पत्रकारितेतुन सामाजिक बदल घडविता येतो-


 

Advertisement

स्वातीपत्रकारितेतुन सामाजिक बदल घडविता येतो- महांकाळ
वाई ता. २० : पत्रकारिता हे देशाच्या समाजकारणातील एक अत्यंत महत्त्वाचे व अविभाज्य अंग असून पत्रकारितेतून सामाजिक बदल घडवता येतो असे प्रसिद्ध लेखिका व पत्रकार स्वाती महाळंक यांनी आपल्या मुलाखतीतून मांडले. लोकमान्य टिळक संस्था संचालित १०८व्या वसंत व्याख्यानमालेच्या एकोणविसाव्या ज्ञान सत्रात ‘मी आणि माझा प्रवास’ या मुलाखतीत त्या बोलत होत्या. यावेळी तनुजा इनामदार या मुलाखत घेत होत्या.
स्वाती महाळंक म्हणाल्या, ‘माझे बालपण पुण्यात गेले. आई भाषाशास्त्रज्ञ व वडील इंजिनियर असल्यामुळे एकंदरीत संपन्न व सुबक परिस्थितीत बालपण गेले. मात्र ज्ञान प्रबोधिनी मध्ये प्रवेश घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने समाजाची ओळख व्हायला सुरुवात झाली. लौकिकाच्या पलीकडे जाऊन समाजव्यवस्था समजू लागली. ज्ञानप्रबोधिनी मध्ये असतानाच माझ्या लेखनाला सुरुवात झाली. व्यक्त होण्यासाठी मी लिहायला सुरुवात केली होती मात्र समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. समाजकार्य करायचे म्हणजे चिखल मातीत उभे राहूनच ते होते असे नाही. आपण ज्या क्षेत्रात कार्यरत आहोत त्या क्षेत्रातूनही समाजासाठी काहीतरी करता येते. लेखनाच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न मांडायचे आणि ते योग्य आणि सक्षम व्यक्तींपर्यंत पोहोचवायचे हे सुद्धा समाजकार्य आहे.
प्रबोधिनी मध्ये पत्रकाराला सर्व विषयातील ज्ञान असायला हवे आणि त्याचे उपयोजन ही जमायला हवे हे मला समजले. मी सकाळमध्ये पत्रकार म्हणून नोकरीस लागले तेव्हा पत्रकारितेमध्ये फारशा स्त्रिया नव्हत्या. पत्रकारितेमध्ये पुरुषी वर्चस्व होते. त्यामुळे अनेकदा नोकरीत अनेकांबरोबर खटके उडायचे. शेवटी मी नोकरी सोडायचा निर्णय घेतला या संदर्भात मी राजमोहन गांधी यांना सांगितले. ते मला म्हणाले ‘प्रत्येक वेळी प्रतिक्रिया देणे गरजेचे आहे का?’ तेव्हा मी पत्रकारितेतील सर्वात मोठा धडा शिकले. तो म्हणजे प्रत्येक वेळी प्रतिक्रिया देणे गरजेचे नाही. याचा मला पुढच्या व्यावसायिक आयुष्यात खूप फायदा झाला.
पत्रकारितेमध्ये अनेक सामाजिक परिस्थितींची जाणीव झाली. असाच एक प्रसंग १९९३-९४ च्या दरम्यान घडला. डिंभे धरणाच्या जवळच ५६ आदिवासी गावांचा एक पट्टा आहे. तिथली भौगोलिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल आहे. यावर मी सहा भागांचा लेख प्रकाशित केला. यामध्ये विधानसभेतील अधिवेशनात चर्चा झाली. माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी तेथील गावांसाठी निधी मंजूर केला. टाटांनी यातील बारा गावे दत्तक घेतली. अशा प्रकारे पत्रकारितेमधून समाजकार्य करता येते याबद्दल मला खात्री पटली.’
स्वाती महाळंक यांनी मुलाखती द्वारे पत्रकारितेमधील व्यावसायिक, सामाजिक, राजनैतिक अशा अनेक अंगांचा तपशीलवार आराखडा श्रोत्यांच्या नजरेसमोर ठेवला. पत्रकारितेतून परिवर्तन हा विचार त्यांनी मांडला.
भालचंद्र मोने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सौ. पुष्पा शिवाजी कदम (कदम लॅब) यांनी या मुलाखतीचे प्रयोजन केले होते. श्रोत्यांना एक वेगळा अनुभव या मुलाखती मधून मिळाला.
फोटो खालील ओळी: ज्येष्ठ पत्रकार स्वाती महांकाळ यांची मुलाखत घेताना तनुजा इनामदार


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!