पुण्यात अपेक्षेपेक्षा कमी मतदान
पुण्यात अपेक्षेपेक्षा कमी मतदान
पुणे – पुणे शहर लोकसभा मतदारसंघात ५१.५६ टक्के मतदान झाले. २०१९ सालच्या निवणुकीच्या तुलनेत २ टक्क्यांनी मतदान वाढले आहे. मात्र, यावेळी काँग्रेसचे उमेदवार आमदार रविंद्र धंगेकर आणि भाजपचे उमेदवार, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये चुरशीची लढत असल्यामुळे ६० टक्के मतदान होणे अपेक्षित होते.
पुणे शहर लोकसभा मतदारसंघात २०लाख६१हजार२७६मतदार आहेत. त्यापैकी१०लाख५७हजार१६९ मतदारांनी मतदान केले. हे प्रमाण ५१.५६ टक्के आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे ६ मतदारसंघ आहेत. त्यापैकी कसबा मतदारसंघ सर्वात छोटा आहे. २लाख७६हजार९९७ मतदार या मतदारसंघात आहेत. मतदान १लाख६०हजार३८१ जणांनी केले. हे प्रमाण ५७.९० टक्के आहे. काँग्रेस पक्षाचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे या मतदारसंघाचे आमदार आहेत.
कोथरूड मतदारसंघावर भाजपच्या अपेक्षा खूप आहेत. येथील ४लाख२४हजार७५५ मतदारांपैकी २लाख३हजार६४५ मतदारांनी मतदान केले. हे प्रमाण ४९.०१ टक्का आहे. भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ या मतदारसंघातील प्रभागातून महापालिकेवर निवडून आले होते. त्यामुळे या मतदारसंघात मतदान वाढेल, अशी भाजपची अपेक्षा होती.
शहरात वडगाव शेरी हा विधानसभा मतदारसंघ मोठा आहे. येथे ४लाख६७हजार६६९ मतदार आहेत. त्यातील २लाख३२हजार४८० जणांनी मतदान केले. हे प्रमाण ४९.७१ टक्के आहे.
पुणे कॅन्टोन्मेंट हा राखीव मतदारसंघ आहे. येथे ५०.५२ टक्के मतदान झाले. २लाख८२हजार२७० मतदारांपैकी १लाख४२हजार६०२ मतदारांंनी मतदान केले.
पर्वती मतदारसंघात ३लाख४१हजार५५ मतदार असून झालेले मतदान १लाख७७हजार३४८ आहे. हे प्रमाण ५२.४३ टक्के आहे.
शिवाजीनगर मतदारसंघात २लाख७८हजार५३० मतदार आहेत. त्यातील १लाख४०हजार७१३ मतदारांनी मतदान केले. हे प्रमाण ४९.७२ टक्के आहे.
२०१९ सालच्या तुलनेत जरी २ टक्के मतदान वाढले असले तरी, आणखी ८ टक्के वाढ अपेक्षित होती. ती न झाल्याने भारतीय जनता पक्षाच्या गोटात उत्साहाचे वातावरण दिसत नाही. सोसायटीतील मतदारांनी मतदान टाळले, असे भाजपच्या एका नेत्याने सांगितले.
भाजपच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या प्रमुख नेत्यांच्या सभा झाल्या. काँग्रेसच्या प्रचारासाठी खासदार राहुल गांधी, माजी मुख्य मंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी, खासदार शशी थरूर, ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्य मंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभा झाल्या. एवढे दिग्गज नेते प्रचारात उतरूनही मतदान कमीच झाले.