कलमाडींवर टीका कशासाठी ?


अपयश भाजपचे
कलमाडींवर टीका कशासाठी ?

माजी महापौर कमल व्यवहारे यांनी मेधा कुलकर्णींना सुनावले

पुणे – शहराच्या विकासात भाजपला आलेले अपयश झाकण्यासाठी माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्यावर खा.मेधा कुलकर्णी अनाठायी टीका करत आहेत, असा आरोप काँग्रेसच्या नेत्या, माजी महापौर कमलताई व्यवहारे यांनी केला.

Advertisement

राज्यसभेत एका चर्चेत बोलताना पुण्याच्या विकासाच्या संदर्भात मेधा कुलकर्णी यांनी सुरेश कलमाडी यांच्यावर टीका केली. त्या टीकेला माजी महापौर कमलताई व्यवहारे यांनी उत्तर दिले आहे. कलमाडी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने पुण्याला नावलौकिक मिळवून दिला. उद्यानांचे शहर म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर पुण्याची ओळख झाली. रस्ते, महापालिकेच्या आरोग्य सेवा, शिक्षण मंडळाच्या माध्यमातून गरिब मुलांचे शिक्षण, शहरातील सांडपाण्याचा निचरा, घन कचरा व्यवस्थापन यात कलमाडींनी मोठे काम केले. राष्ट्रकुल स्पर्धा, पुणे फेस्टिवल, पुणे मॅरेथॉन यांचे आयोजन कलमाडी करीत असत. बालेवाडी येथील शिवछत्रपती शिवाजी स्टेडियमची उभारणी कलमाडी यांच्या काळातच झाली, असे कमलताई व्यवहारे यांनी सांगितले. गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ महापालिका, राज्य केंद्र अशा सर्व ठिकाणी भाजपचीच सत्ता आहे. या काळात खा.मेधाताई आणि त्यांचा पक्ष यांनी काय काम केले? असा प्रश्न कमलताई व्यवहारे यांनी केला आहे.

गेले चार, पाच दिवस झालेल्या पावसात शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था याची पुरती वाट लागली. स्मार्ट सिटी च्या नावाखाली पुणेकरांची फसवणूक करण्यात आली. महापालिकेच्या कारभारात भ्रष्टाचार केला. भाजपचे हे अपयश झाकण्यासाठी मेधा कुलकर्णी यांनी कलमाडींवर टीका चालू केली आहे, असा आरोप कमलताई व्यवहारे यांनी मेधाताई कुलकर्णी यांच्यावर केला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!