ग्रामीण रुग्णालयाच्या सोयी सुविधांसाठी निधी देणार – राज्यपाल रमेश बैस


महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या सोयी सुविधांसाठी निधी देणार
– राज्यपाल रमेशबैस

सातारा दि. 22 :- आरोग्य सेवाही ईश्वर सेवा आहे. महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात गरजु व गरीब जनतेवर चांगल्या पद्धतीने उपचार केले जातात. या रुग्णालयाच्या सोयी सुविधा व औषधांसाठी निधी उपलब्ध करुन देणार, अशी ग्वाही राज्यपाल रमेश बैस यांनी दिली.

राज्यपाल श्री. बैस यांनी महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयाची पहाणी केली. यावेळी ते बोलत होते. या पहाणी प्रसंगी राज्यपाल महोदयांच्या सहसचिव श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, तहसीलदार तेजिस्विनी पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, जयसिंग मरीवाला, फादर टॉमी, डॉ. प्रमे शेठ, डॉ. श्रीकांत वैद्य आदी उपस्थित होते.

Advertisement

शिक्षण व आरोग्यावर भर दिला तर देशाची जास्त प्रगती होईल, असे सांगून राज्यपाल श्री. बैस म्हणाले, महाबहेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी सेवाभावी वृत्तीने नागरिकांना आरोग्य सेवा देत आहेत. त्यांचे काम खूप चांगले असून मागील काळातही ग्रामीण रुग्णालयाला निधी दिला असून भविष्यातही निधी दिला जाईल.

राज्यपाल श्री. बैस यांनी अपघात विभाग, आय.सी.यु. विभाग, रेडिओलॉजी विभाग, प्रयोग शाळा, महिला विभाग, बालरुग्ण विभाग, बाह्यरुग्ण विभागाची पहाणी करुन तेथील सोयी सुविधांचाही आढावा घेतला.

*रुग्णांची केली आस्थेवाईकपणे चौकशी*
राज्यपाल श्री. बैस यांनी महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. रुग्णालयात उपचार व औषधे वेळेवर मिळतात का अशी विचारणा केली.
0000


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!