निर्लज्जम् सदा सुखी


निर्लज्जम् सदा सुखी

अखेर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला. राजीनामा देतानाचे कारण , तब्बेत ठीक नाही असे दिले आहे. तर त्यांच्या पक्षाचे नेते , अध्यक्ष अजित पवार यांनी , राजीनामा नैतिकतेच्या आधारावर दिला असे सांगितले आहे. सोमवारी रात्रभर दूरवाहिन्यांवर धनंजय मुंडे यांचे जान-ए- जिगर वाल्मिक कराड आणि त्यांच्या कच्याबच्यांनी संतोष देशमुख यांच्या मृत्यूचा खेळ मांडला होता. त्याची छायाचित्रे दाखवली जात होती. ती पाहता कोणाच्याही तळपायाची आग मस्तकास जावी असे ते प्रकरण होते. खंडणी मागताना जे आडवे येतील त्यांना आडवे करण्याची कराडची भाषा आणि त्या प्रमाणे वागणारे त्याचे बगल बच्चे हे मानवजातीला कलंक आहेत. त्यांचे कृत्य मानवतेला काळिमा फासणारे आहे. आणि ते पाहून समाधान मानणारे वाल्मिक कराड आणि कंपनी माणुसकीचे मारेकरी आहेत. त्यांना कायद्याने कठोर शिक्षा झालीच पाहिजे . मात्र याची पाळेमुळे धनंजय मुंडे यांच्या पर्यंत पोचत असतील तर धनंजय मुंडे ही या नराधमांना दिल्या जाणाऱ्याच शिक्षेस पात्र असतील . राजकारण किती गेंड्याच्या कातडीने केले जाते आणि त्या करता राजकारणी किती लाज सोडून वागतात हे या निमित्ताने पुन्हा एकदा जाहीर झाले.
गेले ८४ दिवस धनंजय मुंडे यांना महायुती वगळता सगळे पक्ष आणि महायुती मधील भाजपचे आ. सुरेश धस राजीनामा मागत होते . मात्र निर्ढावलेले धनंजय मुंडे आपल्या मस्तीत होते. एक अधिवेशन त्यांनी त्याच मस्तीत पार पाडले . त्या जोरावर आपल्याला कोण काय करत नाही असा त्यांचा समज झाला. खरे तर या त्यांनी केलेल्या प्रकारामुळे अजित पवार यांना पण मुंडे नकोच असतील, मात्र त्यांना मंत्रिमंडळ बाहेर व्हा हे सांगता आले नाही. तर मुंडे हे फडणवीसांचेही जुने मित्र असल्याने त्यांची ही जीभ राजीनाम्यासाठी रेटली नाही. आता जनमताचा दबाव एवढा वाढला की राजीनाम्याचा आदेश दिल्या शिवाय फडणवीस यांना गत्यंतर राहिले नाही. सरकार म्हणून जी यंत्रणा आहे, ती तुमच्या सोबत नाही हे दाखवून द्यावे लागले. अजून ही वाल्मिक कराडला तुरुंगात मिळणारी बडदास्त पहाता कराड आणि कंपनीचा माज संपला नाही हेच सत्य आहे. अत्यंत तृतीय श्रेणीतले हे गुंड आहेत. झुंडीने राहिल्याने आणि सरकारी यंत्रणा सोबत असल्याने गेली किमान दहा वर्षे हे परळीत अवैध धंद्यातून राज्य करत होते. खरे तर गावागावातील असे कराड,चाटे, केदार, सांगळे इत्यादी हुडकून काढले पाहिजेत ही जबाबदारी आता सरकारची आहे. गेल्या दहा वर्षात कराड टोळीने केलेले कारनामे ,मुंडेंचे प्रताप शोधले पाहिजेत. अशा किती संतोष देशमुखांवर या मंडळींनी अन्याय केला हे हुडकले पाहिजे.
तब्बेत बरी नाही म्हणून राजीनामा न घेता फडणवीस यांनी त्यांना बडतर्फ केले पाहिजे. तब्बेत बरी नाही हे राजीनाम्याचे कारण आता होऊ शकत नाही. दिसत नाही, बोलता येत नाही मात्र मंत्री होण्याची हावं सूटत नाही असा प्रकार मुंडे यांचा झाला आहे. अशा नरा मोजुनि पैजार मारल्या पाहिजेत. तसेच त्यांना मंत्रिमंडळात घेणार्यांनाही त्याचा प्रसाद दिला पाहिजे. अजित पवार याना मुंडेंची कारकीर्द माहित नव्हती का ? असे असताना त्यांना मंत्री करण्याचा अट्टहास का ? असे म्हणायचे कारण अजित पवार यांनी अखेर पर्यंत धनंजय मुंडे यांना राजीनामा मागितला नाही. तसेच अगदी नरड्या पर्यंत येईपर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी ही मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले नाही.
