वाई:दीक्षित डायट ही जीवनशैली
दीक्षित डायट ही जीवनशैली :डॉ. दीक्षित
मार्गदर्शन करताना डॉ जगन्नाथ दीक्षित शेजारी व्यासपीठावर डॉ मनोहर दातार.
वाई : दीक्षित हे डायट नव्हे तर ही एक जीवनशैली आहे. आरोग्याच्या बाबतीत कोणत्याही सल्ल्यांवर विश्वास ठेवू नये. अगदी दीक्षित जीवनशैलीचा सुद्धा पहिले तीन महिने अनुभव घ्या आणि मगच तिला आपली जीवनशैली बनवा. असे आवाहन आरोग्यतज्ञ, वैद्यकशास्त्रज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी आपल्या व्याख्यानातून केले. लोकमान्य टिळक संस्था आयोजित १०८ व्या वसंत व्याख्यानमालेच्या नवव्या पुष्पात ‘वेटलॉस व मधुमेहमुक्तीसाठी दीक्षित जीवनशैली’ या विषयावर ते भाष्य करीत होते. यावेळी वाईचे डॉ. मनोहर दातार यांनी अध्यक्षपद भूषविले.
जगन्नाथ दीक्षित म्हणाले,” हे केवळ माहिती देणारे व्याख्यान नसून एक आयुष्य बदलणारा अनुभव ठरणार आहे. दीक्षित जीवनशैली मी डॉक्टर केसकर यांच्यापासून प्रेरित होऊन संशोधन करून मांडली आहे. मी स्वतः तीन महिने या जीवनशैलीचा अनुभव घेतला आहे व मगच ती आपल्यापुढे मांडली आहे.
वैद्यकीय संशोधनानुसार इन्सुलिन या घटकाचे शरीरात जास्त प्रमाण झाले की ब्लड प्रेशर वाढणे, डायबेटीज होणे, हृदयविकाराची शक्यता वाढणे आदी अपायकारक गोष्टी घडतात. मग हे इन्सुलिन कस निर्माण होत तर याचे दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारानुसार आपल्या शरीरात इन्सुलिन पूर्ण वेळ निर्माण होत असते मात्र याचे प्रमाण कमी असते. यावरती आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. तर दुसऱ्या प्रकारानुसार हे कोणत्याही अन्नपदार्थाचे ग्रहण केल्यावर निर्माण होते.यावरती आपण नियंत्रण ठेवू शकतो. आम्ही केलेल्या संशोधनानुसार असे निदर्शनास आले की इन्सुलिनचे प्रमाण कमी जास्त अन्न ग्रहण केल्यावर त्यानुसार कमी जास्त होत नाही. तर दरवेळी ते अन्नग्रहण केल्यावर तेवढेच निर्माण होते. यावरून असे लक्षात येते की वेट लॉस साठी आणि मधुमेह मुक्तीसाठी अन्नग्रहण करण्याचे प्रमाण कमी करण्याची आवश्यकता नाही तर कमी वेळा ग्रहण करण्याची आवश्यकता आहे.या तत्त्वाला धरूनच दीक्षित जीवनशैलीची योजना केलेली आहे.
दीक्षित जीवनशैली मध्ये दिवसातून दोन वेळा भुकेच्या वेळा ओळखून जेवण्यास सांगितले आहे. हे जेवण ५५ मिनिटाच्या आत संपले पाहिजे.
जेवणाचा क्रम सर्वप्रथम गोड पदार्थ त्यानंतर सॅलेड त्यानंतर मोड आलेले कडधान्य व त्यानंतर आपणास भूक असेल त्याप्रमाणे आपल्याला हवा तो पदार्थ असा असला पाहिजे. हा जेवणाचा क्रम मधुमेह नसलेल्यांसाठी आहे मधुमेहग्रस्तांनी वरील क्रमातून केवळ गोड पदार्थ वगळावा. जेवणाव्यतिरिक्त ताक, विदाऊट शुगर ब्लॅक टी, ग्रीन टी, ब्लॅक कॉफी, शहाळ आदींचे सेवन आपण करू शकता. आहाराबरोबरच दीक्षित जीवनशैलीत व्यायामविषयक मार्गदर्शन आहे. कमीत कमी साडेचार किमी चालणे अथवा 45 मिनिटे तुमच्या हृदयाचे ठोके वाढवणारा व्यायाम करावा असे दीक्षित जीवनशैली सांगते.गरोदर स्त्रिया व अठरा वर्षाखालील मुलांनी या जीवनशैलीचे पालन करू नये. ह्या जीवनशैलीचे फायदे केवळ तीन महिन्यात दिसू लागतात.
आयुर्वेद, जैन धर्म ,महाभारत आदींमध्ये या जीवनशैलीतील तत्वे आढळून येतात. आधुनिक वैद्यकशास्त्रात या जीवनशैलीचा पुरस्कार करण्यात आलेला आहे.रोजच्या जीवनात कर्बोदके कमी करा व प्रथिने वाढवा.”
प्रोटीन पावडर आरोग्यासाठी घातक असतात. मधुमेह नसला तरी गोड कमीच करा. असे आरोग्य विषयक सल्ले जगन्नाथ दीक्षित यांनी दिले. व्याख्यानाच्या शेवटी झालेल्या प्रश्न सत्रात दीक्षित यांनी श्रोत्यांच्या शंकांचे निरसन केले.डॉ. मनोहर दातार यांनी अध्यक्षीय मनोगताद्वारे आरोग्यविषयक अधिक मार्गदर्शन केले. कु.श्रावणी अजित क्षीरसागर हिने प्रास्ताविक केले. डॉ. प्रशांत पोळ यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. सौ अर्चना चिंतामणी केळकर यांनी आभार मानले.
गुडमिंग्टन ग्रुप वाई व इंदिरा महिला सह पतसंस्था वाई यांच्याद्वारे या व्याख्यानाचे प्रायोजन करण्यात आले होते. आरोग्यचिकित्सक श्रोत्यांनी या व्याख्यानाला मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवली.