स्वीकारीले अंधत्व आनंदे ..!
स्वीकारीले अंधत्व आनंदे ..!
महाभारतात महर्षी व्यासांनी पात्रांची योजना , त्यांची व्यक्तिमत्व अत्यंत डोळसपणे साकारली आहेत. अर्थात त्यांच्या लिखाणाचे मूल्यमापन आपण करावे असे अजिबात नाही.शक्यही नाही .मात्र त्याच्या बद्दल असे ही सांगितले जाते, की साहित्य प्रकारात जे काही आहे ते , “व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम्” अर्थात लिखाणातले ,व्यक्तिमत्वाचे असे कोणतेही पैलू महर्षी व्यासांनी शिल्लक ठेवले नाहीत.
महाभारतात धृतराष्ट्र हे व्यक्तिमत्व त्यांनी चितारले आहे. हे व्यक्तमत्व आंधळे आहे. परावलंबी आहे. स्वकर्तृत्व गाजवण्यावर मर्यादा आहेत. तरी तो हस्तिनापूरच्या सम्राट आहे.आंधळा डोळ्यांनी तर आहेच, पण त्याचबरोबर पुत्रप्रेमानी ही आहे.! म्हणून मुलाच्या अर्थात दुर्योधनाच्या अनेक अन्याय्या बाबींना तो पाठीशी घालतो. त्याला वाचवत रहातो.
त्यावेळी जागतिक युद्ध झाले ,कौरव,पांडवांचे.
त्यावेळी तो, ते युद्ध जागेवर बसून आँखो देखा हाल ऐकत रहातो.रणांगणावरचे धावते समालोचन ऐकवण्यासाठी संजय याला दिव्यदृष्टी व्यासांनी दिली . आणि संजयाने समालोचन केले.संजयामुळे गीता आपल्याला समजली.त्या करता त्या डोळस संजयाचे आभार मानले पाहिजेत.
व्यास महर्षिंनी लिहिलेले महाभारत कालजयी आहे.त्यातली व्यक्तीमत्व काल होती,आज आहेत.उद्या ही असतील.आजच्या त्यांच्या नवमहाभारतात पुत्रप्रेमानी अंध झालेला मुख्य शासक दिसतो . तो ही कर्तृत्व शून्य असताना असेच राज्य एक प्राप्त होते. ते त्याला निर्टिधारित काळा पर्यंत टिकवता आले नाही. राज्य मिळवून देई पर्यंत त्याचे भीष्माचार्य बरोबर होते. मात्र राज्य गेल्यावर पितामह भीष्म हतबल झाले.
त्यात भिष्माचार्यांना त्यांच्या चुलत वंशावळीचा त्रास होता, तर काही प्रमाणात आपत्यप्रेमाच्या अंधत्वाचा शाप त्यांनाही होता.धृतराष्ट्र एका संजयला बाळगून होता . देशाचे हस्तिनापूर हे खरे तर संजयाचे कर्मस्थान . मात्र तिथे प्रजाहितदक्ष काम करण्या ऐवजी, मालकाच्या कामापेक्षा भीष्म ,शकुनी , लाडावलेल्या दुर्योधन, आईचा,बहिणीचा लाडका अश्वत्थामा,कर्ण ,दुःशासन यांच्याशी त्याचे संबंध अधिक चांगले झाले होते. त्यांनी दिलेला सल्ला , वर्तणुकीचा धडा अत्यन्त प्रामाणिकपणे हा संजय पाळत असे. त्याच्या प्रामाणिकपणामुळेच,कोलांट उड्यांमुळे कसे का होईना धृतराष्ट्राला राज्य मिळाले होते. पूर्णकाळ सत्ता मिळावी ही खरंतर तीव्र इच्छा पितामह भिष्मांची होती. कारण सरळ होते . धृतराष्ट्राच्या अंधळेपणाचा , अज्ञानाचा फायदा पितामहांना होणार होता . राज्याच्या मंत्रिमंडळात सेनापती , खजिनदार ,सचिव , कोठाराच्या प्रमुख ,तसेच अश्व ,गजदळ, राज्याचे पायदळ ,मित्र पक्षांचे सैन्य स्वत: साठी राबण्यास पितामहांना सहज मिळाले होते.
एकेकाळी अश्वत्थामा,कर्ण ,दुःशासन सत्तेपासून शेकडो योजने लांब होते. त्यांना राजपाट मिळण्याची आशा नव्हती.मात्र संजय ,भिष्माचार्यां मुळे ते महसूल अधिकारी, किल्ले बांधकाम आदी महत्वाच्या सुभ्याचे प्रमुख झाले .
संजय खुश झाला . महाभारतात त्याची जी भूमिका होती, ती विसरून तो आता पितामह ,दुर्योधन, कर्ण यांनी सांगितल्या प्रमाणे अंध धृतराष्ट्रा पढवू लागला. यात धृतराष्ट्राचा फायदा झालाच नाही, मात्र पितामह , दुर्योधनआदी मंडळींनी आपला बराच फायदा करून घेतला. आपले आप्त, स्वकीय यांना विविध मनसबदाऱ्या मिळवून दिल्या . पितामहांचे छत्र नसते तर सहकार सुभ्यातील संस्थेत ज्यांना शिपाई म्हणून कोणी ठेवले नसते अशी मंडळी, आप्त, स्वकीय त्या सुभ्याचे सुभेदार झाले. राज्यातील दरबारात म्हणजेच हस्तिनापुरात प्रजेने आवडीने(?) शिफारस केल्याने विराजमान झाले.
