आईचे स्वप्न पुर्ण केल्याचे समाधान: आडम
बिडी कामगारांना घरे मिळवुन देण्याचे आईचे स्वप्न पुर्ण केल्याचे समाधान– नरसैय्या आडम
वाई, ता. २१ : बिडी कामगारांना घर मिळवून देण्याचे स्वप्न माझ्या आईने पाहिले. मी आमदार झाल्यानंतर ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी उचलली. हे करत असताना अनेक अडचणी आल्या. केवळ सोलापूर नव्हे तर मुंबई -पुणे सर्वत्र मोर्चे काढले. अनेक राजकीय नेत्यांना निवेदने पाठवली तेव्हा कुठे एकेका घराची एक एक भिंत उभी राहिली. असे सोलापूरचे ज्येष्ठ कामगार नेते नरसैय्या आडम म्हणाले. लोकमान्य टिळक संस्था आयोजित १०८व्या वसंत व्याख्यानमालेच्या विसाव्या ज्ञानसत्रात ‘घरकुल बिडी कामगारांचे’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी श्री अनिल जोशी यांनी अध्यक्ष पद भूषवले.
आडम मास्तर म्हणाले,माझे शिक्षण नववीपर्यंत झाले. घरच्या परिस्थितीमुळे पुढे शिकता आले नाही.वडील गिरणी कामगार व आई बिडी कामगार होती. माझे सीमेवर जाऊन देशासाठी काम करण्याचे स्वप्न होते. सैन्य भरतीसाठी जेव्हा मला अपात्र ठरवले गेले तेव्हा मला प्रचंड निराशेने ग्रासले. मात्र कामगार सेवा ही सुद्धा देशसेवाच आहे हे शेवटी मला समजले. तिथूनच मी माझ्या कामाला सुरुवात केली.
बैलगाड्या बंद करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीरनामा काढला होता तेव्हा 500 बैलगाड्या घेऊन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर मोर्चा काढला तो यशस्वी झाल्यानंतर मी खऱ्या अर्थाने कामगारांचा नेता झालो.
1978 मध्ये मी आमदार झाल्यानंतरअनेक आव्हाने समोर येत होती. या दरम्यानच 3000 बिडी कामगारांना मी घरे मिळवून दिली. 1995 सालच्या निवडणुकीत 5000 बिडी कामगारांनी मी पुन्हा उभ रहावं यासाठी मला गळ घातली. मी पुन्हा उभा राहिलो, निवडूनही आलो. आता आमच्या समोर आव्हान होतं ते राहिलेल्या बिडी कामगारांसाठी घर उभारण्याचं. एका बिडी कामगारासाठी केंद्र सरकारने पाच हजार रुपये निधी मान्य केला होता. मात्र ही रक्कम घर बांधण्यासाठी पुरेशी नाही. याबाबत विधानसभेत निवेदन सादर केलं ते मनोहर जोशींनी केंद्रापर्यंत पोहोचवलं.हे निवेदन मात्र मान्य होईना. शेवटी शरद पवारांना जाऊन भेटलो. आम्ही पुन्हा केंद्र सरकारकडे निवेदन घेऊन गेलो. तेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी दहा हजार रुपये निधी मान्य केला. आम्ही केंद्रातून पुन्हा सोलापूर मध्ये आलो. आठ दिवसांनी आम्हाला 1000 रुपये मान्य झाल्याचे पत्र आलं. पुन्हा शरद पवार यांच्यामार्गदर्शनाखाली होत असलेल्या गैरप्रकाराची तपासणी केली. शेवटी तत्कालीन प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांच्या हस्ते दहा हजार रुपये मनी ऑर्डर लोकांना देण्यात आली.
ह्या घर बांधणीसाठी 14 वर्षे संघर्ष करावा लागला. 2014 मध्ये पुन्हा केंद्र सरकारकडे मागणी करावी लागली. 8 जानेवारी 2019 रोजी 30000 घरांची पायाभरणी करण्यात आली. 19 एप्रिल 2024 ला यातील काही घरे पूर्ण झाली.यंदाच्या डिसेंबर मध्ये राहिलेली घरे पूर्ण करण्याचा संकल्प आहे.
कामगार न्यायालयामध्ये 17 वर्षे मी कामगारांसाठी लढत आहे. सर्वोच्च न्यायालयातून निकाल घेऊन दहा हजार घरे मिळवली.
हा सारा प्रवास करत असताना, कामगारांसाठी काम करत असताना अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या. यातून असे सांगावेसे वाटते भारतीय समाज व्यवस्थेमध्ये जी आर्थिक विषमता आहे ती दूर करण्याची जबाबदारी आपली आहे. धर्म जात राजकारणात आणून चालणार नाही. गरीबी,विषमता,जातीवादाविरुद्ध संघर्ष करून आदर्श भारत घडवण्याची जबाबदारी आपली आहे.
बिडी कामगारांसाठी घरे उभारताना करावा लागणाऱ्या संघर्षमय प्रवास आडम मास्तरांनी वर्णित केला. सध्याच्या भारताच्या समाज व्यवस्थेत चालू असणारा गैरप्रकार थांबवण्याची जबाबदारी सर्व भारतीयांची आहे व ते आपण करावे असे आव्हान त्यांनी केले. श्री अनिल जोशी यांनी अध्यक्षीय मनोगत प्रकट केले.
डॉ शंतनू अभ्यंकर यांनी आभार मानले. श्रीमती उज्वला ब्रह्मे यांनी या कार्यक्रमाचे प्रायोजन केले होते. व्याख्यानास उपस्थित श्रोत्यांना एक नवी दिशा लाभली.