मुंबईतील एनसीबीच्या कारवाईचे सातारा कनेक्शन ?
मुंबईतील एनसीबीच्या कारवाईचे सातारा कनेक्शन?
तब्बल 200 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; चौघांना अटक
मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) मुंबई युनिटने अलीकडील सर्वांत मोठी कारवाई केली असून त्यांनी 200 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले. त्यामध्ये कोकेन, गांजा व कॅनेबीज या प्रकारच्या जवळपास 22 किलो अंमली पदार्थांचा समावेश आहे. या कारवाईत चारजणांना अटक करण्यात आली असून त्यांचे कनेक्शन सातारा-कोरेगाव मध्ये असल्याची माहिती मिळत आहे. या माहितीमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.
एनसीबी मुंबईने विभागीय अतिरिक्त आयुक्त अमित घावटे यांच्या नेतृत्वाखाली जानेवारी महिन्यात 200 ग्रॅम कोकेन जप्त केले होते. त्या कारवाईनंतर गुप्त माहितीच्या आधारे एका आंतरराष्ट्रीय कुरिअर कंपनीच्या कार्यालयात ऑस्ट्रेलियाला जाणार्या पार्सलची तपासणी करण्यात आली. तेथून प्राप्त माहितीच्या आधारे तांत्रिक व मानवी अभ्यास करण्यात आला. त्यानंतर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची माहिती मुंबई विभागीय युनिटला मिळाली व ते अंमली पदार्थ नवी मुंबई भागात असल्याचे समोर आले. त्या आधारे टाकलेल्या छाप्यात अंमली पदार्थांचा मोठा साठा हाती लागला.
यामध्ये उच्च दर्जाचे 11.540 किलो कोकेन, 4.90 किलो हायड्रोपोनिक गांजा व 5.50 किलो वजनी कॅनाबीज जप्त करण्यात आले. या अंमली पदार्थांची 200 पाकिटे होती. यासोबतच 1.60 लाख रुपयांची रोख रक्कमही ताब्यात घेण्यात आली आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत चौघांना अटक करण्यात आली आहे. या चौघांची चौकशी सुरु असताना यातील मुख्य संशयित सिद्धेश परशुराम पवार, ऋषिकेश राजेंद्र पवार यांच्याबरोबर संशयितांना मदत व विक्रीस मदत केल्याप्रकरणी प्रतिक धनंजय पवार आणि विक्रीसाठी मदत केल्याप्रकरणी प्रथमेश राजेंद्र पवार यांना अटक करण्यात आली आहे. या चारही जणांचे कनेक्शन सातारा-कोरेगाव मध्ये असल्याचे कळत आहे.
या माहितीनंतर बिचुकले, ता. कोरेगाव येथे बुधवारी अंमली पदार्थ विरोधी सेलच्या मुंबई शाखेच्या अधिकार्यांकडून काही संशायास्पद बाबींची तपासणी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या तपासणीबाबत फारच गोपनियता बाळगण्यात आल्याने अधिक माहितीची स्पष्टता झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मुळचा बिचुकले येथील परंतु कामासाठी मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या एका तरुणाचा अंमली पदार्थांशी संबंधित घटनेत संशयास्पद संबंध असल्याच्या पार्श्वभूमीवर अंमली पदार्थ विरोधी सेलच्या अधिकार्यांनी बुधवारी बिचुकले गावात तपासणी केली. गावातील संशयित बाबींची यावेळी बारकाईने तपासणी करण्यात आली. यासाठी सुमारे पाच-सहा तास तरी संबंधित अधिकारी गावात उपस्थित होते, असे सांगण्यात येत आहे. पण, अधिक माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, याबाबत वाठार स्टेशन पोलीस स्टेशन पोलीस ठाण्यात या कारवाईबाबत संपर्क साधण्यात आला. यावर संबंधित पथकाने बिचुकले गावात तपासणी केली असली तरी त्यांनी कोणतीही अधिकृत माहिती पुरवली नसल्याचे सांगण्यात आले.