राज्य लोकशाहीच्या महोत्सवासाठी सज्ज
राज्य लोकशाहीच्या महोत्सवासाठी सज्ज
मतदार ठरवणार आपले सरकार: राजकीय नेत्यांचा आज परीक्षेचा दिवस
सातारा
महाराष्ट्र तसेच उत्तरांचल या दोन राज्यात लोकशाहीचा महोत्सव बुधवारी साजरा होत आहे . महाराष्ट्रात नऊ कोटी 70 लाखावर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत होणार आहे. गेल्या पाच वर्षात झालेल्या मोठ्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीनंतर मतदार आपला कौल कोणाला देणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी बुधवारी मतदान होत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर भारतीय जनता पक्ष प्रणित महायुती आणि काँग्रेस प्रणित महाआघाडी यामधील सहा पक्षांसह एकूण 158 लहान मोठे पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रचाराच्या तोफा सोमवारी संध्याकाळी थंडावल्या असून बुधवारी मतदार राजा आपला मतदानाचा हक्क बजावेल. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ,मित्र पक्ष हे एकत्र येत महायुतीची स्थापना केली आहे. तर काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस हे महाविकास आघाडीचा हिस्सा आहेत.
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेची युती होती. त्यावेळी म्हणजे 2019 सालात भाजपने 105 तर शिवसेनेने 56 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला 44 तर राष्ट्रवादीला 54 जागा मिळाल्या होत्या. मात्र भाजप शिवसेनेची युती संपल्यामुळे भाजप शिवसेना युतीचे कोणी मुख्यमंत्री होऊ शकले नाही. विभाजनानंतर 23 नोव्हेंबर 2019 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र बहुमत चाचणी पूर्वीच 26 नोव्हेंबर रोजी दोघांनीही राजीनामा दिला. तर 28 नोव्हेंबर 2019 रोजी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मात्र पुन्हा त्यानंतर अडीच वर्षांनी शिवसेना आणि त्यानंतर वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आणि हे दोन पक्ष चार पक्षात विभागले गेले.
सन 2024 मधील निवडणुकीत महायुती मध्ये असणाऱ्या भाजपच्या वाट्याला 149 जागा शिवसेनेला 81 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 59 जागा मिळाल्या आहेत.
महाविकास आघाडी मधील काँग्रेसला 101 जागा, शिवसेना (उबाठा)95 तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला ८६ जागा मिळाल्या आहेत. सहा जण इतर पक्षातील उमेदवार निवडणूक लढत आहेत .
काही मतदारसंघात मित्र पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत. छोट्या राजकीय पक्षांमध्ये बहुजन समाज पक्षाने 237 उमेदवार उभे केले आहेत ,तर एएम्आयएम 17 उमेदवार रिंगणात उभे केले आहेत. याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ,वंचित आघाडी,बसपा,सपा या पक्षांनीही आपले उमेदवार उभे केले आहेत.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार अपक्षांसह विविध पक्षांचे एकूण ४१३६ उमेदवार नशीब आजमावत आहेत. यापैकी २२०१ उमेदवारांच्या प्रतिज्ञा पत्राची तपासणी ए डी आर संस्थेने केली असता, २९ टक्के उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यापैकी ४१२ जणांवर खून अपहरण बलात्कार असे गंभीर गुन्हे आहेत, तर ५० उमेदवारांवर महिलांशी संबंधित गुन्हे आहेत. सुमारे ३१ टक्के उमेदवारांचे वय २५ ते ४० च्या दरम्यान आहे .१४ टक्के उमेदवार ६१ ते ८० वयोगटातील, तर दोन उमेदवार ८० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत.अर्ज तपासणीतील 221 पैकी 204 महिला उमेदवार आहेत.
उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पाहता सत्तेचाळीस टक्के उमेदवार पाचवी ते बारावी दरम्यान आहेत. 74 उमेदवार डिप्लोमाधारक, 58 उमेदवार साक्षर तर दहा जणांनी स्वतःला अशिक्षित म्हणून घोषित केले आहे.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे रोहित पाटील हे सर्वात लहान म्हणजे 25 वर्षाचे उमेदवार आहेत.
या निवडणुकीत परस्पर विरोधी लढणाऱ्या उमेदवारांमध्ये वडील -मुलगी, पती-पत्नी ,काका -पुतणे ,चुलत -भाऊ अश्या नातेसंबंधातील एकाच घरातील मंडळी लढताना दिसत आहेत.
निवडणुकीत पैसे आणि अमली पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने नेमलेल्या भरारी पथकाने करोडो रुपयांची मालमत्ता मध्ये जप्त केले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
30 हजाराहून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तर साडेचार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान लोकशाहीच्या उत्सवासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानासाठी दोन लाख २१ हजार ६०बॅलेट युनिटचा वापर केला जाणार आहे. निवडणुकीसाठी २८८ मतदार संघातील सुमारे ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पाच कोटी २२,७३९ पुरुष तर चार कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ इतक्या महिला मतदार आहेत.
सहा हजार एक तृतीयपंथी मतदार असून एकूण मतदारसंघात पुणे जिल्हा आघाडीवर आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी एक लाख ४२७ मतदान केंद्र स्थापन करण्यात आली आहेत .
राज्यामध्ये अतिउंच इमारती, सहकारी गृहनिर्माण संस्था च्या संकुलात मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. आदिवासी आणि दुर्गम क्षेत्रावरही विशेष लक्ष देण्यात आले आहे. निवडणुकीसाठी दोन लाखाहून अधिक शाईच्या बाटल्यांची तरतूद केली असून शाईच्या बाटल्यांची संख्या दोन लाख वीस हजार पाचशे वीस इतकी आहे .
राज्यात ४२६ मतदान केंद्र महिला नियंत्रित आहेत.
मतदारांनी निर्भय, पारदर्शक आणि मोकळ्या वातावरणात मतदान करावे असे आवाहन आयोगाने केले आहे.