वाई:व्यंगचित्र ही मुळातच दुर्मिळ कला
स्क्रीनवर व्यंगचित्र दाखविताना व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी
- वाई :व्यंगचित्र ही मुळातच दुर्मिळ कला आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ यासारख्या प्रख्यात वृत्तपत्रात सुद्धा आर. के. लक्ष्मण हा एकच व्यंगचित्रकार आहे. व्यंगचित्र म्हणजे चित्रकला आणि विनोदबुद्धी या दोन कलांचा संगम होय. सामाजिक दृश्यामधील विसंगती टिपता आली आणि मनात ती जशी उमटली आहे तशी कागदावर रेखाटता आली तरच व्यंगचित्राचा जन्म होतो. म्हणूनच व्यंगचित्रकार होणे तसे अवघडच. असे विवेचन प्रसिद्ध मराठी व्यंगचित्रकार श्री. प्रशांत कुलकर्णी यांनी आपल्या व्याख्याना दरम्यान केले. लोकमान्य टिळक संस्था संचालित १०८व्या वसंत व्याख्यानमालेच्या दहाव्या पुष्पात ‘रेषा, भाषा आणि हशा’ या विषयावरती ते मार्गदर्शन करत होते. यावेळी वाईचे सुप्रसिद्ध निसर्गचित्रकार श्री. सुनील काळे हे अध्यक्षस्थानी होते.
प्रशांत कुलकर्णी म्हणाले, “ऑलम्पिक या खेळाकडे भारतीय उदासीनतेने पाहतात. यावरूनच काही व्यंगचित्रे मला सुचली. ऑलम्पिक या खेळात भारत अव्वल यश मिळवू शकला नाही यात राजकारणी, प्रशासन, खेळाडू आणि आपण सर्वच दोषी आहोत. क्रिकेट हा भारतीयांचा आवडता खेळ नसून क्रिकेट पाहणं हा भारतीयांचा आवडता खेळ आहे. यावरूनही माझी काही व्यंगचित्रे निर्माण झाली. सामाजिक बदल दाखवण्यासाठी व्यंगचित्र हा सर्वोत्तम पर्याय आहे. दोन शतकांमधला फरक हा सहज लक्षात येण्यासारखा नाही मात्र व्यंगचित्र तो लगेच लक्षात आणून देतात. शंभर वर्षांपूर्वीच्या शिक्षण व्यवस्थेने आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिल. मात्र आजची शिक्षण व्यवस्था परदेशात स्वातंत्र्य आहे तिथे जा असं सांगते. मध्यमवर्गीयांची मानसिकता अशी असते की क्लासला घातलं की अंमळ यश मिळणारच. दहावी-बारावीला, मार्कांना असणारं अनाठायी महत्व बघता असं वाटतं की मार्क्सवादाचा जन्म भारतातच झाला आहे. सध्या दोन पिढ्यांमध्ये पाटी ते कीबोर्डच अंतर पाहायला मिळतं. पुढच्या काही वर्षात ‘हस्ताक्षर म्हणजे काय?’ असं देखील विचारले जाईल पिढ्यांमध्ये येणारे हे अंतर मी माझ्या व्यंगचित्रांद्वारे अधोरेखित करतो.
सध्या आरोग्यविषयक जागृकता निर्माण झालीये. पण वजन हा एकच निकष उत्तम आरोग्यासाठी वापरला जातो. यावरून प्रेरित होऊन मी अनेक व्यंगचित्र काढली. मी एकच सल्ला देईन रोज एक व्यंगचित्र बघून हसा आणि प्रकृती उत्तम ठेवा.
व्यंगचित्रात व्यक्तीच्या तोंडचे संवाद दाखवण्यासाठी बलून काढतात. यावरूनच मला वेगवेगळ्या बोलण्याच्या पद्धती दाखवण्यासाठी वेगवेगळे बलून काढण्याची कल्पना सुचली. जसे आघळ-पघळ बोलणाऱ्यांचे बलून आघळपघळ, कोड्यात बोलणाऱ्यांचे बलून कोड्यासारखे, जहाल वक्तव्य करणाऱ्यांचे बलून पेटलेलेच आणि खोटी आश्वासन देणाऱ्यांचे बलून शेवटी फुटलेले.
भारत हा खड्ड्यांचाच देश पूर्वी पुण्यात घर क्रमांक प्रसिद्ध होते आता खड्डे क्रमांक प्रसिद्ध झाले आहेत. यावर मी पुणेरी खड्ड्यांची एक व्यंगचित्रमाला काढली. ती इतकी प्रसिद्ध झाली की पुणेकर नसणाऱ्यांकडून देखील प्रचंड प्रतिसाद मिळाला.
व्यंगचित्र काढण्यासारखे राजकारणात इतके प्रसंग आहेत की कधीतरी वाटतं राजकारणी व्यंगचित्रकारांसाठीच काम करतात. यावरून एक व्यंगचित्र असं सुचलं की दुष्काळी भागातील एक स्त्री म्हणते, ‘पाण्याने तळ गाठलाय की गलिच्छ राजकारणाने हेच समजत नाही’ एका कुटुंबाचे व्यंगचित्र काढून त्याखाली मी ‘माजी, मुख्यमंत्री आजी मुख्यमंत्री आणि भावी मुख्यमंत्री’ असे लिहिले. घराणेशाहीला दर्शवणारे हे व्यंगचित्र रसिकांना प्रचंड आवडले. आज देशात पाणी टंचाई इतकी जास्त आहे की ‘निवडून कोण येणार?’ यापेक्षा ‘आज पाणी येणार का?’ हा प्रश्न मोठा झाला आहे. यावरच मी अनेक व्यंगचित्र रेखाटली .”
कुलकर्णी यांनी बोरिवली येथील पाणी प्रश्न संदर्भात राजकारण्यांनी केलेले दुर्लक्ष अधोरेखित केले. अनेक सामाजिक प्रश्नांना त्यांनी व्यंगचित्रमार्फत मांडण्याचा प्रयत्न केला. व्याख्यानादरम्यान पडद्यावरती त्यांनी रेखाटलेली अनेक व्यंगचित्रे श्रोत्यांना दाखवण्यात आली. व्याख्यानाच्या अखेरीस त्यांनी माजी मुख्यमंत्री श्री. शरद पवार यांचे प्रत्यक्ष व्यंगचित्र तिथे काढून दाखवले. सुनील काळे यांनी भारतातील कलेला अधिक प्रोत्साहन मिळावे असे वक्तव्य आपल्या अध्यक्षीय मनोगताद्वारे केले. मंदार पटवर्धन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. डॉ. स्वाती देशपांडे यांनी आभार मानले.
श्री. विनीत पोफळे व डॉ. प्रशांत पोळ यांनी या व्याख्यानाचे प्रयोजन केले होते. अनेक रसिक प्रेक्षक कार्यक्रमास उपस्थित होते.