अग्रलेख :चौकटी पलीकडची काॅंग्रेस?
काॅंग्रेस:चौकटी पलीकडचा पक्ष..?
सध्याच्या अत्यंत वेगवान राजकीय घडामोडींमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे अभिनंदन करणे गरजेचे आहे. वेगवान राजकीय घडामोडी याचा अर्थ निवडणुकांमध्ये होत असणारे बदल, प्रचारांमध्ये आलेला वेग ,अत्याधुनिक यंत्रणा, तंत्र याचा मोठ्या प्रमाणावर सुरू असलेला वापर ,पक्षाचे विचार ,ध्येय, धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे आणि केवळ पोहोचवण्यास नव्हे तर ते त्यांना म्हणजेच मतदारांना आपले आहेत असे वाटायला लावणे या संदर्भातही सर्वच पक्ष मोठ्या प्रमाणात प्रयत्नशील आहेत. आपल्या विचारधारा पुन्हा पुन्हा तपासून पाहणे हाही वेगवान राजकीय घडामोडीतील महत्त्वाचा टप्पा आहे. या सगळ्याचा विचार करता राहुल गांधी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आणि सर्वच काँग्रेस जनांना , चौकटी बाहेर विचार करा असा संदेश दिला आहे. सहाजिकच या संदेशाचे स्वागत करणे अगत्याचे आहे.
काँग्रेसला लाभलेली सव्वाशे वर्षाहून अधिक काळाची परंपरा, काँग्रेस स्थापनेपासून स्वातंत्र्य लढ्यापर्यंत आणि स्वातंत्र्य लढ्यानंतरही ज्या अत्यंत विद्वान, विचारी,संवेदनशील, राष्ट्राभिमानी अशा व्यक्तींनी काँग्रेस पक्ष वाढवण्यात आणि तो जनतेच्या मनात रुजवण्यात अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. सहाजिकच एक काळ काँग्रेस ही चळवळ न राहता भारतीयांचा श्वास झाली होती. आज काँग्रेस पक्ष व्हेंटिलेटरवर असल्याच्या अवस्थेत आहे. काँग्रेसलाच कृत्रिम श्वास देण्याची वेळ आलेली आहे. लोकशाहीमध्ये निवडणुकातील जयपराजय हे पक्षाचे मूल्यमापन करण्याकरता अत्यंत तोकडे साधन आहे. विचारधारा किती बळकट आहे आणि किती दीर्घकालीन आहे तिचा परिणाम, भविष्यकाळात कसा होणार आहे यावर पक्षाच्या यश अपयशाचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे. मात्र सध्या बहुतेक सर्वच पक्ष विचारधारेपेक्षा सत्ताप्राप्तीच्या केवळ एकमेव विचाराकडेच आकृष्ट झाल्यामुळे मूल्यातील विचारांमधील सत्व, तेज नाहीसे झाले आहे.
राहुल गांधी यांना काँग्रेस पक्षामध्ये म्हणजेच काँग्रेसच्या विचारधारेत तेज आणायचे असेल, सत्व निर्माण करायचे असेल तर चौकट बंद विचार, कृतीच्या पलीकडे जाऊन काम केले पाहिजे. अर्थात हे काम कोणी करायचे ? चौकटी बाहेरचे विचार कोण देणार? ते शेवटच्या व्यक्तीपर्यंत कसे पोहोचवणार? ते पोचवत असताना ते तसेच शुद्ध राहतील, त्यात भेसळ होणार नाही याची हमी कोण घेणार? ते व्यक्ती केंद्रित न राहता समष्टीकेंद्रीत व्हावे यासाठी काय आणि कोणते नियोजन आहे? यासारखे अनेक प्रश्न उपस्थित होतील. राहुल गांधी यांनी या प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आहे. अर्थात ही उत्तरे जाहीरपणे देणे योग्य नाही किंबहुना पक्ष वाढीच्या रणनीतीच्या दृष्टीने ते गोपनीय राहणे अधिक श्रेयस्कर आहे. मात्र कालबद्ध लक्ष्य ठेवून काँग्रेसजनांमध्ये तशी कृती किंवा वर्तन दिसणे आवश्यक आहे.
गेल्या दहा वर्षात काँग्रेस च्या यश अपयशाचा आलेख चढउताराचा आहे. जिथे यश मिळाले तिथेही ढिसाळ नियोजन आणि निर्णय शून्यतेमुळे अपयशाला सामोरे जावे लागले. अशा परिस्थितीत काँग्रेसची परंपरा काँग्रेसचे संस्थान आणि त्यातील संस्थानिक यांनी स्वतःला पहिल्यांदा चौकटीतून बाहेर काढले पाहिजे. सर्वसामान्यांच्या मध्यमवर्गीयांच्या दृष्टीने काँग्रेस आपलीशी वाटावी या पद्धतीने काँग्रेसने सामाजिक नियोजन केले पाहिजे. राजकारण करत असताना केवळ टीका टिप्पणी आणि एकमेकांवर चिखल फेक या पलीकडे बरेच काही देता येण्यासारखे आहे. कार्यकर्ता तयार करणे, नेत्यांची फळी तयार करणे यासारख्या बाबींकडे अत्यंत गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. एकेकाळी काँग्रेस हा सर्वसामान्यांचा पक्ष होता. आज काँग्रेस सह सर्वच पक्ष अपवाद वगळता पंचतारांकित व्यवस्थापनाचे पक्ष झाले आहेत. यातून काँग्रेसलाही बाहेर पडले पाहिजे. केवळ जातीपातीचा विचार करून निवड ,नियुक्ती आणि उमेदवारी देण्यामुळे जनता मतदार आपल्याबरोबर येतील हा भ्रम आहे. या भ्रमातूनही काँग्रेसने शक्यतो लवकरात लवकर बाहेर पडले पाहिजे. अर्थात राहुल गांधी यांच्यापुढे यासंदर्भात नियोजन असेल किंबहुना त्यांनी ते करावे एक विचार तरी त्यांनी मांडला आहे. हा विचार पृथ्वीराज चव्हाण आणि सुमारे 22 जणांनी काही महिन्यांपूर्वी मांडला होता. त्यावेळी ही मंडळी राहुल गांधी आणि गांधी परिवाराच्या कळ्या यादीत गेली होती. सातारा जिल्ह्यात पृथ्वीराज चव्हाण हे त्याचे ढळढळीत उदाहरण आहे . थोडक्यात जुन्या नव्याचा संगम म्हणजेच अनुभव आणि उत्तम क्षमता, ताकद याचा मिलाफ करणे हे मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका वड्रा आणि काँग्रेसच्या सुकाणू समिती पुढचे आव्हान आहे. परिवारवाद ,घराणेशाहीचा अदृश्य प्रभाव कार्यकर्त्यांनी झटकून टाकला पाहिजे, तरच चौकटी बाहेरचा विचार व्यापक होईल. थोडक्यात ब्रेक द रुल फॉलो द प्रिन्सिपल्स या वाक्याला केंद्रस्थानी ठेवून काम करणे गरजेचे आहे.
अन्यथा चौकटी पलीकडे ठराविक मंडळींची चौकट आखून काम केले जाईल, आणि चौकटी पलीकडची चौकट एकसारखीच आहे हे कालांतराने सिद्ध होईल.
.
मधुसूदन पतकी
21.02.2025