…के दिल अभी भरा नहीं


के दिल अभी भरा नही…

मन पाखेरू

मधुसूदन पतकी

Advertisement

‘’मन भरलं बुवा..!”हे वाक्य आयुष्यात फारच कमी वेळा आपण उच्चारतो आणि तेही पुन्हा, लगेच मन रिकामं करण्यासाठी..! समाधान होणं ही फार म्हणजे फाऽऽऽर अवघड अवस्था आणि त्यात कायम रहाणं तर अशक्यच. ‘के दिल अभी भरा नही’ अशीच अवस्था सदैव रहाते. हे दिल चमत्कारिक. एखादं तळ नसलेलं भांडं म्हणाना..! वरून कितीही टाकत रहा,भरत रहा. अथांग, अनंताच्या पोकळीत कुठं गायब होतं कळत नाही. मग ते भौतिक सुख असू दे अथवा कल्पनेच्या इंद्रधनूत रंगलेलं मनपखेरू…!
देव आनंद अत्यंत हळव्या उत्कटतेनी आपल्या सखीला ; साधनाला आपल्यापाशी,सोबत थांबण्यासाठी,सहवासासाठी विनवत असतो. आणि ती जनरितीचा, बिंबवलेल्या संस्कार, संस्कृतीच्या प्रभावात माघारी, घरी जाण्याचा, निरोपाचा क्षण सजवू पहात असते. तिची ही अवस्था ‘’के दिल अभी भरा नहीं’’ अशीच असणार की..! हळवेपणाचा संबंध मनाशी.ते न दिसणारं ,तर दुसरा हृदयाशी हे दिसणारं. बरं हृदयातला अतिसंवेदनशील नाजूक महत्त्वाचा भाग म्हणजे काळीज..! या काळजाच्या सुरक्षित तिजोरीत सटरफटर सामान थोडंच ठेवलं जातं..! खूप मौल्यवान, चिरंतन जपून ठेवणारा ठेवा यात राखून ठेवला जातो. या तिजोरीचा आकार, विस्तार, जागा चौकटबद्ध नसते. अथांग अपरिमीत. मग भरत नाही ती जागा. कशी बरं भरणार.! आणि सुखद, सुमधूर आठवणींमुळे ती भरू नये असंच वाटत. वाटत राहणारं. नि का न वाटावं ?
आणि गंमत एक आहे ती, दिल न भरण्यातच! एकदा का हे ‘दिल’ संकूचित झालं, भरलं तर आपण किती क्रियाशील राहू;.? तुम्हीच सांगा.
जगणं हीच एक न संपणारी तहान असते. त्यात कुठं तरी, कधी तरी पाणी दिसावं. या दिसण्यांनी ही तहान भागेल अशी जाणीव निर्माण व्हावी. मात्र तहान पूर्ण न भागावी .‘अधुरियाच’ .ही अपूर्णता हे जीवनाचं सत्य आहे हे समजावं.मग या समजुतीतून प्रश्न निर्माण होतात. दिसतं ते पाणी की मृगजळ? मग कशी भागावी तहान. कशी करायची वाटचाल? जवाँ ; दिल असतं की इच्छा? आकांक्षा? कधी पूर्ण न होणार्‍या. ‘के दिल अभी भरा नहीं..’; अखेरच्या क्षणापर्यंत हृदयात हेच शब्द गुंजत रहावे..? चित्रपटातली नायिका ;अभिनेत्री साधना ही देव आनंदला भानावर आणते. चांदणं आकाशभर झालंय. दिवे लागत आहेत. आता वास्तव स्वीकारू, असं ती संयम, विवेकांनी सांगते. आता इथं थांबले तर मी घरी जाऊ शकणार नाही. तळ नसलेलं भांड भरणार नाही. अन् तू म्हणत राहणार की ‘दिल अभी नही भरा…’
साहीर, जयदेव, मोहमंद रफी, आशा भोसले आपल्या अभिव्यक्तीतून जीवन जगताना नेमकं कुठं थांबावं याची जाणीव करून देतात. गाण्यातलं हे शब्द क्लायमॅक्स,पताकास्थान..! मग गाणं किती वेळा ऐका. सहज म्हणतो आपण की ‘दिल अभी भरा नही…!’
.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!