एनडीए पदवीदान समारंभ
प्रा . सतप्रकाश बन्सल यांच्या हस्ते
पदवीदान समारंभ उत्साहात
पुणे
पुण्यामध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये(एनडीए) हबीबुल्ला सभागृहात 146 व्या पदवीदान समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी 205 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची प्रतिष्ठेची पदवी प्रदान करण्यात आली.
हिमाचल प्रदेश केंद्रीय विद्यापीठ, धरमशाला आणि हिमाचल प्रदेश विद्यापीठ, सिमला(अतिरिक्त प्रभार) चे कुलगुरु प्रा . सतप्रकाश बन्सल या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विज्ञान शाखेच्या 82, कंप्युटर सायन्सच्या 84 आणि कला शाखेच्या 39 कॅडेट्सना पदव्या प्रदान करण्यात आल्या. परदेशी मित्र देशांच्या 17 कॅडेट्सना देखील पदवीदान समारंभात पदव्या प्रदान करण्यात आल्या. त्याशिवाय नौदल आणि वायूसेनेच्या 132 कॅडेट्सचा समावेश असलेल्या बी. टेक शाखेला देखील तीन वर्षे अभ्यासक्रम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. नौदल आणि वायूसेनेच्या या कॅडेट्सना एझिमला येथील भारतीय नौदल अकादमी आणि हैदराबाद येथील हवाई दल अकादमीमध्ये त्यांचे प्री-कमिशनिंग प्रशिक्षण अभ्यासक्रमांतर्गत एक वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर पदवी प्रदान करण्यात येईल.
यावेळी स्प्रिंग टर्म-2024चा शैक्षणिक अहवाल सादर करण्यात आला. जागतिक ख्यातीच्या अतिशय प्रतिष्ठेच्या प्रशिक्षण अकादमींपैकी एक असलेल्या संस्थेमधून आपले खडतर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांनी या कॅडेट्सचे अभिनंदन केले. भारतीय संरक्षण दलांच्या अतिशय प्रतिष्ठेच्या या त्रि-सेवा प्रशिक्षण संस्थेत आपल्या पाल्यांना प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या सर्व पालकांचे त्यांनी अभिनंदन केले आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
तत्पूर्वी, पासिंग आऊट परेडच्या पूर्वार्धात, लष्करी प्रशिक्षणाच्या विविध पैलू द्वारे आत्मसात केलेल्या कौशल्यांच्या वेचक मानकांचे सादरीकरण बॉम्बे स्टेडियम,राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी,पुणे येथे आयोजित करण्यात आले. त्यात युद्ध आणि साहसाच्या नेत्रदीपक विस्मयकारक प्रेरणादायी प्रात्यक्षिकांचा समावेश होता. या प्रात्यक्षिकांना लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांची उपस्थिती होती. प्रेक्षकांमध्ये विविध क्षेत्रातील ज्येष्ठ मान्यवर आणि अभ्यासक्रमात उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थींचे अभिमानी पालक आणि 146 व्या अभ्यासक्रमातील प्रशिक्षणार्थी यांचा समावेश होता. घोडदळ परंपरेनुसार उभे राहून अभिवादन करत आणि ध्वजारोहण करून उपस्थितांचे स्वागत करत सादरीकरणाला सुरुवात झाली.उच्च दर्जाचे प्रशिक्षण, कृतींचे संपूर्ण समक्रमण आणि शारीरिक उत्कृष्टता दाखविणारे 270 प्रशिक्षणार्थी आणि 38 घोडे यांचा यात समावेश होता.
प्रशिक्षणार्थींच्या धाडसी आणि निर्भय अश्वारूढ प्रदर्शनाने सर्वांना मंत्रमुग्ध आणि थक्क केले.राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या तीनही संरक्षण दलांच्या प्रशिक्षणार्थींनी एकत्र येऊन आपल्या सहयोगाने एक चढाईचे प्रात्यक्षिक दाखवले. त्यानंतर आकाश गंगा टीमने साहसी आणि चित्तथरारक स्काय डायव्हिंग प्रात्यक्षिक दाखवले.त्यानंतर प्रशिक्षणार्थींनी दोरीवरचे व्यायाम व विविध जिम्नॅस्टिक क्रीडांचा समावेश असलेले उत्तमप्रकारे समक्रमित केलेले आणि उत्साहवर्धक शारीरिक प्रशिक्षणाचे सादरीकरण केले. हाई हॉर्स टीमने 146 व्या अभ्यासक्रमाला अलविदा करणारा चित्ररथ सादर केल्यानंतर या कार्यक्रमाचा समारोप झाला.