अग्रलेख: गहरी चाल
गहरी चाल
राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आता संपण्याच्या बेतात आहे. किंबहुना मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या बहुतेक सगळ्या प्रश्न आणि शंकांना उत्तर देत सरकारची बाजू सावरून धरली आहे. यात ना. जयकुमार गोरे यांच्यावर झालेले आरोप ते प्रशांत कोरटकर अटक इथपर्यंतचा प्रवास पूर्ण झाला आहे. तर उत्तरार्धात मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख प्रकरण तसेच वाल्मिक कराड , आंधळेचा विषय बऱ्या पैकी मागे पडले. औरंगजेब कबर ,नागपूर दंगल याकडे मोर्चा वळला किंवा वळवला आणि मग दिशा सालियन प्रकरणात अधिवेशनाचा शेवट करण्याचे नक्की झाल्याचे दिसते. थोडक्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात आर्थिक विषय तोंडी लावण्या पुरते घेतले गेले आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून सुरु झालेले अधिवेशन आदित्य ठाकरे ड्रग्ज पुरवठा करणारे आहेत इथं पर्यंत येऊन थांबले.
या अधिवेशनात काळ पर्यंत सुप्रिया सुळे आणि विरोधक एका मंत्र्याची विकेट गेली असे सांगत होते. मात्र सोमवार रात्री पासून मंगळवार दुपार पर्यंत दोन आमदार आणि एका खासदाराची विकेट जाईल की काय अशी परिस्थिती आहे. या दोन आमदारांच्यात आदित्य ठाकरे आणि रोहित पवार हे दोघे आहेत तर खासदाराच्या दस्तुरखुद्द सुप्रिया सुळे आहेत. महायुतीची अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही चाल फारच गहरी , खोली, विस्तार आणि उंची असलेली आहे. या चाली मागची कालबध्द सूची पाहिली तर बिटवीन लाईन उकलण्यास मदत होईल. सोमवारी रात्री एका जाहीर समारंभात देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ सालात भाजप – सेना युती न होण्यास उद्धव ठाकरे कसे जबाबदार आहेत हे भाषणात सांगितले. उद्धव ठाकरे चार जागेसाठी कसे अडून बसले , दोन पावले मागे आले असे तर आज त्यांच्यावर जी वेळ आली ती आली नसती हे ही शिंदे सेनेच्या नेत्यांकडून वदवून घेतले. आता राजकारणात उद्धव ठाकरे हुशार नाहीत हे गृहीतक ठसवण्यासाठी संजय राऊत त्यांच्या जोडीला आले. राऊत यांनी फडणवीस युतीच्या बाजूनी होते हे सांगतिले . थोडक्यात सेना भाजप युती न होण्याची अपरिपक्वता उद्धव ठाकरे यांची होती हे सिद्ध केले गेले.
दुसरीकडे जयकुमार गोरे यांच्यावर महिलेच्या विनयभंगाचा जो प्रकार सुरु आहे त्यात फडणवीस यांनी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना संशयाच्या घेऱ्यात आणले. प्रभाकर देशमुख यांचा उल्लेख करत आपल्या सांगण्याला बळकटी दिली. प्रभाकर देशमुख हे शरद पवार यांच्या अत्यंत मर्जीतले आहेत. त्यामुळे हे नाव गोवून आपल्या बोलण्यातुन त्यांनी केवळ सुळे,रोहित पवार यांना बोलायला लावलं नाही तर आता शरद पवार यांना ही बोलावे लागेल. एकनाथ शिंदे यांना उत्तम काम केल्याचे प्रमाणपत्र दिल्यावर पवार सरकारच्या ,देवेंद्र फडणवीस आणि तेही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात काय बोलणार याकडे आता लक्ष द्यावे लागेल. ते न बोलणे आणि बोलणे दोन्ही पंचायतीचे आहे. तर मंगळवारी दुपारी दिशा सालियन प्रकरणात सालियन कुटुंबाचे ऍड . निलेश ओझा यांनी आदित्य ठाकरे हे अमली पदार्थनांचे व्यापार ,उद्योग करत असल्याचा सनसनाटी आरोप केला आहे. दिशा सालियनच्या हत्यांचे वेळी ते तिथेच होते , त्यांच्याकडे प्रत्यक्षदर्शी पुरावा आहे असा ही त्यांचा दावा आहे. या सगळ्या चक्रव्युहात आदित्य ठाकरे अडकले तर राजकारणातून ते कायमस्वरूपी बाद होतील. जर व्हायचे नसेल तर शरणागती शिवाय पर्याय नसेल. एकूणच त्यांची देहबोली आणि मनोवृत्ती अहंकाराची आहे.
सोमवारी एकनाथ शिंदे यांच्या समोर त्यांनी बैठकीत जो अहंगंड दाखवला किंवा दुसऱ्या शब्दात मग्रुरी,माज दाखवला तो प्रकारही परिपक्वतेचा नव्हता.याच्या नोंदी नक्की घेतल्या जातात.त्यांचे भक्त किंवा हुल्लडबाजांना ते भारी वाटू शकते मात्र राजकारणाची पातळी का घसरत चालली आहे याचे ते उत्तम उदाहरण आहे.
सरते शेवटी विरोधी प्रादेशिक पक्ष राष्ट्रवादी(शप पक्ष ) , शिवसेना(उबाठा ) भाजपला नको आहेत. एक तर सोबत या किंवा संपून जा, हा त्यांचा विचार आहे.भाजपचा काँग्रेस मुक्त भारत ,असा नारा असला तरी एकमेव पक्ष काँग्रेस विरोधक म्हणून हाताळणे शक्य आहे. सोपे आहे .मात्र प्रादेशिक पक्षांचे तुकडे सांभाळत बसणे तापदायक आहे. त्यावर हा जालीम उपाय आहे.
सुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरे एका घेऱ्यात आणले की शरद पवार आणि उद्धव ठाकरे त्या बाहेर जाणार कुठे ? भरकटलेले काँग्रेसचे जहाज चालवणे त्यांना फारसे अवघड नाही, हे देवेंद्र फडणवीस जाणून आहेत. नाना पटोले, विजय वडेट्टीवार जहाज धोक्यात आल्यावर सगळ्यात पहिल्यांदा जहाज सोडतील. अथवा विरोधी पक्ष नेते पदाचे गाजर डोळ्यासमोर ठेऊन या दोघांचे राजकीय अपहरण कधी ही होईल. एकमात्र खरे मंगळवार ,२५ मार्च २०२५ हा दिवस दिशा दर्शक असेल हे मात्र नक्की आहे.देवेंद्र फडणविसांची चाल गहरी आहे.विरोधकांना बरोबर मित्र पक्षांनाही धडकी भरायला लावणारी आहे ,हे नक्की.
.
मधुसूदन म. पतकी
25.03.2025