पुणे-नाशिक महामार्ग विरोधात
पुणे-नाशिक महामार्ग विरोधात
१४ गावांचे आंदोलन
पुणे – बागायती जमीन जाणार असल्याने जुन्नर तालुक्यातील चौदा गावच्या शेतकऱ्यांनी पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग प्रकल्पा विरोधात आंदोलन चालू केले आहे.
या महामार्गासाठी ८ हजार कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मात्र आंदोलनामुळे प्रकल्प रखडण्याची चिन्हे आहेत. १४ गावांमधील ग्रामस्थांनी राजुरी येथे २८ ऑगस्ट रोजी साखळी उपोषण केले. पुणे-नाशिक महामार्गाला औद्योगिक वसाहतीसाठी पर्यायी बंदिस्त मार्ग बांधला जात आहे. हा मार्ग बागायती क्षेत्रामधून आणि लोकवस्तीतून जात असल्याने ग्रामस्थांचा भू संपादनासच विरोध आहे. ग्रामस्थांचा विकासाला विरोध नाही. पण, बागायती क्षेत्र गेल्यास शेतकरी भूमीहीन होईल, अशी भीती ग्रामस्थांना वाटते.
पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग हा सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा महामार्ग झाल्यावर पुणे-नाशिक अंतर अवघ्या तीन तासांतच पार करता येणार आहे. राजगुरुनगर, चाकण, मंचर, नारायणगाव , आळेफाटा, घारगाव, संगमनेर आणि सिन्नर अशा शहरांच्या जवळून जाणार आहे. मार्गावर ११ बोगदे, ७ मुख्य पूल, आणि ६० वायडक्ट प्रस्तावित आहेत. पुणे, नाशिक आणि नगर अशा तीन जिल्ह्यांतून महामार्गाचा कॅरिडॉर जाणार आहे. २१३ किलोमीटर लांबीचा हा महामार्ग आहे. हा प्रकल्प २०हजार कोटींचा आहे. त्यातील ८हजार कोटी मंजूर झाले आहेत. आंदोलनामुळे आता या कामात अडथळे येत आहेत.
दरम्यान, पुणे-नाशिक औद्योगिक महामार्गासाठी पर्यावरणीय मंजुरीची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सुरू केली आहे.