करणार ना उद्या मतदान?
करणार ना उद्या मतदान?
यंदाच्या दिवाळीची धामधूम संपते न संपते तोच विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरु झाली…आणि मग काय जिकडे तिकडे प्रचार सभा, कोपरा सभा, घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी सुरु झाल्या….आपल्या नेत्याच्या प्रचारासाठी कार्यकर्ते दिवस रात्र न थकता (घरातील, नोकरीतील व व्यवसायातील कामे बाजूला ठेवून )जिवाचे रान करत असताना दिसून आले…अवेळी झालेल्या वरुण राजाच्या हजेरीबरोबरच ज्या त्या पक्षाच्या उमेदवाराचे जाहीरनामे, संकल्पनामे, विविध आश्वासनं, यांचादेखील खूप पाऊस झाला….
आपल्या आपल्या पक्षाच्या ( खरंतर आघाडीवर असणाऱ्या दोन युतीच्या कारण कोणत्याही एकाच पक्षाला एकट्याने निवडणूक लढणं सोपं राहील नाही…) टीव्ही वर येणाऱ्या विविध जाहिराती, आपापल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ज्या त्या पक्षाचे बडे नेते करत असलेल्या भाषणातून, एकमेकांवर करत असणाऱ्या आरोप प्रत्यारोपांमधून, त्याचबरोबर आपल्या नेत्याच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यानी विविध समाजमाध्यमांवर लावलेले स्टेटस, लावलेल्या stories, दैनिकांमध्ये येणाऱ्या बातम्या, येणारे विविध लेख, संपादकीय सदर आणि त्याचबरोबर वर्तमानपत्रात येणारी विनोदी सदरं आणि व्यंगचित्रे, या सर्वामुळे गेल्या दहा बारा दिवसात आपल्यासारख्या सामान्य मतदारांचे निखळ मनोरंजन झाले. मात्र त्याचबरोबर दिवसातून अनेकवेळा येणारे प्रचाराचे फोन calls आणि तितक्याच वेळा गल्लोगल्ली मोठ्या आवाजात फिरणाऱ्या प्रचाराच्या रिक्षामुळे तितकाच मनस्तापही झाला… (आणि प्रचाराच्या नावाखाली झालेल्या जेवणावळीत तर किती बोकड आणि किती कोंबड्यांचा फडशा पडला असेल याची कल्पना न केलेली बरी….) असो….
हा सगळा लोकशाहीचा एक भाग आहे, निवडणूक आली की प्रचारासाठी नवं नवीन क्लुप्त्या शोधल्या जातात ( नुकत्याच झालेल्या बलाढ्य अमेरिकेच्या निवडणुकीत तर खुद्द ट्रम्प तात्यांनी Mc.D च्या बाहेर french fries चे वाटप केले होते…) आणि त्या क्लुप्त्या अंमलात आणण्यासाठी कित्येक जणांना रोजगार मिळतो हे देखील खरे… निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या प्रत्येक उमेदवाराला आपल्या प्रचाराचा अधिकार हा आहेच त्यामुळे ज्या त्या उमेदवाराने, ज्या त्या पक्षाने आपापल्या परीने जमेल त्या माध्यमाचा वापर करुन, जमेल त्या पद्धतीचा वापर करुन आपला आपला प्रचार केला आहे….त्यांनीं त्यांचे काम चोख बजावले आहे…
पण आता खरी कसोटी आहे ती आपली म्हणजेच आपल्या सर्व मतदारांची….कसोटी एव्हढ्यासाठीच की गेल्या काही दशकांमध्ये निवडणूक प्रक्रिया आणि मतदान याबद्दल आपल्या मनामध्ये साशंकता निर्माण झाली आहे, मतदानाची टक्केवारी घसरत चालली आहे… आपल्या मध्ये मतदानाविषयी उदासीनता आलेली आहे, ( हा आता त्या उदासीनतेला अनेक कारण आहेत हे देखील तितकंच खर ), मतदानाबद्दल आपण काहीसे नकारात्मक झालेले आहोत, अमुक एक पक्ष, अमुक एक नेता निवडून तर येणारच आहे मग माझ्या एका मताने काय फरक पडणार ? मी कोणालाही मत दिले तरी मला करावे लागत असणारे कष्ट हे करावेच लागणार किंवा सत्तेच्या लालसेपोटी हे राजकारणी त्यांच्या आईबापाचेही नसतात तर आपण तर सामान्य जनता…..अश्या सर्व विचारामुळे आपल्यामध्ये मतदान करण्यासाठी एक प्रकारचा निरुत्साह आलेला आहे….
गेल्या काही वर्षात सरकार बनताना किंवा सरकार पाडताना होणाऱ्या नाट्यमय घटना, होणारी बंडाळी, संपत चाललेली पक्षाबद्दलची आस्था, संपत चाललेली पक्षाबद्दलची निष्ठा, पक्षनेतृत्वासाठी संपलेली कट्टरता, राजकारणातील धुरंधर मानल्या जाणाऱ्या व्यक्तीही केवळ आणि केवळ सत्तेसाठी गुलाल तिकडं चांगभलं म्हणताना दिसून येतात….;अश्या अनेक कारणांमुळे आपण सर्वच जण मतदानाबद्दल उदासीन झालो आहोत. आपल्याला मतदानासाठी निरुत्साह आलेला आहे, असे असले तरी सत्तेत असणाऱ्या सरकारबद्दल,त्यांच्या कार्यपद्धतीवर, भ्रष्टाचाराबद्दल, सरकारने आमच्यासाठी काय केले यासारखे प्रश्न उपस्थित करत, वाढती महागाई व बेरोजगारी यासारख्या गोष्टीसाठी सरकारच्या नावाने आपण खडे फोडतच असतो आणि सरकार निवडून देण्याचा आपल्यालाच असणारा अधिकार आपण मतदानासाठी असणारी सुट्टी इतर गोष्टीत एन्जॉय करत, मतदान न करता गमावून बसलेलो असतो.
आपण हे लक्षात घ्यावयास हवे की, आपल्या भारत देशात लोकशाही आहे आणि लोकशाहीची साधी आणि सरळ व्याख्या म्हणजे लोकांचे शासन अशी आहे, ज्यामध्ये लोकांना ( म्हणजेच आपण सर्व प्रौढ नागरिक असणाऱ्या मतदारांना) मतदानाच्या हक्काद्वारे सरकारच्या स्वरुपावर आणि कार्यावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार असतो. म्हणजेच आपल्या मतदानाद्वारे आपण स्वतः आपल्याला योग्य वाटणाऱ्या व्यक्तीची निवड करु शकतो. आपण आपला प्रतिनिधी निवडून देऊ शकतो आणि त्याद्वारे आपण अप्रत्यक्षपणे आपल्या गावाच्या, आपल्या राज्याच्या, आपल्या प्रदेशाच्या, आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये सहभागी होऊ शकतो….मतदान करणं हा आपला अधिकार आहे, हे आपले आपल्या देशाप्रती असणारे आद्यकर्तव्य आहे, त्याहीपेक्षा मतदान करणं हाच मुळात लोकशाहीचा पाया आहे, आणि पाया जितका मजबूत आणि बळकट तितकीच इमारत स्थिर ….त्यामुळे आपल्या एक मताद्वारे आपण या लोकशाहीचा पाया अधिक मजबूत करण्यामध्ये आपला हातभार लावू शकतो… आपल्या एका मताचा खारीचा वाटा देशाच्या प्रगतीमध्ये लावू शकतो.
