अभ्यासिकेचे उद्घाटन


 

देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक
संस्थेच्या अभ्यासिकेचे उद्घाटन

पुणे – विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयुक्त आणि विविध पुस्तके उपलब्ध व्हावीत या करिता शैक्षणिक वाचनालये सुरू व्हावीत, असे आवाहन राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेच्या अभ्यासिकेचे उदघाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कुलकर्णी, कार्याध्यक्ष जयंत देशपांडे, सुनीता तावरे उपस्थित होते.

Advertisement

शहरातील छोट्या घरांमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेशी जागा नसते, हे लक्षात घेऊन संस्थेने अभ्यासिका चालू केली, याबद्दल ना.पाटील यांनी संस्थेची प्रशंसा केली. अभ्यासिकेला शैक्षणिक वाचनालयाची जोड दिल्यास सहकार्य करू, असे आश्वासनही पाटील यांनी यावेळी बोलताना दिले.

जो समाज, जी संस्था काही मागत नाही, यातच या संस्थेची महत्ता आहे. कुठलीही गोष्ट ओरबाडून न घेता, आवश्यक तेवढेच घेणारी ही संस्था आहे. संस्थेच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यातील योगदानात आपणही काही तरी द्यावे, या हेतूने प्रेरित होऊन मदत करण्याचे ठरविले आहे, असे संदीप खर्डेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.

या प्रसंगी विश्वजित देशपांडे, हेमंत रासने, राजेंद्र काकडे यांच्यासह अनेक मान्यवर आणि संस्थेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्ष राजेंद्र कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले आणि मुख्य चिटणीस सुनील पारखी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!