी टाळावे. आजाराबाबत कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये व नागरिकांनी घाबरुन ही जावू नये, असे आवाहन पालकमंत्री श्री. देसाई यांनी केले आहे.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. संतोष पाटील यांनी सध्या जिल्ह्यात या आजाराचे 7 रुग्ण असून या पैकी एक रुग्ण ससून रुग्णालय, पुणे, एक प्राथमिक आरोग्य केंद्र दिघंची ता. आटपाडी, जि.सांगली, एक रुग्ण कृष्णा हॉस्पीटल कराड, एक रुग्ण स्व. क्रांतिसिंहनाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत आहे. तीन रुग्ण बरे हाऊन घरी गेले आहेत, असे सांगून जीबीएस आजाराबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. ते म्हणाले , औषध खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीमधून 30 लाख रुपये देण्यात आले आहेत. आवश्यकता भासल्यास आणखी निधी उपलब्ध करुन दिला जाईल. स्व. क्रांतिसिंहनाना पाटील रुग्णालयात 10 बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये बेड राखीव ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व आरोग्य यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना या आजाराबाबत करावयाच्या उपाययोजनांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यात स्थिती नियंत्रणात आहेत. नागरिकांनी जीबीएस आजाराचे लक्षणे आढळल्या त्यांनी त्वरीत तपासणी करुन सातारा येथील स्व. क्रांतिसिंहनाना पाटील रुग्णालयात दाखल व्हावे. रुग्णांवर मोफत उपचार होतील.

*जीबीएस आजार म्हणजे काय* :
विविध रोगजंतूंपासून आपला बचाव करणारी आपली इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती जेव्हा आपल्याच शरीरावर हल्ला करते तेव्हा गिलान बार सिंड्रोम होतो. गिलान बार सिंड्रोम (Guillain-Barré Syndrome) म्हणजे GBS हा एक दुर्मिळ परंतु गंभीर स्वरूपाचा आजार आहे. हा दुर्मिळ आजार आहे कारण हा सहसा लाखांमध्ये एखाद्या वेळेस होतो. आणि हा गंभीर आजार आहे कारण काही GBS रुग्णांची श्वसन करण्याची क्षमता जर बाधित झाली तर त्यांना व्हेंटिलेटरची गरज पडू शकते. तसेच या आजाराने कमकुवत झालेले शरीरातील स्नायू पुन्हा दुरुस्त होण्यासाठी काही महिनेदेखील लागू शकतात. हा आजार आपल्या स्वतःच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीमुळे होत असल्याने हा आजार संसर्गजन्य नाही. त्यामुळे घरातील एखाद्या व्यक्तीला आजार झाला असेल तर तो इतरांना होईल का याची काळजी करू नये.

Advertisement

*GBS आजार का होतो?*
GBS हा एक ऑटोइम्यून आजार आहे, म्हणजे आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती चुकीने आपल्याच नसांवर हल्ला करते. सहसा हा आजार होण्यापूर्वी 1 ते 6 आठवड्यांमध्ये एखादे पोटाचे किंवा श्वसनसंस्थेचे इन्फेक्शन होते आणि ते झाल्यानंतर ज्या अँटीबॉडी तयार होतात, त्यातील काही नसांच्या विरुद्ध देखील हल्ला करू लागतात. या हल्ल्यामुळे नर्व्हच्या भोवती असलेले “मायलीन शिथ” नष्ट होते, ज्यामुळे विविध स्नायुपर्यंत नर्व्ह संदेश देण्यात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे स्नायू काम करेनासे होतात म्हणजेच शरीराला लकवा मारल्यासारखे चित्र दिसते.

