चातुर्मास प्रवचनमालेला प्रारंभ


चातुर्मास प्रवचनमालेला प्रारंभ

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मासानिमित्त आयोजित प्रवचन,कीर्तन महोत्सवाला शनिवारी प्रारंभ झाला.

येथील गणेश कला क्रीडा मंच येथे प्रवचनमालेत दिनांक ९ आॅगस्ट पर्यंत दररोज सायंकाळी ६ वाजता डॉ.पंकज उर्फ चेतनानंद महाराज यांचे श्री ज्ञानोबा-तुकोबांविषयी प्रवचन होणार आहे.

ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महोत्सवास सुरुवात करण्यात आली.या प्रसंगी महावितरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पवार, अप्पा रेणुसे, ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.

उल्हास पवार म्हणाले, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु तुकाराम महाराजांचा वसा घेऊन भागवत तत्वज्ञान सामान्यांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न अशा उपक्रमांतून केला जात आहे.

Advertisement

प्रास्ताविकात ट्रस्टचे सरचिटणीस हेमंत रासने म्हणाले, गेली ४० वर्षे चातुर्मासाचे औचित्य साधून ट्रस्टतर्फे कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मानव सेवेचे महामंदिर उभारत असताना सामाजिक उपक्रमांसोबतच चातुर्मासात प्रवचन, कीर्तन देखील आयोजित केले जाते.

शनिवारपासून (दि. ३ आॅगस्ट) अनुक्रमे परळी वैजनाथ येथील ह.भ.प. भागवताचार्य तुकाराम महाराज मुंडे, परभणी मानवत चे ह.भ.प. उमेश महाराज दशरथे, मराठवाडयातील विदर्भ रथ ह.भ.प. रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर, देहू गाथा मंदिर येथील ह.भ.प. पांडुरंग महाराज घुले, आळंदी साधक आश्रमाचे ह.भ.प. यशोधन महाराज साखरे, जळगावचे ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, अहिरेगावचे ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे हे कीर्तन करणार आहेत. महोत्सवाला प्रवेश खुला असून प्रवचन, कीर्तनाचा भाविकांनी आनंद घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी केले आहे. महेश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!