केव्हा आणि कशी घडते आई ?
केव्हा आणि कशी घडते आई ?
मातृदिना निमित्त…
जेव्हा बाईच्याही नकळत एक जीव तिच्या उदरात वाढू लागतो तेव्हा?
की जीवघेण्या वेदना सहन करून तिच्या शरीरापासून एक बाळजीव
वेगळा होतो तेव्हा?
काय असते आईपण?
आई होण्यासाठी स्वतःच्या उदरातून एक जीव प्रसवावा लागतोच का?
फक्त तीच बाई आई असते का?
आईवेगळे एखादे लहान भावंड जेव्हा आधारासाठी मोठ्या भावंडाकडे धावत जाते तेव्हा ते मोठे भावंड आईच असते त्या छोट्यासाठी..
जगाकडून पराभूत झाल्यावर एखादा मित्र आशेने आपल्याकडे येतो आपल्या पराभवाच्या दुःखावर फुंकर मारून घेण्यासाठी… तेव्हा आपण आईच असतो ना त्याची..
हॉस्पिटलमध्ये असहाय्यपणे आजारी रुग्ण कपडे बदलण्यासाठी किंवा साध्या पाण्याच्या घोटासाठी नर्सवर अवलंबून रहातो, तेव्हाही तिच्यात आईलाच पहातो.
आई असतेच आपल्या आजूबाजूला,
सतत ….
कोणत्या ना कोणत्या रुपात..
आई बाईच असते असे नाही. ती कोणीही असू शकते. कारण आई ही व्यक्ती नाही आपल्याला जन्म देणारी ..तर आई असते एक संस्थान… लिंग, वय, जात, धर्म यापलीकडचे.
आई असते एक भावना… डोळस समर्पणाची..
आई होण्यासाठी जन्म द्यावा लागत नाही एखाद्या बाळाला.
विचारा यशोदेला….विचारा कर्णाच्या राधाईला…विचारा संभाजीच्या धाराऊला…. काया वाचा मनाने त्या आईच होत्या आपल्या बाळाच्या…नसेल त्यांनी जन्म दिला त्या बाळांना तरीही…
कोणी बाप, भाऊ,मावशी ,आत्या देखील होऊच शकतात आई एखाद्याची …
अगदी गौरी सावंत देखील आईचं आहे तिच्या दत्तक बाळांची…
आईपण असावे लागते स्वभावात. आईपण हा असतो स्थायीभाव.आईपण म्हणजे प्रेमाचा खळाळता झरा, स्वतः आधी लेकरांचा विचार करण्याची वृत्ती….
म्हणूनच म्हणावेसे वाटते,”जिथे देव पोहोचू शकत नाही तिथे आई पोहोचतेच कोणत्या ना कोणत्या रुपात…”
Happy Mother’s Day to all such mothers!!!
डॉ.समिधा गांधी