*जीबीएस सिंड्रोमची लक्षणे*
GBS ची लक्षणं हळूहळू वाढत जाणारी असतात आणि सामान्यतः शरीराच्या खालच्या भागापासून (पाय) वरच्या भागाकडे (हात आणि चेहरा) पसरतात.
*सुरुवातीची लक्षणे-* दोन्ही पायांमध्ये सुन्नपणा किंवा मुंग्या येणे. पायातून चपला निसटून जाणे, हलकी वेदना किंवा अस्वस्थता. (मुलांमध्ये आढळ शकते) हाता पायांमध्ये जडपणा किंवा जाणीव कमी होणे. लक्षणे कमी न होता एक-दोन दिवसांमध्ये त्याची वाढ होण्यास सुरुवात होते. ही लक्षणे अगदी साधी असल्याने यांच्याकडे दुर्लक्ष होऊ शकते.
*प्रगतीशील लक्षणे-* ही लक्षणे शरीराच्या दोन्ही बाजूंमध्ये सारख्या प्रमाणातच दिसून येतात. प्राथमिक लक्षणानंतर ही वाढत जाणारी लक्षणे सुरू होतात आणि साधारण दोन आठवड्यात सर्वाधिक परिणाम दिसून येतो. स्नायूंमध्ये कमकुवतपणा (पाय, हात, चेहरा) आल्याने हालचाल न करता येणे, हालचालींमध्ये अडथळा किंवा असमर्थता, संतुलन बिघडणं. गिळताना किवा बोलताना त्रास होणं, लघवी करता न येणे
*गंभीर लक्षणे-* केवळ हाता-पायाऐवजी इतरही नसा बाधित झाल्या असतील तर गंभीर लक्षणे देखील दिसून येतात. जसे – श्वास घेण्यास त्रास (रेस्पिरेटरी फेल्युअर), हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता, रक्तदाबामध्ये अत्याधिक चढ-उतार. या आजाराच्या काही धोक्याच्या खुणा किंवा चेतावणी चिन्हं (Warning Signs) आहेत. जसे -पायांपासून सुरू झालेला सुन्नपणा जो हळूहळू वर पसरतो. स्नायूंमध्ये अचानक कमजोरी वाटणे, गिळण्यास त्रास होणं किंवा आवाजात बदल होणे, श्वास घेण्यास त्रास जाणवणे.
*वरीलपैकी कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. आजाराचे निदान जेवढ्या लवकर होईल तसेच जेवढ्या लवकर उपचारांना सुरुवात होईल तेवढाच कमी काळ हा आजार बरा होण्यासाठी लागेल. आजाराचे निदान करण्यासाठी पाठीच्या मज्जारज्जू भोवतीचे पाणी म्हणजे CSF तपासले जाते, रक्ताच्या आणि नर्व्ह कंडक्शनच्या तपासण्या केल्या जातात. मात्र आजाराचे निदान हे मुख्यतः लक्षणांवरूनच केले जाते.*

*आजाराच्या आधी आजार टाळण्यासाठी किंवा आजाराच्या सुरुवातीच्या काळात घ्यावयाची काळजीः*
संक्रमण टाळा: सर्दी, खोकला, फ्लू यांसारख्या संसर्गजन्य आजारांपासून स्वतःला वाचवा. आरोग्यपूर्ण सवयी संपूर्ण कुटुंबाने पाळल्या तर असे आजार टाळता येऊ शकतात. हा आजार मुख्यतः दूषित अन्न किंवा पाण्यापासून होऊ शकत असल्याने त्याविषयी विशेष काळजी घ्या. बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळा, अन्न, दूध व्यवस्थित गरम करा, तंदुरुस्त राहा. संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत हवी. त्यासाठी पोषणयुक्त आहार घ्या, पुरेशी झोप घ्या आणि व्यायाम करा. लक्षणांकडे लक्ष द्या. पायांपासून सुरू होणारा सुन्नपणा किंवा कमजोरी जाणवल्यास त्वरित डॉक्टरांना भेटा. आजाराच्या काळात घ्यावयाची काळजी: GBS ची उपचारपद्धती हे एक टीम वर्क असते. आजाराच्या उपचारासोबतच गुंतागुंत टाळण्यासाठीदेखील हॉस्पिटलमध्ये काळजी घेतली जाते.
0000


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!