शिवभक्तांना होणार वाघनखांचे दर्शन


“शिवशस्त्रशौर्यगाथा” या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनामध्ये शिवभक्तांना घेता येणार वाघनखांचे दर्शन

शुक्रवारपासून प्रदर्शनास सुरुवात

मुंबई :
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त; सातारा येथील श्री छत्रपती शिवछत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात, इंग्लंड मधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयातून आणलेली वाघनखे, शिवभक्तांना दर्शनासाठी दिनांक 19 जुलैपासून उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालयाचे संचालक सुजितकुमार उगले यांनी दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, श्रीमंत संभाजीराजे छत्रपती व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत शस्त्र प्रदर्शन उद्घाटन सोहळा होणार असल्याचे त्यांनी पुढे नमूद केले आहे

खडतर अशा परीक्षेतून व अग्नी दिव्यातून ही वाघनखे इंग्लंड मधून भारतात येत आहेत. कारण गेले वर्षभर ही वाघनखे आणण्यासाठी विविध प्रक्रिया सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सुरू होत्या.

सातारा येथील वस्तुसंग्रहालयात दिनांक 19 जुलैपासून होणाऱ्या “शिवशस्त्रशौर्यगाथा” या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनामध्ये, या वाघनखांचे दर्शन घेता येईल.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्याचे औचित्य साधून, सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यात शिवछत्रपतींचे विचार पोहोचविणाऱ्या अनेक कार्यक्रम उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. यामध्ये जिल्हास्तरावर महानाट्याचे आयोजन करणे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निगडित घटना, स्थळे व महनीय व्यक्ती यांच्यावर आधारित 12 विशेष टपाल तिकिटांचे व टपाल आवरणाचे अनावरण करणे, दृष्टिबाधित दिव्यांगजनांना शिवाजी महाराजांचे चरित्र बेल लिपीमध्ये पुस्तक रूपाने प्रकाशित करणे, शस्त्रास्त्र प्रदर्शने करणे, गड किल्ल्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी मोठा निधी राखून ठेवणे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची देवाणघेवाण होण्यासाठी विद्वत परिषदा आयोजित करणे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रम करणे, रायगडावर तिथीनुसार शासनाच्या माध्यमातून दरवर्षी शिवराज्याभिषेक दिन साजरा करणे, छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे इंग्लंडमधून भारतात आणणे, आग्रा येथील लाल किल्ल्यामध्ये शिवजयंती उत्सव साजरा करणे, पट्टा या शस्त्राला “राज्यशस्त्र” असा दर्जा देणे….. यासारखे अनेक उपक्रम साजरे केले आहेत.

Advertisement

या शिवशस्त्र प्रदर्शनात शिवकालीन शस्त्र दालन, वस्त्र दालन, नाण्यांचे दालन व इतर दुर्मिळ वस्तू पहावयास मिळतील. तलवारींचे विविध प्रकार, बंदुकीचे विविध प्रकार, भाल्यांचे विविध प्रकार, पट्टे, कुऱ्हाडी, कट्यारी, बाण, गदा अशी वेगवेगळी शस्त्रे पहावयास मिळतील.

जिल्हा परिषद सभागृह सातारा येथे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन केलेले असून या ठिकाणी ‘गडगर्जना‘ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. शस्त्र प्रदर्शनाची माहिती पुस्तिका व सिंधुदुर्ग, रायगड, शिवमुद्रा आणि भक्तीशक्ती संगम या विशेष टपालांचे अनावरणही या निमित्ताने होणार आहे.

पुढील सात महिने हे प्रदर्शन शिवभक्तांसाठी खुले राहणार असून, मोठ्या संख्येने त्याचा लाभ घ्यावा. जिल्ह्यातील व आसपासच्या शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना हे शस्त्र प्रदर्शन पाहण्यासाठी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग व स्थानिक प्रशासनामार्फत नियोजन करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत असून नागरिकांनाही अल्प दरात हे प्रदर्शन पाहता येईल. त्यासाठी ऑनलाईन तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दिनांक 19 जुलै रोजी होणाऱ्या या कार्यक्रमासाठीच्या सन्मानिका जिल्हास्तरावर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तरी नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी व अभ्यासकानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे व पुरातत्व संचालनालयाचे संचालक सुजितकुमार उगले यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!