मुंडे भेट: धसास ‘लागलेले’ प्रकरण ?
मुंडे भेट: धसास ‘लागलेले’ प्रकरण ?
आठवडा संपता संपता सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात झालेल्या भेटीने माध्यमांमध्ये तहलका तर सर्वसामान्यांच्या भावनांमध्ये सुरेश धस यांच्या बद्दलची अविश्वासाची जाणीव निर्माण झाली. सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात गेल्या आठवड्यात दोन वेळा गाठीभेटी झाल्या. त्या संपूर्ण आठवड्यात धस यांचे मुंडे यांच्या विरोधातील आक्रमक पवित्रे शिथिल झाले. त्यामुळे साहजिकच जनतेच्या मनात धस यांच्या विषयी संशयाचे वातावरण निर्माण झाले. त्यातून चंद्रशेखर बावनकुळे आणि सुरेश धस यांच्यातील परस्पर विसंवादामुळे या शंकेचे मळभ अधिक गडद झाले. सुरेश धस आपल्या वक्तव्यांमध्ये धनंजय मुंडे आणि त्यांची भेट अचानक, पूर्वकल्पना नसताना झाली असे सांगत आहेत. तर बावनकुळे यांच्या दृष्टीने ती भेट नियोजित होती. तसेच त्यानंतर डोळ्याचे ऑपरेशन झालेल्या धनंजय मुंडे यांची चौकशी आणि तब्येतीची विचारपूस करण्यासाठी सुरेश धस यांनी त्यांची गाठभेट घेतली आणि त्याचे समर्थनही केले. एकदा सुरेश धस, ती आपली भेट धावती होती असं सांगतात ,तर दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे आम्ही तिघे साडेचार तास बरोबर एकत्र होतो असे सांगत आहेत. सहाजिकच सुरेश धस यांनी ताडीच्या झाडाखाली बसून दूध, पाणी काही पिले तरी त्यांच्यावर ताडी पिल्याचेच आरोप होणार. जसे जसे दिवस जातील तसे तसे त्याचा अंमल चढतच जाणार.याचा अर्थ, मुंडे प्रकरण धसास लागले अशी ही चर्चा अपरिहार्यपणे होत राहणार.
मुळात संतोष देशमुख यांची केलेली अमानुष हत्या निषेधार्ह आहे. या हत्ये विरोधात धस यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात रान उठवले होते. मंत्रीपदावरून काढून टाका. तुरुंगात घाला. आकाचा आका कोण, यासारख्या मुद्द्यांची सरबत्ती त्यांनी केली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्याशी वैयक्तिक संबंध वेगळे आणि राजकीय संबंध वेगळे असे सांगत धस यांनी त्यांच्या भेटी संदर्भात चर्चा सुरू झाल्यानंतर आपण संतोष देशमुख यांच्या बाजूने आहोत, दोषींना शिक्षा झालीच पाहिजे असे सांगायला सुरुवात केली.
एकतर सुरेश धस, चंद्रशेखर बावनकुळे, धनंजय मुंडे यांचे मन, मेंदू, हृदय महान साधुसंतांच्या तोडीचे असावे. सुखदुःख, राग लोभ, तसेच षड्रिपुंच्या पलीकडे ही मंडळी गेली असावीत.किंवा अट्टल राजकारणी असावीत. बावनकुळे मुंडे, धस यांच्यामध्ये मतभेद आहेत पण मनभेद नाहीत असे घासून गुळगुळीत झालेले टुकार वाक्य माध्यमांना सांगतात.हे त्याचे निदर्शक असून कालांतराने या वाक्याची लाज त्यांची त्यांनाच वाटेल यात शंका नाही. मनभेद आणि मतभेद याचा अर्थ काय हे त्यांनी स्पष्टपणे समजून सांगायला पाहिजे. आकाला आणि गुन्हेगारांना फाशी व्हायला पाहिजे हे वाक्य मनातले आहे, की मताचे आहे आणि मत मनाशिवाय होत नाही की होते याचे खुलासे सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले पाहिजेत.
धस आणि मुंडे यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी बावनकुळे धडपड करत आहेत. हा या मागचा निष्कर्ष आहे. मात्र तो त्यांना मान्य करायचा नाही.
धनंजय मुंडे चारित्र्य, चरित्र, यत्र ,तत्र बदनामीच्या धुक्यांमध्येच बरबटलेले आहे. त्यांची अर्धांगिनी करुणा मुंडे जाहीरपणे, चव्हाट्यावर त्यांची अब्रू काढते. मंत्री असतानाचे आर्थिक व्यवहार प्रचंड संशयात आहेत यावर चर्चा होते.अंजनी दमानिया चूक आहेत की बरोबर हा वाद वेगळा ठेवला, तरी त्यांनी जे पुरावे दिलेत, जी माहिती काढली आहे त्यावर निर्लज्जपणे मौन राखणे आणि गुन्हेगार सिद्ध झाल्यावरच कारवाई करतो म्हणणे हा राजकीय मानसिकतेला फासलेला हरताळ आहे.
ज्या खटल्यांचे निकाल पाच, पंचवीस वर्षे लागू शकत नाहीत, अशा खटल्यांमध्ये धनंजय मुंडे दोषी सिद्ध झाल्यावर त्यांच्यावर कारवाई करणे म्हणजे कारवाई न करण्याचेच सहजशीर मार्गाचा अवलंब करणे होय. अडीच वर्षांपूर्वी पक्ष, पक्ष चिन्ह आणि फुटलेल्या आमदारांवर कारवाई करण्याची न्यायालयीन प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. अशा परिस्थितीत धनंजय मुंडे कधी दोषी ठरणार आणि कधी शिक्षा होणार, हा अनुत्तरीत प्रश्न आहे . सुरेश धस यांच्या दृष्टीने धनंजय मुंडेंचा नैतिकतेशी धुरान्वयाने संबंध नाही. त्यामुळे नैतिकतेच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे कधीच राजीनामा देणार नाहीत. एक मात्र नक्की सुरेश धस यांच्या मुंडे भेटीने मुंडे यांचे नुकसान झाले नाही, पण धसांची विश्वासार्हता रसातळाला जायला नक्कीच सुरुवात झाली आहे. धनंजय मुंडे हे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे भारतीय जनता पक्षात काम करत होते. त्यानंतर शरद पवार यांच्यासोबत तर आता अजित पवार यांच्याबरोबर आहेत. कोलाटउड्यांचा हा प्रवास त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी केला असून आता त्याची फळे ते चाखत आहेत. सुरेश धस यांनी काय कमावले माहित नाही,प्रकरण अखेरीस मुंडेंच्या बाजुनी धसास लागले, तर मात्र जनतेच्या मनातील त्यांनी त्यांचे स्थान मात्र नक्कीच गमावले असे म्हणावे लागेल.
.
मधुसूदन पतकी
१७.०२.२०२५
…