लेखन करताना भाषेचे भेद कृत्रिम वाटतात : बोरगावकर
लेखन करताना भाषेचे भेद कृत्रिम वाटतात : बोरगावकर
वाई,ता.१९:- आपण अगोदरंच माणसांमाणसामध्ये जात पात, धर्म असे भेद करून ठेवले आहेत. त्यात पुन्हा भाषिक भेदाभेद कशासाठी?. भाषा ह्या सरमिसळ होऊन एकत्र येत असतात. त्यामुळे एका भाषेत लेखन करत असतानाही शब्द योजनेबद्दलचे ही मराठी, ती उर्दू, ही तेलगू हे भेद मला फार कृत्रिम वाटतात. ‘नदीष्ट’मध्ये भाषेची जी सरमिसळ आहे ते अगदी सहज घडलं. हे नदीचं आणि माझं बोलणं आहे. यात काळजातले बोल आहेत. तेच कादंबरीच्या रुपात बाहेर आले. त्यामुळेच ती लोकांना आपली वाटतेय, असे प्रतिपादन प्रा. मनोज बोरगावकर यांनी केले.
येथील लोकमान्य टिळक स्मारक संस्थेच्या १०८ व्या वसंत व्याख्यानमालेत १८ वे पुष्प गुंफताना
‘ नदीष्ट : तरांगातून अंतरंग ‘ या विषयावर
ते बोलत होते. अध्यक्षस्थानी
ज्येष्ठ साहित्यिक मधुसूदन नेने होते.
बोरगावकर म्हणाले, माझं बालपण खेड्यात गेलं. त्याचवेळी मला हुलबा नावाचं पात्र भेटलं. त्यानं मला निसर्ग वाचायचा असतो हे शिकवलं. हळूहळू मी निसर्गाशी जोडला गेलो, तशी पुढे नदी मला मिळाली. सुरवातीला आम्ही मित्र नदीवर मजा म्हणून जायचो. नंतर मला असं वाटायला लागलं की या गोंगाटाशिवाय आजूबाजूला काहीतरी घडत आहे. ते आपण ऐकायला हवं. ते जर ऐकायचं असलं तर त्याचा वॉल्यूम आपण वाढवला पाहिजे. म्हणून मी नदीवर एकटा यायला लागलो. पहाटे चार वाजता उठून नदीवर यायला सुरवात केली. मग माझ्या लक्षात आलं की नदी काहीतरी बोलू पाहते आहे. तिला काहीतरी सांगायचं आहे.आपण भूगोलाच्या पुस्तकात लहाणपणी वाचलेलं असतं की वस्ती आणि संस्कृती नदीच्या किनारी वसत असते. ते वाक्य त्या वेळी पाठ करावं लागलं. जेव्हा मी नदीवर जायला लागलो तेव्हा ते मी अनुभवलं. नदीच्या त्या निखळ प्रवाहात मला रोज नवी माणसं भेटत होती. नदीच्या अव्यक्त हाका ऐकू येत होत्या. निसर्ग आपल्याशी खूप काही बोलत असतो. आपण त्याच्या जवळ गेलं पाहिजे. मला त्याचा नाद लागला. मी हे अजाणतेपणानं जगत होतो. निरिक्षण करत होतो. हे सगळं लिहण्यासाठी नव्हतं. तर या माझ्या जगण्याच्या नोंदी होत्या.सतत जर आपण निसर्गातल्या कुठल्याही विराटाच्या संपर्कात राहिलो तर आपण विराट होत नाही. पण त्या विराटाची कणभर माती आपल्या अंगाला लागते आणि ती कणभर माती म्हणजे नदिष्ट होय. यातला जवळचा आणि महत्त्वाचा भाग असा की फक्त गोदावरी या नदीपुरती मर्यादित गोष्ट नाही. ही फक्त एका नदीची गोष्ट नाही. नदिष्ट ही कोणत्याही नदीवर घडू शकते. हीच घटना कृष्णेच्या काठावर घडू शकते. फिक्शन किंवा नॉनफिक्शन असं काही तुम्ही विचारत असाल तर मला वाटतं की नदीष्ट हे सत्याचा कुठेतरी आधार घेऊन उभं राहिलेलं फिक्शन आहे. नद्यांचे नाले होण्यास माणूस जबाबदार असल्याचे त्यांनी नमूद केले. वाईकरांनी कृष्णामाई उत्सव साजरे करून नदीचे माहेरपण जपले आहे असे ही ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोपात श्री.नेने यांनी कृष्णा नदीचे महत्व सांगितले. यावेळी कृष्णानदी सेवा कार्य फाउंडेशनच्या
कार्याची माहिती देऊन उपाध्यक्ष भारत खामकर यांनी नदीचे पावित्र्य जपण्यासाठी नागरिकांनी या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.
अजित क्षीरसागर यांनी प्रस्तावना केली.
भालचंद्र मोने यांनी परिचय करून दिला. ॲड श्रीनिवास कुलकर्णी यांनी आभार मानले. डॉ. रमेश वैद्य व कृष्णानदी सेवा कार्य फाउंडेशन प्रायोजक होते.
—–