फौजदारी कायद्याची माहिती सुजाण नागरिकांना असायला हवी– धीरज घाडगे
वाई, ता.१५: खाकी वर्दीतल्या पोलिसांपासून, गाडी चालवताना साधा ट्रॅफिक हवालदार दिसला तरी त्याची भीती वाटणारे लोकसुद्धा असतात. याचे कारण सामान्य नागरिकांचे कायद्याविषयक असणारे अज्ञान. फौजदारी कायदा हा जनसामान्यांच्या हितासाठी आहे. म्हणूनच या कायद्याची किमान माहिती तरी प्रत्येक सुजाण नागरिकाला असायलाच हवी. असे वक्तव्य प्रख्यात वकील धीरज घाडगे यांनी आपल्या व्याख्यानाद्वारे केले. लोकमान्य टिळक संस्था संचालित १०८व्या वसंत व्याख्यानमालेच्या चौदाव्या पुष्पात ‘फौजदारी कायदा आणि सामान्य नागरिक’ या विषयावर ते भाष्य करीत होते. यावेळी वाई वकील संघाचे अध्यक्ष श्री. रवींद्र भोसले यांनी अध्यक्ष पद भूषविले.
धीरज घाडगे म्हणाले,”आज कैक फौजदारी कायद्यांचा गैरवापर केला जातो. याबाबत सर्वोच्च न्यायालय देखील जागरूक झाले आहे. इंग्रज सत्तेत असताना लॉर्ड मायक्लो यांनी हा कायदा योजला होता. सध्या तो बदलत असून नवा कायदा १ जुलै २०२४ पासून लागू होत आहे.
एकीकडे निर्भयाप्रकरणासारखी गंभीर प्रकरणे पाहायला मिळतात तर दुसरीकडे खोटे आरोप करून न्यायव्यवस्थेचा गैरफायदा घेणाऱ्या मुली देखील पाहायला मिळतात. असे खोटे आरोप सहज लक्षात येण्यासारखे असले तरी कायद्याच्या क्लीष्ठतेमुळे साऱ्यांचेच हात बांधलेले असतात. या परिस्थितीत नवीन कायद्यामुळे नक्कीच चांगला बदल घडून येईल.
कौटुंबिक हिंसाचार विरुद्ध कायद्याचा गैरवापर करून वयोवृद्ध सासू-सासर्यांना त्रास देणाऱ्या सुना देखील असतात. अशावेळी त्या वृद्ध दांपत्याने मुलांवरील अंध प्रेम व समाज काय म्हणेल याची परवा न करता न्यायव्यवस्थेने त्यांच्यासाठी तयार केलेल्या ज्येष्ठ नागरिक कायद्याचा अवलंब करावा.
आज असलेला आणखीन एक मोठा धोका म्हणजे घटस्फोटांचे वाढते प्रमाण. आज वकील म्हणून काम करत असताना माझ्याकडे घटस्पोटाच्या सर्वाधिक केसेस आहेत. यासाठी समुपदेशन गरजेचे आहे. विभक्त कुटुंबात मोठी होणारी मुले गुन्हेगारी वृत्तीकडे, व्यसनाधीनतेकडे वळतात हा एक सामाजिक धोका आहे.
अजून एका कारणामुळे सामान्य नागरिक कायद्यापासून दूर राहतात. त्यांच्या मनात ‘न्यायालयात खरंच न्याय मिळतो का?’ अशी शंका असते. मात्र मी स्वतः वकील म्हणून कार्यरत असताना अनेकांना न्याय मिळताना पाहिले आहे, मी स्वतः मिळवून दिला आहे. भारतीय न्यायव्यवस्था तुम्हाला न्याय मिळवून द्यायला सक्षम आहे तुम्ही फक्त कोणतीही शंका मनात न ठेवता न्याय मागण्याचे काम करा.
न्यायालयीन निकाल उशिरा लागतो. असा देखील काही जणांचा आरोप आहे. मात्र याचे कारण असे की भारतीय न्यायव्यवस्था प्रत्येकाला स्वतःची बाजू मांडण्याची संधी देते.
सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाणाऱ्या फिर्यादींच्या निकालाला सर्वाधिक विलंब लागतो. मग अशावेळी सर्वोच्च न्यायालय कोणत्या फिर्यादींना प्राधान्य देते? सर्वोच्च न्यायालय हे देशाच्या सार्वभौमत्वाला हानिकारक ठरणाऱ्या घटकांशी संबंधित केसेस, सामाजिक न्याय देणाऱ्या, भारताच्या समाज व्यवस्थेवर दुरोगामी परिणाम करणाऱ्या केसेसना अशावेळी प्राधान्य देते.
फौजदारी कायदा हा माहिती नसलेल्यांसाठी भीतीदायक मात्र माहिती असलेल्यांसाठी तो सहाय्यक आहे. म्हणूनच फौजदारी कायद्याचे ज्ञान साऱ्यांनी प्राप्त करून घ्या.” असा आपल्या व्याख्यानाचा शेवट धीरज घाडगे यांनी केला.
त्यांच्या व्याख्यानातून ‘सुरुची’ प्रकरणातील त्यांचा अनुभव, कौटुंबिक हिंसाचार कायदा, बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायदा, पोटगीचा कायदा आदी कायद्यांची माहिती, त्यांचा होणारा गैरवापर याची माहिती त्यांनी दिली. तसेच नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा आणि फौजदारी कायद्याचे ज्ञान ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला.कुटुंबात वाद विवाद होऊ नये यासाठी प्रत्येकाने मृत्यूपत्र तयार करून ठेवावे.हयातीत ते कितीही वेळा बदलता येते असेही ऍड धीरज पाटील म्हणाले.
श्री. रवींद्र भोसले यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय मर्ढेकर यांनी प्रास्ताविक केले. विजय ढेकाणे यांनी परिचय करून दिला.
या कार्यक्रमाचे प्रायोजन सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश श्री. प्रताप कृष्णराव शिंदे यांनी केले होते. कार्यक्रमाला श्रोत्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवली.
- ‘रामधून’ ची निर्मिती नियतीनेच करवून घेतली
- Next Post