‘रामधून’ ची निर्मिती नियतीनेच करवून घेतली
‘रामधून’ ची निर्मिती नियतीनेच करवून घेतली
– जयंत भिडे
पुणे – ‘नादातुनीया नाद निर्मिती, श्रीराम जयराम जयजयराम’ ही रामधून नियतीनेच माझ्याकडून लिहून घेतली, मला कृतार्थ वाटले, असे मनोगत गीतकार जयंत भिडे यांनी व्यक्त केले.
ब्राह्मण सेवा संघाच्यावतीने इंदापूर येथे अक्षय्य तृतीयेला परशुराम जयंती उत्सव साजरा करण्यात आला. पारंपारिक पद्धतीने श्री परशुरामाची शोभायात्रा काढण्यात आली आणि येथील प्रसिद्ध श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात शोभायात्रेची सांगता करण्यात आली. याप्रसंगी जयंत भिडे विशेष अतिथी होते.
रामधून निर्मिती बद्दल उपस्थितांना उत्सुकता होती. त्याविषयीची माहिती भिडे यांनी उपस्थितांना दिली. संगीतकार आणि गायक किशोर कुलकर्णी यांनी मला चाल पाठविली आणि त्यावर रामधून लिहिण्याविषयी सांगितले. ‘नादातुनीया नाद निर्मिती’, ही पहिली ओळ सुचली आणि पावसाच्या सरी कोसळाव्या तसे शब्द सुचत गेले. अक्षय्य टिकणारी ही निर्मिती अगदी काही वेळातच घडली, याचे गीतकार म्हणून मला समाधान आहे, ही माझ्यावर झालेली श्रीरामाची कृपाच मी मानतो, असे भिडे यांनी सांगितले. रामधून च्या निर्मितीत कै.किशोर कुलकर्णी यांचा मोलाचा वाटा असल्याचे भिडे यांनी कृतज्ञतापूर्वक नमूद केले.
ब्राह्मण समाजातील युवा, युवतींनी नोकऱ्यांच्या मागे न लागता स्वतंत्र उद्योग, व्यवसाय उभे करावेत, तसेच समाजातील पुढे जाणाऱ्या व्यक्तींना समाजाने प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
ब्राह्मण सेवा संघाच्यावतीने भिडे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. त्यानंतर मंदिरात अरविंद गारटकर आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते आरती करण्यात आली. शिरीष जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
ब्राह्मण सेवा संघाचे डॉ.अमोल उन्हाळे, केदार गोसावी, ॲड.प्रसन्न जोशी, विनय देशपांडे, राजेंद्र जोशी, श्याम महाजन, मोहन गोसावी, प्रशांत दुनाखे, ॲड.अनिरुद्ध कुगावकर, प्रसाद जोशी, प्रसन्न दुनाखे, स्नेहल जकाते, रसिका देशपांडे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.