Advertisement

कमविलेले पैसे गुंतविणेसाठी अर्थभान असणे अत्यंत गरजेचे.– समीर नेसरीकर.
वाई: हिंदू धर्मामध्ये अर्थ, धर्म, काम,मोक्ष हे चार पुरुषार्थ सांगितले आहेत. यावरूनच अर्थ अर्थात पैशाचे महत्व लक्षात येते. आज पैसे कमावणे साऱ्यांचेच ध्येय असते.ते साध्य करण्यातही आपण यशस्वी होतो मात्र कमावलेले पैसे गुंतवणे त्याहूनही महत्त्वाचे असते. यालाच अर्थभान असे म्हणतात. आजच्या काळात हे अर्थभान असणे अत्यंत गरजेचे आहे. असे प्रतिपादन प्रसिद्ध अर्थपत्रकार समीर नेसरीकर यांनी आपल्या व्याख्यानातून केले. लोकमान्य टिळक संस्था आयोजित १०८व्या वसंत व्याख्यानमालेच्या बाराव्या पुष्पात ‘आजच्या काळातील अर्थभान’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी श्रीमती अनुराधा कोल्हापुरे यांनी अध्यक्षस्थान भूषवले.
समीर नेसरीकर म्हणाले, “काही वर्षांपूर्वी भारतात शाश्वत स्वरूपाच्या नोकऱ्या होत्या. मात्र आज नोकऱ्या शाश्वत नाहीत. अशावेळी आपण आज करत असलेल्या पैशाची गुंतवणूक भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
गुंतवणूक करताना तीन महत्त्वाच्या अडचणी आपल्यासमोर येतात. यामध्ये सर्वात पहिली अडचण ही वाढती महागाई आहे. भविष्यामध्ये
८ – १०% महागाई वाढली पण तुम्ही गुंतवलेल्या पैशांचे व्याज ८- १० % पेक्षा कमी असले तर त्या गुंतवणुकीचा अपेक्षित फायदा होणार नाही. दुसरी अडचण म्हणजे इन्शुरन्स नसणे. इन्शुरन्स ही एक अत्यंत महत्त्वाची बाब असून गुंतवणूक करताना याचा विचार करायलाच हवा. यामध्ये मेडिकल इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स आदींबाबत नियोजन करून ते काढावेत. तिसरी अडचण म्हणजे आज पालक मुलांच्या शिक्षणाचा, भवितव्याचा विचार करून आर्थिक नियोजन करतात. मात्र या नियोजनामध्ये ते स्वतःच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याचे आर्थिक नियोजन करत नाहीत. यामुळे व्यक्तीच्या निवृत्त जीवनामध्ये अनेक आर्थिक धोके संभवतात.
गुंतवणूक करताना ‘रुल ऑफ 72’ हा एक अत्यंत महत्त्वाचा निकष आहे. आपण गुंतवलेल्या पैशांवरती मिळणारे व्याज किती वर्षात दुप्पट होईल हे जाणून घेणे गरजेचे आहे. या नियमानुसार 72 ला व्याजाच्या दराने भागल्यास दाम दुप्पट होण्याचा कालावधी आपल्याला समजतो. गुंतवणूक करताना या नियमाद्वारे आपल्या रकमेचा दाम दुपटीचा कालावधी अवश्य काढावा.
गुंतवणूक ही दोन प्रकारची असते. यामध्ये पारंपारिक गुंतवणूक हा एक प्रकार असतो. या प्रकारामध्ये कोणताही मोठा आर्थिक धोका संभावत नाही. हे गुंतवणूक पतसंस्था, पोस्ट, इन्शुरन्स कंपन्या आदींमध्ये करण्यात येते. या गुंतवणुकीचा कालावधी मोठा असला तरी नफ्याची खात्री असते.
दुसऱ्या प्रकारामध्ये म्युच्युअल फंड्स, ट्रेडिंग, शेअर होल्डिंग यांचा समावेश होतो. या प्रकारात व्याजाचा दर अधिक असतो. शेअर मार्केटचा अभ्यास करून मगच या गुंतवणुकीत सहभाग घ्यावा. यामध्ये तोटा होण्याचा धोका असला तरी व्याजाच्या दराचे प्रमाण अधिक असल्यामुळे अनेक लोक अभ्यासपूर्णरित्या या गुंतवणुकीचा लाभ घेतात.
लहानपणापासूनच मुलांना ‘शिकून मोठा हो’ असे सांगून सरस्वतीची आराधना करायला शिकवली जाते. मात्र त्यांना अर्थसाक्षर करून लक्ष्मीची आराधना करायला सुद्धा शिकवलेच पाहिजे.
इक्विटी, डेब्ट या प्रकारांना समजून घेऊन गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते. यामध्ये AMFI या संस्थेद्वारे अधिक माहिती प्राप्त करून गुंतवणूक करावी.
सीनियर सिटीजन साठी ची गुंतवणूक ही मंथली इन्कम प्रमाणे असावी. त्यांनी अशा गुंतवणुकीच्या योजनांमध्ये पैसे गुंतवावे की दरमहा त्यांना त्याचे व्याज काढून ते वापरत येईल.
आजच्या तरुण पिढीने अगदी कमी रकमेपासून गुंतवणुकीत सहभाग घेतला तरी त्यांच्या भवितव्यात आर्थिक सुबकता येईल. गुंतवणूक ही भावनांवर आधारित असता कामा नये ती माहितीच्या आधारे करावी.”
समीर नेसेकर यांनी आज असलेली गुंतवणुकीची गरज तसेच गुंतवणूक कशी करावी हे अत्यंत अर्थपूर्णरित्या मांडले. श्रीमती अनुराधा कोल्हापुरे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. इंदुमती कोल्हापुरे यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला.आर आर यादव यांनी आभार मानले.
कै. आनंद कोल्हापुरे यांचे स्मृत्यर्थ श्रीमती अनुराधा कोल्हापुरे व उत्कर्ष नागरिक सह.पतसंस्था, वाई. यांच्याद्वारे या कार्यक्रमाचे प्रायोजन करण्यात आले होते. श्रोत्यांनी या व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!