पण काळ बलवान असतो.भिष्माचार्यांनी सत्ता मिळवण्यासाठी केलेल्या वाटेचा ,पायवाटेचा विरोधकांनी महामार्ग केला.अगदी तीन पदरी.
सत्ता बदलली . मात्र संजयाला आपली दिव्यदृष्टी अजून आहे असाच भास होत राहिला.
दररोज भविष्य वर्तवायची सवय काही केल्या सुटता सुटेना. जे काही ही वर्तवतोय ते माझ्या दिव्यचक्षुंना दिसत आहे, असे धृतराष्ट्राला सांगत राहिला. सैन्याला कळवत राहिला.सत्ताधार्यंची सत्ता आज जाईल ,उद्या जाईल असे भविष्य सांगताना तो दमत नव्हता.
पुन्हा एकदा मोठे संगर झाले . पितामहांसह दुर्योधन, अश्वत्थामा,कर्ण , दुःशासन धारातीर्थी पडले. ज्यांनी संजयला धृतराष्ट्राजवळ बसवले त्यांच्यावरच संजय आगपाखड करू लागला. आपली दृष्टी अजून शाबूत आहे असे तो धृतराष्ट्राला पटवून देऊ लागला. आता धृतराष्ट्रालाही आपण डोळस असल्याची फाजील जाणीव झाली. पितामहांचे आप्तेष्ट आणि धृतराष्ट्राचे नातेवाईक सत्ताधाऱ्यांच्या दरोरोजच्या आक्रमणापुढे हतबल झाले. पायदळ, घोडदळ ,गजदळातले अनेक सरदार ,मनसबदार त्यांना सोडून जाऊ लागले.धृतराष्ट्राला आत्मचिंतन , विचार -विनिमय करण्याचे भान राहिले नाही. संजय दररोज काहींना काही आदळआपट करत राहिला . अतार्किक, विचार शुन्य, हास्यास्पद पण आनंदाने बोलू लागला.
अश्वत्थामा आपली सत्तेत न येण्याची ,सतत लढाई हरण्याची न भरुन येणारी जखम कपाळावर घेऊन आपल्या आई ,बहिण , नातेवाईकांकडे कधी पाण्यात पीठ मिसळून केलेलं दूध पौष्टिक म्हणून मागू लागला तर कधी जखमेवर लावायला तेल मागण्यासाठी परदेशात जाऊ लागला.
पितामहांनी शांत रहाणे पसंत केले. त्यांनी नाना क्लुप्त्या लढवून सत्ता उलथवून टाकण्यासाठी जे जे प्रयत्न केले ते हळू हळू प्रजेला समजू लागले.एकदोनदा तर सत्ता प्राप्तीसाठी विरोधकांशी, म्हणजे सत्ताधारी मनडळींशी हस्तीनापूरी जाऊन जनतेला वेगळेच कारण सांगत गुपचुप बोलणी सुरु ठेवून परत अश्वत्थामा, धृतराष्ट्रा बरोबर घरोबा केला. त्याच बरोबर विविध प्रांतात , दरबारात , दरबारी कचेऱ्यात स्वकीयांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी जे नेतृत्व उभे केले, ते ही पितामहांचेच आहे ,ते सत्ता उलथवून टाकण्यासाठी आहे,हे जग जाहिर झाले.त्यांचे दरबारातले स्थान डाळमिळत झाले. आता या वयात(असं म्हटलेलं त्यांना रुचत नसे.ते स्वतःला साठ सालके जवान है असे जाहीरपणे सांगत.)लढावे तर कोणासाठी कशासाठी ? यावर त्यांचे चिंतन सुरु झाले. आपल्या आप्तांना,स्व जनांना हस्तिनापूरचे राजे होता येणार नाही ,आपल्याला हस्तिनापूरचे सम्राट होता येणार नाही.आपले वारस सत्तेपासून बेवारस रहाणार याचा त्रास त्यांना व्हायचा.त्याचा आत्मक्लेष करण्यास एकांतवास बरा ,अशा विचारावर अखेर त्यांचे मन शर(?)शैय्येवर बोच असल्याने अस्थिर व्हायचे.सत्तांतरासाठी लटपटी करायला बेकाबू व्हायचे.पण….
या सगळ्यात एकच व्यक्ती स्वानंदात होती. घडणाऱ्या घटनांपेक्षा आपल्या विद्ववत्तेर ,हुशारीवर, लिहिण्या ,बोलण्यावर , अंगविक्षेपावर , आपल्यालला दुसऱ्यानेच दिलेल्या अनादरावर अगदी दुषणांवरही ती व्यक्ती न लाजता आनंदात मश्गुल होत असे. नवमहाभारतातील संजय तिचे नाव .त्याच्या आनंदाचे कारण धृतराष्ट्र जन्मतःआंधळा होता, या संजयने मात्र आंधळेपण आनंदाने स्वीकारले होते हे होते.त्यातही तो अंधत्वामुळे क्षमता,लायकीपेक्षा जीवनात आपल्याला जास्त मिळाले यात समाधानी होता.हे समाधान,आनंद त्याला सदैव लाभो ही महर्षी व्यास चरणी प्रार्थना आणि त्यांच्या प्रतिभेला दंडवत..!
.
मधुसूदन म.पतकी
२७.०३.२०२५