आपण जरी प्रत्यक्ष सीमारेषेवर लढणाऱ्या सैनिकांसारखी देशसेवा करत नसलो तरी मतदान करणं ही देखील एक प्रकारची देशसेवाच आहे. लोकशाहीने आपल्याला दिलेल्या अधिकाराचा वापर करणं हे आपल्यासारख्या सुजाण आणि सुशिक्षित नागरिकाचे कर्तव्य आहे… आपले मत हा आपला आवाज आहे, आपली साद आहे, जी आपण योग्य व्यक्तीला निवडून देण्यासाठी वापरू शकतो. आपल्या एका मतावर आपल्या येणाऱ्या पिढीचे भविष्य अवलंबून असते….. वर उल्लेख केलेल्या ज्या गोष्टींमुळे आपल्याला मतदानाबद्दल उदासीनता आलेली आहे त्या सर्व गोष्टी, ती सर्व परिस्थिती बदलण्यासाठी आपल्या हातात मतदान करण्याचे शस्त्र आहे, आपले एक मत सध्या समाजात व राजकारणात असणारी अराजकता बदलू शकते, मतदानाचे हे आयुध वापरुन आपण केवळ सत्तेसाठी राजकारण करणाऱ्या ज्याला त्याला आपण त्याची योग्य जागा दाखवू शकतो, सत्ता हातात आल्यानंतर देशाची प्रगती सोडून केवळ आपली स्वतःची प्रगती करण्यासाठी वाट्टेल तसा भ्रष्टाचार करणाऱ्या महाभागांना त्यांची लायकी दाखवून देऊ शकतो…..
आपल्या मताद्वारे आपण योग्य व सक्षम नेतृत्व निवडून देऊन आपल्या प्रभागात, आपल्या गावात, आपल्या राज्यात व पर्यायाने आपल्या देशात आपणच बदल घडवून आणू शकतो. त्यामुळे मतदानासाठी असणारी सुट्टी ही आपले मतदानाचे कर्तव्य, आपला मतदानाचा अधिकार व मतदानाचा हक्क बजावून मगच साजरी करुयात, सध्याच्या काळात नोकरीनिमित्त, कामानिमित्त परदेशी स्थायिक झालेल्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे, ते तरी परदेशातून केवळ मतदानासाठी म्हणून मायदेशी येऊ शकत नाहीत मात्र इथे भारतात कोठेही स्थायिक असणाऱ्या चाकरमान्यांनी मात्र आवर्जून आपापल्या गावी जाऊन आपला मतदानाचा हक्क नक्की बजवावा…..
सर्वात महत्त्वाचे म्हणजे निवडणूक प्रक्रियेमध्ये सामील असणारे प्रशासकीय अधिकारी, शासकीय कर्मचारी, मतदान केंद्रावर ड्युटी बजावत असणारे पोलीस कर्मचारी, निवडणूक अधिकारी असणारे आपले सर्व शिक्षक वर्ग, मतदानाचे साहित्य, मतदानासाठी वापरात येणाऱ्या एसटी बसचे ड्राइवर, एकूणच निवडणूकप्रकियेमध्ये समाविष्ट असणारे सर्व लहान मोठे कर्मचारी हे सर्व जण निवडणुकीच्या दिवशी अगदी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत अतोनात कष्ट घेत असतात, त्यांचे ते कष्ट, परिश्रम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे निवडणूक प्रकियेसाठी आपल्याच खिशातून खर्च होणारा पैसा या सर्व गोष्टी सत्कारणी लावायच्या असतील तर आपण जरूर आणि जरुर मतदान करावयास हवे, अमुक एका पक्षाला, अमुक एका नेत्याला मतदान करा असे मी मुळीच सांगणार नाही मात्र आपल्या भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम नेतृत्व निवडून देण्यासाठी आवर्जून मतदान करा हे मात्र (आपल्यामध्ये असणाऱ्या मैत्रीच्या हक्काने म्हणा, तुमच्यापेक्षा लहान असणाऱ्या तुमच्या बहिणीची विंनती म्हणून म्हणा नाहीतर, नाहीतर देशाची एक सुजाण नागरिक असणाऱ्या भगिनीचे आवाहन म्हणून म्हणा… ) नक्की सांगेन. आपले मत हा आपला आवाज आहे, जनमतासमोर कोणाचेही काही चालत नाही त्यामुळे आपला मतदानाचा हक्क नक्की बजवा आणि आपले मत नक्की द्या….
काय मग….करणार ना उद्या मतदान ?
लेखन🖋️
स्वप्ना पवार .सातारा