पायाभूत सुविधांच्या विकासावर शासनाचा भर:ना.देसाई


ग्रामीण भागाच्या विकासासाठी पायाभूत सुविधांच्या विकासावर शासनाचा भर
–पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा : ग्रामीण भागांचा विकास करण्यासाठी रस्ते, पाणी, लाईट, शाळा, आरोग्य सेवा यासारख्या पायाभूत सुविधांच्या विकासावर शासन प्राधान्याने भर देत आहे. या सुविधा पूर्णत्वास नेणे ही लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटन, खनिकर्म माजी सैनिक कल्याण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी केले.

Advertisement

अडुळपेठ येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोन मधून अडुळ ते डिगेवाडी रस्ता सुधारणा करणे, अडुळ साळुंखेवस्ती रस्त्यावरील ओढ्यावर साकव बांधणे या कामांचे संयुक्त भूमीपूजन तसेच मल्हारपेठ येथे मल्हार पेठ, मंद्रूळहवेली, पानसकरवाडी, जमदाडवाडी, नवसारवाडी यांना जोडणाऱ्या मल्हार पेठ ते जमदाडवाडी रस्त्याची सुधारणा करणे या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री श्री. देसाई यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम उपविभाग पाटणचे उपअभियंता एस. वाय. शिंदे, डीगेवाडीचे सरपंच अर्चना नलवडे, उपसरपंच राजेश शिर्के, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब पाटील, मल्हारपेठचे सरपंच आर.बी. पवार, उपसरपंच पुरुषोत्तम चव्हाण यांचेसह सर्व विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
पालकमंत्री शंभूराजे देसाई म्हणाले, गाव, वाड्या-वस्त्यांवर वॉर्ड निहाय पायाभूत सुविधांवर शासन भर देत असले तरी या सुविधांची अखंडपणे निगा राखण्यासाठी खर्च येतो. यासाठी ग्रामपंचायतींनीसुद्धा प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी ग्रामपंचायती स्वतःचे उत्पन्न वाढवून आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत. गाव स्वच्छ राहिले पाहिजे, गावातील नाले, गटारीची स्वच्छता राखली पाहिजे. बाजारपेठांमध्ये स्वच्छता असली पाहिजे. गावे सुशोभीकरण करण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न करावेत यासाठी शासन त्यांना मदत करेल, असेही ते यावेळी म्हणाले.
०००


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!