पुणे: प्रचार मुद्दा
टिपू सुलतानचे स्मारक
पुण्यात वाद
पुणे : म्हैसूरचा राजा टिपू सुलतान यांचे स्मारक उभारण्याच्या मुद्यावरून लोकसभा निवडणूक प्रचारात वाद निर्माण झाला आहे.
एमआयएमचे पुण्यातील उमेदवार अनिस सुंडके यांनी प्रचारात बोलताना टिपू सुलतान यांचे स्मारक पुण्यात केले जाईल अशी घोषणा केली. टिपू सुलतानांनी ब्रिटीश सत्तेविरूद्ध लढा दिला. तरूण वर्गाला हा इतिहास कळावा, असे स्पष्टीकरण सुंडके यांनी दिले.
या घोषणेनंतर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. घाटे यांनी सुंडके यांचा निषेध केला आणि वेळ पडल्यास त्यांच्या घरासमोर आंदोलन करू, असा इशारा दिला.
टिपू सुलतान हा काही महापुरुष नव्हता. हजारो निरपराध हिंदूंचे त्याने बळी घेतले. हिंदुत्ववादी संघटना टिपू सुलतानचे स्मारक कदापि होवू देणार नाहीत, असे घाटे यांनी सांगितले.
भाजप आणि एमआयएम यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. अन्य पक्षांनी या वादात अद्याप तरी उडी घेतलेली नाही.