डॉ.प्रमोद चौधरी यांना ऋग्वेद भूषण पुरस्कार प्रदान
डॉ.प्रमोद चौधरी यांना
ऋग्वेद भूषण पुरस्कार प्रदान
पुणे – शेतकऱ्यांना पूरक व्यवसायाकरिता उद्योजक डॉ.प्रमोद चौधरी यांनी मार्गदर्शन करावे आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहन सिंबायोसिस संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष डॉ.शां.ब.मुजुमदार यांनी ऋग्वेद भूषण पुरस्कार वितरण प्रसंगी केले.
देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेचा मानाचा ऋग्वेद भूषण पुरस्कार आणि मानपत्र प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक, उद्योजक डॉ.प्रमोद चौधरी यांना डॉ.शां.ब.मुजुमदार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कुलकर्णी अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे कार्यवाह जयंत देशपांडे, विश्वस्त सुनीता तावरे व्यासपीठावर उपस्थित होत्या. याप्रसंगी सवाई गंधर्वांच्या कन्या कै.प्रमिलाताई वसंत देशपांडे स्मरणार्थ संगीत पुरस्कार विराज जोशी यांना आणि कै.सरदार आबासाहेब मुजुमदार स्मरणार्थ समाजभूषण पुरस्कार कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणे यांना प्रदान करण्यात आला. तसेच संस्थेच्या अन्य पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. संस्थेच्या शताब्दी निमित्ताने स्मरणिकेचे प्रकाशन डॉ.चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.
एखाद्या संस्थेची शताब्दी साजरी होणे ही सामान्य बाब नाही. संस्थापकांपासून आजवरच्या सदस्यांनी केलेल्या कामामुळे ही वाटचाल यशस्वी झाली आहे, असे गौरवोद्गार डॉ.मुजुमदार यांनी काढले.
ऋग्वेद भूषण पुरस्काराचे मानकरी डॉ.चौधरी हे डॉ.मुजुमदार यांचे विद्यार्थी आहेत. गुरूंच्या हस्ते शिष्याचा गौरव असा अनोखा योग या कार्यक्रमात जुळून आला. शिक्षणाला उत्तेजन देण्याकरिता स्थापन झालेल्या देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेने शंभर वर्षे नेटाने कार्य चालविले याबद्दल डॉ.चौधरी यांनी संस्थेची प्रशंसा केली.
या कार्यक्रमात प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत अध्यक्ष राजेंद्र कुलकर्णी यांनी केले. मानपत्राचे वाचन कार्यवाह जयंत देशपांडे यांनी केले. सूत्रसंचालन मुख्य चिटणीस सुनील पारखी यांनी केले. सहसचिव अनिल पानसे यांनी आभार मानले.
फोटो ओळ
देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेचा ऋग्वेद भूषण पुरस्कार आणि मानपत्र उद्योजक डॉक्टर प्रमोद चौधरी यांना डॉक्टर शां.ब.मुजुमदार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कुलकर्णी आणि विश्वस्त सुनीता तावरे व्यासपीठावर उपस्थित होत्या.