नीती आयोग सादर करणार अहवाल
नीती आयोग सादर करणार अहवाल
नवी दिल्ली
नीती आयोग उद्या 18 जुलै, 2024 रोजी “इलेक्ट्रॉनिक्स: जागतिक मूल्य साखळीत भारताच्या योगदानाला पाठबळ (पॉवरिंग इंडियाज पार्टिसिपेशन इन ग्लोबल व्हॅल्यू चेन्स”) या शीर्षकाअंतर्गत आपला अहवाल सादर करणार आहे. हा अहवाल भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राच्या व्यापक विश्लेषणाचा निष्कर्ष आहे ज्यामधून त्याची व्याप्ती आणि आव्हाने दर्शवली आहेत. हा अहवाल देशाला इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात जागतिक दर्जाचे उत्पादन केंद्र बनविण्याचा आराखडा अधोरेखित करेल. सध्याच्या परिस्थितीत, 70% आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जागतिक मूल्य साखळीतील वस्तूंचा समावेश असून त्यातील भारताचा सहभाग वाढवण्याच्या महत्त्वपूर्ण आवश्यकतांवर भर देण्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर, ऑटोमोबाईल्स, रसायने आणि फार्मास्युटिकल्स यासारख्या क्षेत्रांना प्राधान्य देऊन हे साध्य केले जाऊ शकते, जे मूल्य साखळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. जागतिक मूल्य साखळीत, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राला महत्त्वाचे स्थान आहे कारण जवळपास 80% इलेक्ट्रॉनिक्स निर्यात जागतिक मूल्य साखळीच्या वस्तूंद्वारे होत असते.
सध्या, भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनामध्ये प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक वस्तूंची असेंब्ली समाविष्ट आहे.ब्रँड आणि डिझाइन कंपन्यांनी भारतातील इलेक्ट्रॉनिक उत्पादन सेवा (ईएमएस) कंपन्यांकडून असेंब्ली, टेस्टिंग आणि पॅकेजिंगची कामे मोठ्या प्रमाणात करून घेण्यास सुरुवात केली आहे, तर डिझाइन आणि सुटे भाग निर्मिती अद्याप प्रारंभिक टप्प्यात आहे.
विकसित भारत बनण्याच्या भारताच्या प्रवासात उत्पादन क्षेत्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.जागतिक मूल्य साखळीत सहभागी होऊन, मेक-इन-इंडियाला गती देत हे साध्य केले जाऊ शकते.या दृष्टीकोनातून, नीती आयोग या विषयावर एक सर्वसमावेशक अहवाल प्रसिद्ध करेल जो इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील प्रमुख उत्पादन केंद्र बनण्यासाठी देशासाठी एक नवा आराखडा सुचवेल.