गंमत वाटते ती जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळेंची.सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांना मुंडेंची कारकीर्द माहिती नव्हती का? धनंजय गुणी होते , कर्तृत्ववान होते म्हणून त्यांना शरद पवार यांनी,काका स्व.गोपिनाथ मुंडे यांच्याकडून फोडले होते ना ? राजकारणात त्यांची प्राणप्रतिष्ठा करण्याचे पुण्य पवार घराण्याचेच ना ? करमुसे यांची फोडलेली पाठ आणि स्व.देशमुख यांच्या पाठीचे फोटो आव्हाडांना तरी ओळखतील का ? सबब विरोधकांनी प्रामाणिकपणाचा न झेपणारा आव आणू नये.
आता फडणवीस यांना मुंडेंसह अजित पवार आणि राष्ट्रवादी पक्षाला ही विवस्त्र करायचे असेल असा तर्क मांडला जाईल . त्यासाठी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचा मुहूर्त त्यांनी निवडला आणि रात्रभर स्व. देशमुख यांच्या हत्त्येच्या छायाचित्रांना दाखवून मुंडे तसेच राष्ट्रवादीची बेअब्रू केली असे म्हटले जाईल. खरे तर असे दाखवणे शिष्ठसंमत नाही . मात्र शहाण्यांना शब्दाचा मर असतो मुंडे, कराड आणि त्यांच्या टोळीला शब्दांचा मार कधीच बसणार नाही असे लक्षात आल्यावर माध्यमातून जनमानसात त्यांचे चरित्र आणि चारित्र्य समोर आणावे लागले. प्रत्यक्षात मुंडे,कराड यांची लायकी लक्षात आल्यावरही अजित पवार हे धनंजय मुंडे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देत आहेत असे सांगत असतील तर ते राज्याचे दुर्दैव आहे असे म्हणावे लागेल. गेले अडीच तीन महिने मुंडेंची ही नाजूक नैतिकता कुठे गेली होती ? राजीनाम्याचा प्रश्न निघाला की पवार चेंडू फडणवीसांकडे टोलवायचे तर फडणवीस पवारांकडे . दोघानांही मुंडेंना थेट राजीनामा मागण्याचे धाडस का झाले नाही ? विधान सभेत आमदार सुरेश धस यांनी स्व. देशमूख यांना कसे मारले याचे वर्णन केले . त्यावेळी पवार- फडणवीस यांच्या ह्रदयाला पाझर का फुटला नाही ? एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि सरकारमध्येच आहेत त्यांनी यावर भाष्य का केले नाही ? स्वतःला हलक्यात घेऊ नका असे सांगताना ही गंभीर घटना हलक्यात का घेतली ? मुळात ज्या मंत्र्याला आजारामुळे दोन मिनिटापेक्षा जास्तवेळ बोलता येत नाही त्याला मंत्री का करावे ? आणि त्यानेही निर्लज्जपणे प्रकरण अंगाशीआले की आजाराचे कारण देत मैदान का सोडवे ? ज्या धनंजय मुंडे यांचे दोन विवाह झालेत , अनैतिकी सम्बन्ध आहेत, दोन पेक्षा अधिक मुले आहेत, कराड सारख्या कुख्यात गुंडांशी घनिष्ट संबन्ध आहेत , अंबाजोगाई येथील राख विक्री आदी प्रकरणात कराडचा हात आहे. हे अनेकजण वारंवार सांगत होते. अशाशी घनिष्ट सबंध असणाऱ्या धनंजय मुंडे यांच्या कडून नैतिक राजीनाम्याची अपेक्षा कोणी केली नव्हती, तर त्यांच्या हकालपट्टीची आवश्यकता होती. मात्र आपण आजारी आहोत म्हणून राजीनामा देत आहोत असे सांगत असताना आपल्याला बरे वाटले, तब्बेत सुधारली की आपण परत मंत्री मंडळात येणार आहोत असे तर मुंडेंना सांगायचे नसेल ना? तसेही समाजात निर्लज्जम् सदा सुखी असतात.
जाता जाता दोन वर्षे कारावासाची शिक्षा झालेल्या माणिकराव कोकाटे यांनी बुधवारी नैतिकता सांभाळत राजीनामा द्यावा.आणि चंद्रशेखर बावनकुळे, गडावरच्या शास्त्रींनी समेट करण्यासाठी प्रयत्न करू नयेत.एवढेच सांगणे.

Advertisement

.

मधुसूदन पतकी
५.३.२०२५


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!