प्रवचने:-श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज


साधन – चतुष्टय.

कोणतीही इमारत बांधीत असताना अगोदर तिचा पाया जसा घालावा लागतो, त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी अगोदर साधनांचा पाया घालावा लागतो. शास्त्राने चार प्रकारचे साधन सांगितले आहे. प्रथम, नित्यानित्यवस्तुविवेक करावा. अनित्य जो विषय त्याच्या बाबतीत आपण उदास व्हावे आणि नित्य जो भगवंत त्याच्याकडे लक्ष द्यावे. नंतर, या जगातल्या किंवा स्वर्गातल्या भोगाची वासना नाहीशी करावी. हे दुसरे साधन होय. आपले मन बाह्य विषयांकडे धाव घेते; तिथून त्याला खेचून आणावे आणि भगवंताकडे लावावे. आपण चूक केली नसतानाही कोणी जाच केला तरी शांतपणे सहन करावे, गुरूच्या सांगण्यावर विश्वास ठेवावा, हर्ष विषाद न मानता संतोषाने राहावे; हे तिसरे साधन होय. शेवटी, भगवंताच्या भेटीची खरी तळमळ लागावी. ही सर्व साधनसामग्री असेल तरच साधकाला ब्रह्मदर्शन घडेल. ब्रह्मदर्शन होण्यासाठी कडकडीत वैराग्य असावे लागते. पैशाचा लोभ पूर्णपणे गेला पाहिजे. मनामधली कामवासना पूर्णपणे गेली पाहिजे. मोहाला बळी पडता कामा नये.

Advertisement

नुसता प्रपंच चांगला करणे हे काही मनुष्यजन्माचे ध्येय नव्हे. जनावरेदेखील आपापला प्रपंच करतातच. मनुष्याने भगवंताची उपासना करून त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे, तरच प्रपंचातल्या कष्टांचे सार्थक होते. सध्याच्या परिस्थितीमध्ये उपासना करायला नामासारखा सोपा उपाय नाही. खरोखर, भगवंताच्या नामामध्ये फार मोठे सामर्थ्य साठविलेले आहे. त्याचे नाव घेऊन जो जगात वावरेल, त्याला व्यवहारामध्ये नेहमीच यश येईल असे नाही, परंतु भगवंत त्याची लाज राखील यात शंका नाही. प्रपंचातले यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत. भगवंताच्या अनुसंधानाला खरे महत्त्व आहे. रामाच्या इच्छेनेच आपल्याला सुखदुःख भोगावे लागते, पण हे आपल्याला सर्वाच्या शेवटी आठवते, म्हणून सुखदुःख बाधते. म्हणून आपण सुरुवातीपासूनच रामाची इच्छा लक्षात ठेवून वागू. यासाठी त्याच्या नामाची गरज आहे. प्रपंचाची तर्‍हा अशी असते की, आज सुख झाले म्हणून जरा बरे वाटले, की लगेच उद्या दुःखाचे ताट पुढे वाढून ठेवलेले असते. म्हणून, एका डोळ्यात सुखाचे अश्रू, तर दुसर्‍या डोळ्यात दुःखाचे अश्रू ठेवून माणसाने प्रपंचात वागावे. प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेनेच जर घडते, तर एकीचे सुख आणि दुसरीचे दुःख का मानावे ? शहाण्या माणसाने आपले चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावे, आणि बरावाईट जसा प्रसंग येईल त्यात सामील होऊन जावे. जो नाम घेईल त्याच्या मागे राम उभा आहे. नाम घेणार्‍याचे राम कल्याण करतो, एवढे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका.

**अती प्रेमाने नाम घ्यावे. नामात तल्लीन झाल्यावर देहाची सुखदुःखे बाधणार नाहीत.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!